आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ हर्ष वर्धन यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल , दिल्लीचे आरोग्यमंत्री, दिल्लीतील विविध रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक आणि केंद्र आणि दिल्ली सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली


आजारांविरूद्ध निर्धाराने लढा देताना कोविड बाधित नसलेल्या गंभीर रुग्णांशीही तितक्याच मायेने वागण्याचे रुग्णालयांना केले आवाहन

स्वेच्छेने रक्तदान करण्यास प्रोत्साहन देऊन आणि भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या मदतीने मोबाईल रक्त संकलन व्हॅन सारख्या विविध सेवांचा वापर करुन रक्ताचा पुरेसा साठा ठेवण्याचे आवाहन

तत्काळ लक्ष देण्याची गरज असणाऱ्या रुग्णांकडे रुग्णालयांनी दुर्लक्ष केले तर दोषी आरोग्य सेवा कर्मचार्‍यांविरुद्ध  कारवाई केली जाईल: डॉ. हर्ष वर्धन

Posted On: 17 APR 2020 10:54PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

 

 “कोविड-19 विरोधातील आपल्या लढ्यात परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याबद्दल आणि व्यवस्थापनाबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, परंतु या कसोटीच्या काळात आपत्कालीन परिस्थिती आणि अन्य रुग्णांकडे आपण दुर्लक्ष करू नये,” असे हर्ष वर्धन यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल, दिल्लीचे आरोग्यमंत्री, प्रमुख केंद्र आणि राज्य सरकारी रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक (दिल्ली) आणि दिल्ली महानगरपालिका आयुक्त यांच्या बरोबर घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले.

डॉ हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे की, “कोविड-19 बाधित नसलेल्या इतर रुग्णांना म्हणजेच डायलिसिस आवश्यक असलेले रुग्णश्वसन किंवा हृदयविकारामुळे पीडित रुग्ण, ज्यांना रक्त चढवण्याची गरज आहे असे रुग्ण, आणि गरोदर माता यासारख्या रुग्णांना उपचार नाकारल्याबद्दल मला दूरध्वनी, सोशल मीडिया, ट्विटर आणि प्रिंट माध्यमांद्वारे अनेक तक्रारी येत आहेत".  “आपत्कालीन परिस्थितीत रूग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचार नाकारल्यामुळे एकापाठोपाठ एक अनेक रुग्णालयांमध्ये  त्यांना जावे लागत आहे आणि सर्वच ठिकाणी तातडीने वैद्यकीय मदत न मिळाल्यास त्यांचे प्राण जाऊ शकतात , म्हणूनच या  प्रकारांची आपण गंभीर दखल घेण्याची गरज आहे." असे ते म्हणाले. त्यांनी रुग्णालयातील सर्व एमएसना बिगर कोविड रुग्णांची कोविड-19 रुग्णांप्रमाणेच  योग्य काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. लॉकडाऊनमध्ये प्रत्येकासाठी ही कसोटीची वेळ आहे; जे रुग्ण खरोखर आजारी आहेत आणि तातडीने वैद्यकीय मदतीची गरज आहे अशा रुग्णांना या परिस्थितीत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यासाठी  अनेक अडचणीतून बाहेर पडावे लागत आहे. रक्त देणे, डायलिसिस सारख्या विशिष्ट प्रक्रिया प्रतीक्षा करू शकत नसल्यामुळे आपण त्यांना कोणत्याही प्रकारचा बहाणा करून उपचार नाकारू नये असे ते म्हणाले.

ते म्हणाले, “आम्ही एम्स आणि सफदरजंग सारख्या रुग्णालयांमध्ये आणि दिल्लीतील दोन समर्पित कोविड सरकारी रुग्णालये - एलएनजेपी आणि राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोविड-19 सुविधा समर्पित केल्या आहेत आणि  उर्वरित रुग्णालयांनी कोविड बाधित नसलेल्या रुग्णांवर उपचार करणे अपेक्षित आहे .

ते म्हणाले, “आरोग्यआणि  कुटुंब कल्याण मंत्रालयाने या प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीत आरोग्य सेवा प्रणालीची अभूतपूर्व मागणी पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक आरोग्य सेवा सेवा पुरविण्याबाबत विस्तृत मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. अशा रूग्णांना दूरध्वनी-सल्लामसलत, डिजिटल प्रिस्क्रिप्शन आणि औषधांची घरपोच सेवा देखील पुरविल्या जाऊ शकतात”.

या रुग्णांना लॉकडाऊनच्या काळात आधीच खूप त्रास सहन करावा लागत असल्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने आणि काळजीपूर्वक वागण्याचे त्यांनी आवाहन केले. ते म्हणाले, "असुरक्षित विभागातील लोकांसह सर्व गरजू रूग्णांवर उपचार करण्यासाठी पूर्व-सक्षम, सक्रिय आणि प्रभावी उपायांची आपल्याला आवश्यकता आहे."

त्यांनी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन आणि भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या मदतीने मोबाईल रक्त संकलन व्हॅन सारख्या विविध सेवांचा वापर करुन रक्तसंक्रमणासाठी पुरेसा रक्त साठा ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्र्यांनी इंडियन रेडक्रॉस सोसायटीला अशा मोबाईल रक्तपेढीच्या व्हॅन नियमित रक्तदात्यांच्या आवारात पाठवायला सांगितले, जेणेकरून या काळात ते रक्तदानासाठी पुढे येतील.

या व्हिडिओ कॉन्फरन्सला  विशेष सचिव संजीव कुमार, अतिरिक्त सचिव वंदना गुरनानी, सहसचिव गायत्री मिश्रा, आरोग्य सेवा महासंचालक डॉ. राजीव गर्ग आणि आरएमएल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor


(Release ID: 1615556) Visitor Counter : 271