पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी भारतातील गुंतवणूकीला चालना देण्याच्या धोरणांबाबत चर्चा करण्यासाठी घेतली सर्वसमावेशक बैठक

Posted On: 30 APR 2020 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30  एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच स्थानिक गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एक सर्वसमावेशक बैठक घेतली.

देशातील विद्यमान औद्योगिक जमीन / भूखंड / वसाहतींमध्ये आधीच आवश्यक मंजुऱ्या घेऊन पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि आवश्यक वित्तीय  सहाय्य पुरवण्यासाठी एक योजना विकसित केली जावी यावर चर्चा करण्यात आली.  गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिक सक्रिय  दृष्टिकोनासह कार्यवाही केली जावी, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि  केंद्र तसेच राज्य सरकारांकडून त्यांना आवश्यक असणाऱ्या मंजुऱ्या कालबद्ध रीतीने मिळाव्यात यासाठी मदत करण्याचे निर्देश या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी दिले.

जलद मार्गाने भारतात गुंतवणूक आणण्यासाठी आणि भारतीय देशांतर्गत क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणांवर चर्चा झाली. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी रणनीती विकसित करणे आणि अधिक कार्यक्षम बनण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन करण्याबाबत विस्तृत चर्चा झाली.

विविध मंत्रालयांद्वारे हाती घेण्यात आलेले सुधारणा उपक्रम त्याच गतीने चालू राहावेत आणि गुंतवणूक तसेच औद्योगिक विकासाच्या प्रोत्साहनाला विलंब करणारे अडथळे दूर करण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यवाही केली जावी यावरही चर्चा झाली.

या बैठकीला अर्थमंत्री, गृहमंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, अर्थ राज्यमंत्री आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1619636) Visitor Counter : 190