सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

पादत्राणे उद्योगाच्या प्रतिनिधींना सर्वतोपरी साहाय्याचे नितीन गडकरी यांचे आश्वासन

Posted On: 18 APR 2020 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पादत्राणे उद्योगाला सरकारकडून सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. भारतीय पादत्राणे उद्योग महासंघाच्या प्रतिनिधींशी ते आज नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. सरकारने कालच एमएसएमई उद्योगांसाठी प्राप्तिकर विभागाकडून गेल्या दहा दिवसात मिळालेल्या परताव्याची 5024 कोटी रुपयांची रक्कम दिली असून त्यामुळे या क्षेत्राला बऱ्याच प्रमाणात मदत मिळेल.

या उद्योगाने निर्यातीच्या पर्यायावर भर द्यावा आणि निर्यातीसाठी उपलब्ध झालेल्या संधीचा वापर करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.

खेळत्या भांडवलाची कमतरता, मालवाहतुकीच्या सुविधा, कच्च्या मालाची उपलब्धता, कामाच्या ठिकाणाची स्थिती, व्यवसाय सुरू ठेवण्याच्या प्रक्रिया आणि कोविड-19 महामारीचा पादत्राणांच्या मागणीवर होणारा परिणाम या मुद्याबाबत या उद्योगांच्या प्रतिनिधींनी या बैठकीदरम्यान चिंता व्यक्त केली आणि या उद्योगाचे अस्तित्व टिकवण्यासाठी पाठबळ देणाऱ्या उपाययोजना करण्याची सरकारला विनंती केली.

लॉकडाऊननंतरही उत्पादन हळूहळू सुरू होईल आणि काही महिन्यातच पूर्ण क्षमतेची पातळी गाठेल, त्यावेळी अतिरिक्त कच्च्या मालाचा प्रश्न उपस्थित होईल, ही बाब देखील यावेळी अधोरेखित करण्यात आली. यावेळी चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालाची आयात थांबवावी जेणेकरून कच्चा मालाचा खूप जास्त साठा होणार नाही, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

सरकारने काही विशिष्ट उद्योगांना काम सुरू करण्याची परवानगी दिली असली तरीही कोविड-19 च्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी उद्योगांनी देखील आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

त्यांनी पीपीईंचा(मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज) वापर करण्यावर भर दिला आणि उद्योग सुरू करताना सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला.

या क्षेत्राला तातडीने मदत मिळवून देण्याचा मुद्दा अर्थ मंत्रालय आणि वाणीज्य मंत्रालयाकडे उपस्थित करण्याचे आश्वासन गडकरी यांनी या प्रतिनिधींना दिले. लॉकडाऊननंतर उद्योग सुरू करताना पादत्राणे उद्योगाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा आणि कोविड-19 ची आपत्ती संपुष्टात आल्यावर व्यवसायांच्या संधींचा एकत्रित शोध घेण्याची त्यांनी सूचना केली.

 

 

U.Ujgare/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1615864) Visitor Counter : 114