PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


राज्यांनी पाठपुराव्यानंतर माहिती दिल्याने गेल्या 24 तासांत नोंदली गेलेली नवीन रुग्णांची व मृत्यूंची संख्या, एकाच दिवसातील आजवरची सर्वाधिक - सहसचिव, आरोग्य मंत्रालय

Posted On: 05 MAY 2020 8:22PM by PIB Mumbai

 

Delhi-Mumbai, May 5, 2020

 

नाम अर्थात अलिप्त राष्ट्र चळवळ सदस्य गटाच्या 4 मे 2020 ला झालेल्या ऑनलाईन शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालेत. सध्या सुरु असलेल्या कोविड-19  महामारीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.कोविड-19 विरोधात एकजूटही या ऑनलाईन नाम शिखर परिषदेची संकल्पना होती.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी कोविड-19  घडामोडींवरील माहिती दिली.

  • परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने SOP म्हणजे प्रमाणित कार्य प्रक्रिया तयार केली आहे.
  • परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था एकतर बिगर-सूचित अशा व्यावसायिक विमानांमधून किंवा भारतीय नौदलाच्या जहाजांमधून केली जाईल -केंद्रीय गृहमंत्रालय
  • स्थलांतरित मजुरांसाठी भारतीय रेल्वेने आतापर्यंत 62 'श्रमिक विशेष गाड्या' चालवल्या असून सुमारे 70,000 जण या सुविधेचा लाभ घेत आहेत. आज आणखी 13 गाड्या धावणे अपेक्षित आहे.
  • प्रत्येकाने मास्क लावणे/चेहरा झाकणे तसेच सार्वजनिक ठिकाणी 'दो गज की दुरी' चे नियम पाळणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र गुन्हा ठरेल; पान, गुटखा, मद्य आणि तंबाखु अशा पदार्थांच्या सेवनावर निर्बंध आहेत-गृह मंत्रालय.
  • एका ठिकाणी 5 किंवा अधिक जणांना एकत्र येऊ देण्याची परवानगी कोणत्याही संस्थेला नाही. विवाहविषयक सोहळ्यांसाठी 50 पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्याची संमती देता येणार नाही. अंत्यसंस्कारांसाठी 20 पेक्षा अधिक जण एकत्र येण्यास परवानगी नाही. या सर्व कार्यक्रमांमध्येही सोशल डिस्टन्सिंग - व्यक्ती-व्यक्तींतील उचित अंतराचे पालन झालेच पाहिजे. केंद्रीय गृहमंत्रालय
  • कार्यालयीन जागांवर, थर्मलस्कॅनिंग, हात धुण्यासाठी साबण,सॅनीटायझरचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. सामाजिक अंतराचे पालन होईल याची दक्षता घेतली जावी. वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये काम आणि जेवणाच्या सुट्टीच्या वेळाही वेगवेगळ्या असाव्यात. सर्व कर्मचारयांनी आरोग्य सेतू ऐप वर नोंदणी केली असावी.
  • कामाच्या ठिकाणी जवळच्या कोविड-19 रुग्णालयांची व विलगीकरण सुविधांची माहिती उपलब्ध असली पाहिजे. प्रत्यक्ष उपस्थितीत बैठका व सभांचे आयोजन टाळले पाहिजे. स्वच्छता, साफसफाई व आरोग्य सांभाळण्याविषयी माहिती पुरवली गेली पाहिजे.
  • कोविड-19 च्या रुग्णांची एकूण संख्या  46,433, वैद्यकीय उपचारांखाली असलेले सक्रीय रुग्ण -32,138 गेल्या 24 तासात 3,900  नवे रुग्ण, 195 मृत्यू तर 1,020 रुग्ण बरे झाले. एकूण मृत्यूसंख्या -1,568. बरे झालेले एकूण रुग्ण - 12,726, रुग्ण बरे होण्याचा दर - 27.41%
  • गेल्या 24 तासांत नोंदली गेलेली नवीन रुग्णांची व मृत्यूंची संख्या, एकाच दिवसातील आजवरची सर्वाधिक आहे. रुग्णांची नोंदणी व पुढील व्यवस्थापन अचूक वेळेवर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही राज्यांमध्ये त्रुटी आढळल्या व योग्य पाठपुरावा करून  उपाय शोधले गेले
