नवी दिल्ली, 26 एप्रिल 2020
कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनांवर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.
कोविड-19 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्सच्या ट्रौमा सेंटरला भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी एम्समध्ये कोविड-19 च्या रूग्णांसाठी विविध अत्याधुनिक कक्षांची पाहणी केली. तसेच कोविड-19 च्या रूग्णांशीही व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. रुग्णांच्या जवळ रोबोच्या माध्यमातून हा व्हिडीओ कॉल करण्यात आला होता. आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. एम्समधले उपचार आणि सुविधांविषयी देखील त्यांनी माहिती घेतली आणि सूचनाही मागवल्या.
सविस्तर आढाव्यानंतर, डॉ हर्षवर्धन यांनी, विविध कक्षातल्या कामांविषयी समाधान व्यक्त केले. कोविड-19 चे रुग्ण आणि संशयितांच्या कल्याणासाठी डिजिटल प्लेटफॉर्म आणि व्हिडीओ/ व्हाईसकॉलच्या मदतीने एम्स चोवीस तास संपूर्ण खबरदारी घेत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी जनतेला लॉकडाऊन 2.0 चे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन डॉ हर्षवर्धन यांनी केले. भारतात हॉट स्पॉट जिल्हे कमी होत असून आपण आता बिगर-हॉट स्पॉट जिल्ह्यांकडे वाटचाल करत आहोत, असे सांगत, भारतातील परिस्थिती सुधारत आहे, असे त्यांनी सांगितले.
आज कॅबिनेट सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व राज्यातले मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा केली. कोविड-19 च्या देशभरातील तयारीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. ज्या राज्यात कोविड-19 चे अधिक रुग्ण आहेत, त्या राज्यात, लॉकडाऊनच्या नियमांचे तसेच कंटेन्मेंट धोरणाचे काटेकोर पालन केले जावे, असे त्यांनी सांगितले. राज्यांनी सर्व वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवर, त्यात अलगीकरण खाटा, आयसीयू बेड्स व्हेंटीलेटर्स इत्यादिंकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
आतापर्यंत देशात 5804 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 21.90%. इतका आहे. तसेच, देशभरात सध्या कोविडचे एकूण 26,496 रुग्ण आहेत आणि 824 जणांचा या आजारात मृत्यू झाला आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor