कृषी मंत्रालय

लॉकडाउनमध्ये संपूर्ण देशभरात गव्हाची कापणी जोरदार सुरू


2020-21 च्या रब्बी हंगामातल्या डाळी आणि तेलबिया खरेदीचे कामही प्रगतिपथावर

Posted On: 28 APR 2020 3:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2020


संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यामुळे लॉकडाउन सुरू आहे. अशा काळातही देशाच्या सर्व भागांमध्ये गव्हाच्या कापणीचे काम जोरदार सुरू आहे. सध्या खरीपाच्या पिकांची कापणी, मळणी अशी कामे सुरू आहेत. हे काम करताना सर्व भागातले शेतकरी सामाजिक अंतर राखण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करीत कृषी कार्ये पार पाडत आहेत. भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने सर्व राज्यांना एक पत्र पाठवून आपल्या भागातल्या शेतकरी बांधवांच्या आणि शेतमजुरांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे कळवले आहे. 

देशातल्या विविध राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात 98-99 टक्के, राजस्थानात 92-95 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 85-88 टक्के, हरियाणात 55-60 टक्के, पंजाबात 60 -65 टक्के आणि उर्वरित राज्यात सरासरी 87 -88 टक्के गव्हाच्या कापणी-काढणीचे काम पूर्ण झाले आहे. 

2020-21च्या  रब्बी हंगामामध्ये किमान समर्थन मूल्य योजने अंतर्गत शेतकरी बांधवांकडून डाळी आणि तेलबियांची खरेदी सध्या केली जात आहे. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये खरेदी सुरू आहे. लॉकडाउनच्या काळात या राज्यांनी खरेदी केलेल्या डाळी आणि तेलबिया यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

  • आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमधून 72,415.82 मेट्रिकटन हरभरा डाळीची खरेदी करण्यात आली. 
  • तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि ओडिशा या सात राज्यांमधून 1,20,023.29 मेट्रिकटन तूरडाळीची खरेदी करण्यात आली. 
  • राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमधून 1,83,400.87 मेट्रिकटन मोहरीची खरेदी करण्यात आली.  

दरम्यान एनएचबी म्हणजेच राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने देशभरातील 618 एनएचबी मान्यताप्राप्त रोपवाटिकांमधून फळे आणि भाजीपाला यांच्या उपलब्ध रोपांविषयीची माहिती जमा केली आहे. ही माहिती भारतीय फलोत्पादन महासंघ (सीआयएच) आणि संबंधित विभागांना पोहोचवण्यात आली आहे. यामध्ये ग्राहक आधारित उत्पादक संघटना, राज्य फलोत्पादन अभियान, एनएचबीची राज्यांमध्ये असलेली कार्यालये यांच्याकडे उपलब्ध रोपांची माहितीही आहे. आगामी लागवडीच्या हंगामामध्ये शेतकरी बांधवांना त्यांच्या पसंतीच्या रोपांची लागवड करता यावी तसेच त्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करता यावे, यासाठी एनएचबीच्या संकेतस्थळावर (www.nhb.gov.in) गरजेची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

* * *

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1618916) Visitor Counter : 112