  • काही राज्ये कोविड-19 च्या रुग्णांची वेळेत माहिती देत नव्हते, मात्र त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर, त्यांनी त्याची माहिती दिली. त्यामुळेच, गेल्या 24 तासांत रुग्णांचा संख्येत अचानक मोठी वाढ झालेली दिसते आहे- सहसचिव, आरोग्य विभाग यांचे स्पष्टीकरण.
  • कोविड-19 शिवाय इतर आजारांच्या रुग्णांवरही उपचार होणे महत्वाचे असून सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये तशा सुविधा असायला हव्यात. क्षेत्राचे निकष पूर्ण करत, इतर आजारांच्या रुग्णांना उपचार सुविधा कशा दिल्या जाव्यात, याबाबत आरोग्य मंत्रालयाने याआधीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
  • प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्यांनी, ग्रामीण व शहरी भागांतही, जंतूंमुळे पसरणाऱ्या डेंग्यूसारख्या आजारांना आळा घालण्यासाठी सुरळीतपणे सेवा पुरविणे महत्त्वाचे आहे.
  • आरोग्य मंत्र्यांनी बिहारच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करत  ऍक्युट इन्सेफ्लाइटिस सिंड्रोम म्हणजेच मेंदूज्वराच्या रुग्णांची चौकशी केली. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून बिहारमधील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलं.
  • कोविड-19 विषयी आज मंत्रिगटाची चौदावी बैठक झाली. आरोग्यमंत्री हे या बैठकीचे अध्यक्ष होते. PPE म्हणजे व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे, प्राणवायू व प्राणवायूचे सिलेंडर, व्हेंटिलेटर, आणि एन्-95 मास्क या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.- आरोग्य मंत्रालय
  • कोविड-19 च्या धोक्याचे नीट मूल्यांकन होणे आणि वेळेवर रुग्णांची माहिती मिळण्यासाठी, आरोग्यसेतू अॅपच्या वापराला आणखी प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असा निर्णय मंत्रीगटाने घेतला आहे.
  • बिगर-कोविड रुग्णालये व कोविड-19 रुग्णालयांतील बिगर-कोविड उपचारांच्या भागातील आरोग्य कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी PPE चा विचारपूर्वक वापर करावा या उद्देशाने, आरोग्य मंत्रालयाने आणखी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
  • कोणत्याही प्रकारच्या रुग्णालयात असणारा धोका लक्षात घेऊन, त्यानुसार PPE चा वापर करण्यासंबंधी या नवीन मार्गदर्शक सूचना माहिती देतात. अतिधोकादायक क्षेत्रात, PPE चा पूर्ण संच आवश्यक आहे, तर कमी धोकादायक भागात त्रिस्तरीय वैद्यकीय मास्क आणि तपासणीचे हातमोजे घालणे पुरेसे आहे.
  • जसाजसा आम्ही लॉकडाऊन शिथिल करत जाऊ, तसतशी, कोरोना संक्रमण साखळी तोडण्याची नागरिकांची जबाबदारी अधिक असेल. सर्व नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत, सर्व प्रतिबंधक उपाययोजना सुरु ठेवल्या पाहिजेत.
  • लॉकडाउनमुळे अतिशय सकारात्मक व आशादायी परिणाम झालेला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा काळ 3.4  दिवसांवरून 12 दिवसांपर्यंत पोहोचला आहे. त्याचवेळी, आता ही गती कायम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. - केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय.
  • त्याशिवाय, हे ही महत्वाचे आहे की प्रत्येक पॉझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे ट्रेसिंग व्हायलाच हवे. प्रतिबंधित क्षेत्रे आणि इतरत्र आरोग्य सुविधा केंद्रात, SARI आणि ILI ची लक्षणे असलेल्या रुग्णांचे निरीक्षण केल्यामुळे अत्यंत महत्वाची माहिती/आकडेवारी मिळत असून त्यातून पुढच्या कृतीसाठी योग्य दिशा मिळते आहे.

