पंतप्रधान कार्यालय

वित्तीय क्षेत्र, संरचनात्मक आणि कल्याणकारी उपाय योजनांबाबत चर्चेसाठी पंतप्रधानांनी घेतली बैठक

Posted On: 02 MAY 2020 10:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2  मे 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वित्तीय क्षेत्रातल्या बाबींविषयी रणनीती त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत कल्याण आणि विकासाला चालना देण्यासाठी संरचनात्मक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.

वित्त मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत,सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि शेतकऱ्यांना सहाय्य, रोकड सुलभता वाढवणे तसेच  पत विषयक ओघ बळकट करण्यासाठीच्या रणनितीवर चर्चा झाली. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वित्तीय स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी मार्ग आणि साधने यावर तसेच कोविडच्या परिणामातून व्यापार क्षेत्राने लवकर सावरावे यासाठीच्या उचलण्यात आलेल्या पावलांबाबतही बैठकीत चर्चा झाली.

कामगार आणि सामान्य जनतेच्या कल्याणाबाबत बोलताना, कोविड -19 मुळे निर्माण झालेल्या अडथळ्यावर मात करण्यासाठी व्यापार क्षेत्राला मदत करून रोजगार संधी निर्माण करण्याच्या गरजेकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

याआधीच्या काळात हाती घेण्यात आलेल्या महत्वाच्या संरचनात्मक सुधारणा दृढ करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. पत बाजार आणि पायाभूत क्षेत्रातल्या नव्या संरचनात्मक सुधारणाबाबतही यावेळी चर्चा झाली.

नव्या पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू करण्यासाठी जलद गतीने उपाययोजना हाती घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. कोविड-19 मुळे झालेले वेळेचे नुकसान भरून काढण्यासाठी पायाभूत क्षेत्रातल्या कामाला गती देण्यावर त्यांनी भर दिला.नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रकल्पांचा उच्च स्तरावर वारंवार आढावा घेण्यात यावा, ज्यामुळे विलंब टाळता येईल आणि रोजगार निर्मितीही शक्य होईल.

विविध मंत्रालयांनी घेतलेले सुधारणा उपक्रम सुरू ठेवावेत आणि गुंतवणुकीचा ओघ आणि भांडवल निर्मितीत अडथळा आल्यास तो दूर करण्यासाठी कालबद्ध रीतीने कृती करण्यात यावी याबाबत चर्चा झाली.

केंद्रीय गृह मंत्री, वित्त मंत्री वित्त मंत्रालयाचे सचिव आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1620582) Visitor Counter : 224