पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात दूरध्वनीवरुन संवाद

Posted On: 29 APR 2020 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29  एप्रिल 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भारतवासियांच्या वतीने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि समस्त बांगलादेशी नागरिकांना रमझानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.

कोविड-19 या जागतिक संसर्गजन्य आजारामुळे आशियाई प्रदेशात निर्माण झालेल्या स्थितीविषयी यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.या आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी आपापल्या देशात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दोघांनीही एकमेकांना दिली. 

सार्क देशांच्या 15 मार्च रोजी झालेल्या बैठकीत कोविड संदर्भात ज्या विशेष व्यवस्थांबाबत सदस्यांमध्ये सहमती झाली होती, त्याच्या अंमलबजावणीबाबत उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले. सार्क कोविड आपत्कालीन फंडासाठी 1.5 दशलक्ष डॉलर्सची मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी शेख हसीना यांचे आभार मानले.

कोविड-19 चा सामना करण्यासाठी आशियाई प्रदेशात समन्वयीत प्रयत्न व्हावेत यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.तसेच, बांगलादेशला वैद्यकीय साधने आणि क्षमता बांधणी अशा दोन्हीसाठी मदत केल्याबद्दल देखील त्यांनी धन्यवाद दिले.

दोन्ही देशात, रस्ते, रेल्वे, जलवाहतूक आणि हवाईमार्गे सीमापार अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु असल्याबद्दल देखील दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक आणि सामुदायिक संबंधाना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उजाळा दिला. कोविड-19 चा प्रसार रोखण्यात तसेच या संकटाचा बांगलादेशी नागरिकांचे आरोग्य आणि अर्थव्यवस्था यावर होणारा प्रभाव कमी करण्यात भारत त्यांना शक्य तेवढी मदत करेल, असे आश्वासन मोदी यांनी यावेळी दिले.  

मोदी यांनी शेख हसीना यांना तसेच बांगलादेशच्या नागरिकांना या ऐतिहासिक ‘मुजीब बौर्शो’ (शेख मुजीबुर रेहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष) मध्ये सुखी आणि निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

R.Tidke/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1619487) Visitor Counter : 181