रसायन आणि खते मंत्रालय

जनौषधी केंद्र शोधण्यासाठी 3,25,000 पेक्षा जास्त लोकांकडून “जनौषधी सुगम” मोबाइल ॲपचा वापर

Posted On: 30 APR 2020 11:52AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30  एप्रिल 2020

 

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील टाळेबंदीमध्ये आपल्या जवळपासची प्रधानमंत्री जनौषधी केंद्र (पीएमजेएके) शोधून त्यात परवडणाऱ्या जेनेरिक औषधांची उपलब्धता आणि त्यांच्या किंमती जाणून घेण्यासाठी "जनौषधी सुगम मोबाइल ॲप लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत करीत आहे.

त्याद्वारे मिळणाऱ्या अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी 3,25,000 पेक्षा जास्त लोक जनौषधी सुगम मोबाइल अॅप वापरत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांचे जीवन सुलभ करण्यासाठी भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाच्या औषध विभागांतर्गत भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असलेल्या ब्युरो ऑफ फार्मा (बीपीपीआय) द्वारा प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेसाठी हे मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे. जवळपासची जनौषधी केंद्रे शोधणे, ते शोधण्यासाठी गुगल मॅपचा उपयोग करणे, जनौषधी जेनेरिक औषधे शोधणे, जेनेरिक आणि इतर नामांकित औषधांच्या किमतीमधील तफावत तसेच त्या अनुषंगाने होणारी बचत याबाबत विश्लेषण करणे इत्यादी सुविधा या ॲपद्वारे प्रदान करण्यात आल्या आहेत.

जनौषधी सुगम मोबाइल ॲप हे अँड्रॉइड आणि आय-फोन या दोन्हीवर उपलब्ध आहे. हे गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर वरून वापरकर्त्याद्वारे विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते.

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारत सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या किमतीमध्ये  900 दर्जेदार जेनेरिक-औषधे आणि 154 शस्त्रक्रिया उपकरणे तसेच इतर उपभोग्य वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेसारख्या उल्लेखनीय योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा प्रणालीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणत आहे.

सध्या देशातील 726 जिल्ह्यातील 6300 प्रधानमंत्री जनौषधी केंद्र कार्यरत आहेत. टाळेबंदीच्या काळात लोकांना कोरोना विषाणूविरोधात संरक्षण करण्यात मदत म्हणून प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या समाज माध्यमावरून जनजागृतीपर माहितीपूर्ण संदेश प्रसारित केले जात आहेत. 

 

 

M.Jaitly/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619532) Visitor Counter : 172