 

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इतर अपडेट्स :

  • केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय नवे कृषी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आखण्यावर काम करत असून, लवकरच हे धोरण आणले जाईल, ज्यात ग्रामीण, आदिवासी, कृषी आणि वनक्षेत्रात स्वयंउद्योजकता आणि स्थानिक कच्च्या मालापासून उत्पादने बनवण्यावर भर दिला असेल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम (SME) उद्योग चेंबर ऑफ इंडिया, SME निर्यात प्रोत्साहन परिषद तसेच आरोग्य आणि सौंदर्यप्रसाधने क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. या उद्योगांवर कोविड-19 च्या झालेल्या प्रभावावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
  • ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या निवृत्तीवेतन योजनेत 65 लाख निवृत्तिवेतनधारक आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात केलेल्या टाळेबंदीच्यामुळे निवृत्तिवेतनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून ईपीएफओच्या 135 क्षेत्रीय कार्यालयांनी एप्रिल 2020 च्या निवृत्तीवेतन देयकाची आगाऊ व्यवस्था केली होती.
  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महा मेट्रोच्या वतीने ठोस पावले उचलण्यात आली आहेत. मेट्रो कामगारांसह कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. मेट्रो स्टेशनवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही दररोज तपासणी केली जात आहे.
  • कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभर संपूर्ण बंदी लागू असल्यामुळे रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रे व्हॉट्अप आणि ई मेल द्वारे औषधांच्या ऑर्डर्स स्वीकारत आहेत. अधिकृत डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची यादी या समाजमाध्यमांद्वारे केंद्रांकडे पाठविल्यानंतर रुग्णांच्या घरापर्यंत आवश्यक औषधे पोहोचविली जात आहेत.
  • केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज महाराष्ट्र राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे समर्थित पूर्ण एकीकृत शीतगृह शृंखला प्रकल्पांच्या प्रवर्तकांसह व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला. एफपीआय राज्यमंत्री रामेश्वर तेली देखील या बैठकीला उपस्थित होते.
  • आधुनिक काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग शास्त्रात फक्त भर टाकण्याऐवजी मुलभूत शास्त्राची सुविहीत बांधणी करणारा विभाग म्हणून  कात टाकून वेगाने पुढे येत आहे आणि कोरोना विषाणू प्रादुर्भाव ही या दृष्टीने संधी आहे, असे प्रतिपादन विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी केले.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविड-19 च्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यात राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) योगदानाचा आढावा घेतला. ही अशी पहिलीच परिषद आहे ज्यात संरक्षण मंत्र्यांनी देशभरातील 17 एनसीसी संचलनालयांसोबत थेट संवाद साधला.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने अतिबाधित क्षेत्रांमधे वेगाने आणि रसायन रहीत निर्जंतुकीकरणासाठी अतिनील (अल्ट्रा वॉयलेट) निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला आहे. यूवी ब्लास्टर असे नाव असलेले हे उपकरण अतिनील किरणांच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करते.
  • देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सीएसआयआर अर्थात विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद करीत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा विज्ञान - तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.
  • कोविड 19 व्यवस्थापनासाठी टप्प्याटप्प्याच्या क्रमाने, पूर्वनियोजनानुसार आणि संपूर्ण तयारीनिशी भारत सरकार, राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयाने, तयारी आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर भर देत आहे. या तयारीचा नियमितपणे वरिष्ठ पातळीवर आढावा घेतला जातो. मध्यप्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी बैठक घेतली.

 

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्रातील कोविड-19  केसेसची संख्या सोमवारी 14,541 वर पोचली यामध्ये विक्रमी 1,567 केसेसची वाढ झाली. राज्य आरोग्य विभागानुसार गेल्या आठवड्यातील प्रलंबित केसेसचा शोध घेतल्याने ही वाढ झालेली आहे. राज्यातील मृत्यूंची संख्या आणखी 35 मृत्यू सह 583 वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये 9,310 केसेस तर 361 मृत्यू झाले आहेत.  अशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी मध्ये 42 नव्या केसेस सापडल्या. तिथली एकूण  रुग्णसंख्या 632 आहे. धारावी मध्ये आजपर्यंत 20 मृत्यू झाले आहेत. कोविड-19 मुळे प्रभावित झाल्याने महाराष्ट्र सरकारने मार्च 2021 पर्यंत सर्व भांडवली खर्चाला स्थगिती दिली आहे. सरकारने सर्व विभागांना नवीन खरेदीच्या निविदा आणि नवीन प्रकल्पासाठींची मंजुरी रोखून धरायला सांगितले आहे. पुढील आदेश येईपर्यंत सर्व भरती प्रक्रिया देखील थांबवण्यात येतील.

 

FACT CHECK

***

DJM/RT/MC/SP/PK

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621293) Visitor Counter : 311