संरक्षण मंत्रालय

कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि लॉकडाऊन नंतरच्या कार्य नियोजनात संरक्षण दलाच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम विभागाच्या आणि आयुध कारखाना मंडळाच्या सज्जतेविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आढावा

Posted On: 28 APR 2020 5:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2020

 

कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि लॉकडाऊन नंतरच्या कार्य नियोजनात संरक्षण दलाच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम विभागाच्या आणि आयुध कारखाना मंडळाच्या सज्जतेविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्हिडीओ कॉफरन्सद्वारे आढावा घेतला.

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात नवीन उत्पादनांच्या योजनाबद्ध निर्मितीत नाविन्यपूर्ण कौशल्य राबविल्याबद्दल आणि स्थानिक प्रशासनाला विविध प्रकारे मदत केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलाच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम विभागाचे कौतुक केले.

लॉकडाऊन उठविल्यानंतर वाया गेलेल्या कामकाजाच्या वेळेची शक्य तितकी भरपाई करून उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने आकस्मिक योजना तयार करण्याचे निर्देश संरक्षण मंत्र्यांनी त्यांना दिले.

लॉकडाऊन नंतरच्या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनानुसार खाजगी संरक्षण उद्योगांच्या साहाय्याने संरक्षण दलाचा सार्वजनिक क्षेत्र उपक्रम विभाग अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मोठी भूमिका बजावू शकते असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून आणि एक दिवसाच्या पगाराच्या योगदानातून  संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाने (डीडीपी), आयुध कारखाना मंडळाने आणि संरक्षण दलाच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम विभागाने (डीपीएसयू) पंतप्रधान केअर्स निधीत 77 कोटी रुपयांचे योगदान दिल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. एप्रिल 2020 मध्ये डीपीएसयूकडून पंतप्रधान केअर्स निधीत अधिक वाटा मिळण्याची अपेक्षा सूचित केली गेली होती.

या परिषदेदरम्यान, आयुध कारखाना मंडळाने (ओएफबी) अहवाल दिला आहे की त्याच्या 41 उत्पादन ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी कोविड-19 बाधित रुग्ण आढळलेला नाही. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात 100 हून अधिक व्हेंटिलेटर दुरुस्त करणे, 12,800 शरीराच्छादित तयार करणे, पीपीईच्या चाचणीसाठी विशिष्ट यंत्रे विकसित करणे, स्थानिक अधिकाऱ्यांना  6.35 लाख मास्कचा पुरवठा करणे, कोविड-19 च्या रुग्णांसाठी अरुणाचल प्रदेशला 340 खास तंबूंचा पुरवठा करणे, 1 लाख लिटर हँड सॅनिटायझरचे वितरण करणे यासारख्या कामात आयुध कारखाना मंडळाचा सहभाग आहे. ओएफबीने 10 ठिकाणी त्यांच्या रुग्णालयात 280 अलगीकरण खाटांची व्यवस्था केली आहे. याव्यतिरिक्त, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने कोविड -19 रूग्णांसाठी बंगळुरूमध्ये 93 अलगीकरण खाटांची व्यवस्था केली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने मे 2020 मध्ये 12,000 आणि जून 2020 मध्ये आणखी 18,000 व्हेंटिलेटर तयार करण्याची व्यवस्था केली आहे. हे व्हेंटिलेटर चालविण्याकरिता सुमारे 3,000 अभियंते आरोग्य व्यावसायिकांच्या प्रशिक्षणात भाग घेतील.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) 300 एरोसोल कॅबिनेट तयार केल्या आहेत आणि त्या विविध रुग्णालयात पुरविल्या आहेत. तसेच स्थलांतरित कामगारांना 56,000 मास्क्वचे वितरण करून पाठबळ दिले आहे. याव्यतिरिक्त, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) कोव्हीड-19 रुग्णांसाठी बंगळुरूमध्ये 93 अलगीकरण खाटांची व्यवस्था केली आहे. एचएएल कर्मचाऱ्यांमध्ये कोविड-19 बाधित रुग्णांची नोंद नाही.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) कंपनी व्हेंटिलेटरसाठी डिझाइनची प्रक्रिया नक्की करण्यासाठी आणि प्रारूप बनविण्यासाठी प्रख्यात वैज्ञानिकांसमवेत कार्यरत आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) मुंबईच्या नौदल विलगीकरण कक्षासाठी पाच लाख रुपयांचे पीपीई आणि औषधे दिली आहेत आणि 4,000 लिटर सॅनिटायझरचे वितरण केले आहे.

रेड झोनमध्ये नसलेल्या ओएफबी आणि डीपीएसयूच्या अनेक युनिट्सनी आधीच काम सुरू केले आहे. तीन शिफ्टमध्ये काम करण्याची योजना आखून आणि आठवड्यातील पाच ते सहा दिवसांपर्यंत कामकाजाचे दिवस वाढवून लॉकडाउन उठविल्यानंतर जवळपास सर्वच डीपीएसयूंनी उत्पादन वाढवण्याच्या आकस्मिकता योजना तयार केल्या आहेत. शारीरिक अंतर आणि इतर आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हे काम केले जाईल.

सचिव, (संरक्षण उत्पादन विभाग) राज कुमार, संरक्षण दलाच्या संरक्षण उत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ओएफबीचे वरिष्ठ अधिकारी, तसेच बीईएल, एचएएल, एमडीएल, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल), गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई), बीडीएल, हिंदुस्तान शिपयार्ड लि. (एचएसएल), मिधनी मिश्रधातू निगम लिमिटेड (मिधनी) आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतला.


* * *

M.Jaitly/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1618983) Visitor Counter : 135