आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती

Posted On: 30 APR 2020 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30  एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रितपणे आणि सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात बिगर-कोविड रुग्णालयांमध्ये इतर आरोग्य सुविधा सुव्यवस्थितपणे मिळत आहेत, हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी  सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना पत्र लिहिले आहे की रक्तासंबंधीचे आजार असलेल्या, जसे की थॅलेसेमिया, हिमोफिलिया आणि सिकल सेल ऍनिमियाच्या रुग्णांना अविरत रक्ताचा पुरवठा उपलब्ध असेल याची काळजी घ्यावी. राज्यातील सर्व आरोग्य सुविधा (खाजगी रुग्णालयांसह)  कार्यरत राहाव्यात आणि गंभीर आजारांच्या रूग्णांना उपचार घेण्यात काहीही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही हर्षवर्धन यांनी म्हंटले आहे. अनेक खाजगी रुग्णालयात सध्या रुग्णांना डायलिसीस, रक्त देणे, केमोथेरपी आणि इतर वैद्यकीय सुविधा देण्यात कुचराई केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे, ते अजिबात स्वीकारण्यायोग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्रालयाने 15 एप्रिल 2020 रोजी, जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, लॉकडाऊनच्या काळात सर्व आरोग्य सेवा कार्यरत ठेवण्याच्या सूचना राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.या आरोग्य सेवा पुरवठादारांना, विशेषतः खाजगी क्षेत्रात कार्यरत सेवाप्रदात्यांना वाहतूक सुविधा देण्यात याव्यात,असे सांगण्यात आले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देखील डायलिसीससंदर्भात प्रमाणित कार्यपद्धती प्रोसिजर (SOP), 7 एप्रिल 2020 रोजी जारी केल्या तसेच 9 एप्रिल रोजी रक्तदान आणि रक्त देण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना https://www.mohfw.gov.in/ वर उपलब्ध आहेत.

कोविड-19 च्या उद्रेकाच्या काळात आवश्यक आरोग्य सेवा सुरु ठेवण्याबाबतची मार्गदर्शक सूचना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 20 एप्रिल रोजी जारी केल्या आहेत. यात, गर्भवतींची काळजी आणि बाल-लसीकरणाच्या सेवा, क्षयरोगासारखे  संसर्गजन्य आजार,कुष्ठरोग, जीवाणू-विषाणूजन्य आजार, तसेच कर्करोग आणि डायलिसीस सारख्या आजारांच्या उपचारांबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड-19 च्या चाचण्यांबाबत ICMR ने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 17 एप्रिल 2020 रोजी मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. हे प्रोटोकॉल सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांपर्यंत पोचवायला हवेत आणि कोविड च्या चाचण्या याच प्रोटोकॉलनुसार केल्या जाव्यात. आरोग्य सेवकांनी स्वसंरक्षणाची पूर्ण काळजी घ्यायची असून, 24 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, PPE सूट वापरले जावेत. रुग्णालयांमध्ये संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना देखील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये वितरीत करायला हव्यात.

बिगर-कोविड-19 रुग्णालयात कोविडचा पॉझिटिव्ह अथवा संशयित रुग्ण आढळला तर त्यासंदर्भातल्या उपाययोजनांबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या रुग्णालयात आवश्यक ती निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिथल्या आरोग्य सेवा पुढेही सुरु ठेवता येतील.

महत्वाच्या आरोग्य सेवा नाकारण्यात आल्या असल्यास विशेषतः चाचण्यांबाबत रूग्णांच्या तक्रारी असल्यास त्यांचे निराकरण त्वरित केले जावे, अशा सूचना राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने उपाययोजना केल्या जाव्यात जेणेकरून उपचारांबाबत अनिश्चितता असणार नाही आणि सर्व दवाखाने व रुग्णालये कार्यरत राहतील.

आतापर्यंत 8,324 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आता, 25.19%. इतका झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे एकूण रुग्ण 33,050 इतके आहेत. कालपासून 1718 नव्या रुग्णांची नोंद झाली.

कोविड-19 मुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचा विचार करता, असे आढळले आहे, की मृत्यूदर 3.2% इतका असून,त्यापैकी 65% पुरुष आणि  35% स्त्रिया आहेत. वयानुसार विभागणी केली असता, 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांचा मृत्यूदर 14% आहे तर 45 - 60  या वयोगटातील रुग्णांचा मृत्यूदर 34.8% आहे. 60 वर्षेपेक्षा जास्त वयोगटाच्या व्यक्तींचा मृत्यूदर 51.2% इतका आहे, तर, 60-75  या वयोगटातील व्यक्तींचा मृत्यूदर 42% इतका आहे. 75 पेक्षा अधिक वयाच्या रुग्णांचा मृत्यूदर 9.2% इतका आहे. तर, इतर आजार असलेल्या व्यक्तींचा मृत्यूदर  78% इतका आहे.

रुग्णांची मृत्यूसंख्या दुप्पट होण्याचा दर सध्या ११ दिवस इतका आहे. लॉकडाऊनच्या आधी हा दर 3.4 दिवस इतका होता.

काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात हा दुपटीचा दर सरासरी राष्ट्रीय दरापेक्षा चांगला आहे. यात 11 ते 20 दिवस दर असलेली राज्ये, दिल्ली, उत्तरप्रदेश, जम्मू कश्मीर, राजस्थान, तामिळनाडू आणि पंजाब ही आहेत. तर 20 ते 40 दिवस दर असलेली राज्ये, कर्नाटक, लदाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळ. 40 दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा दर असलेली राज्ये आसाम, तेलंगणा, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश ही आहेत.

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]inआणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in

कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619728) Visitor Counter : 197