संरक्षण मंत्रालय

कोविड-19 निर्जंतुकीकरण प्रक्रिया सक्षमीकरणासाठी डीआरडीओची दोन नवीन उत्पादने

Posted On: 17 APR 2020 5:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

 

डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्यावतीने कोविड-19च्या विरुद्ध लढा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या आणि अनुभवाच्या मदतीने ही संस्था शस्त्रास्त्रे तसेच इतर अनेक उत्पादने विकसित करीत आहे. यामध्ये नवसंकल्पनांचाही समावेश आहे. त्याचबरोबर सध्याच्या काळाची गरत लक्षात घेवून आवश्यकतेप्रमाणे उत्पादनात बदल घडवून नवीन उपयुक्त ठरतील अशी उत्पादने विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. कोविड-19 महामारीचा प्रसार सार्वजनिक स्थानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाढू शकतो, हे लक्षात घेवून सार्वजनिक स्थानांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यसाठी डीआरडीओने दोन नवीन उत्पादने विकसित केली आहेत.

 

धुके तयार करून त्याव्दारे निर्जंतुकीकरणासाठी रसायनाची फवारणी करणारे स्वयंचलित यंत्र

सीएफईईएस म्हणजेच सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी या दिल्लीच्या संस्थेने अग्निरोधनासाठी धुके तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वयंचलित निर्जंतुकीकरण रसायनाची फवारणी यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र चालवण्यासाठी कोणत्याही मनुष्यबळाचा वापर करावा लागत नाही. की त्याला स्पर्शही करण्याची गरज नाही. ते स्वयंचलित आहे. त्यामुळे या यंत्राच्या मदतीने इमारती, कार्यालये यामध्ये प्रवेश करताना अल्कोहोलयुक्त निर्जंतुक करणाऱ्या रसायनाच्या द्रावणाने हात एकमेकांवर घासून आत जाणे सुरक्षित ठरणार आहे. या द्रावणामध्ये जलयुक्त धूर तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे हातावर घेतलेले रसायनिक द्रावण उडून जाते. निर्जंतुकीकरणाचे काम होते, मात्र हात धुण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागत नाही.

या यंत्रामध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्याजवळ हात नेले की, अल्कोहोलयुक्त रसायनिक द्रावण आपल्या हातावर पडण्यासाठी धुके तयार होते. एका‘नोजल’सदृश नलिकेव्दारे त्यातून द्रावण बाहेर येते. दोन्ही हात एकमेकांवर घासले की, हात स्वच्छ निर्जंतूक होतात. स्वयंचलित सूक्ष्मतुषारकांच्या फवाऱ्यातून 12 सेकंदासाठी 5 ते 6 मिलीलीटर रसायनिक द्रावण एका प्रक्रियेसाठी बाहेर येते. दोन्ही तळहातांवर चांगल्या पद्धतीने त्याची फवारणी केली जाते, आणि हाताच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण होते.

हे यंत्र हाताळण्यासाठी सोईचे आणि लहान आहे. त्याचबरोबर त्यामध्ये भरपूर प्रमाणावर द्रावण भरता येते. आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि दीर्घकाळ काम करणारे हे यंत्र आहे. कार्यालये, संस्था यांच्या प्रवेशव्दाराजवळच भिंतीवर बसवणे किंवा एखादा उंचवटा करून यंत्र ठेवणेही सहज शक्य आहे. निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे किंवा संपली हे दर्शवणारी एलईडी प्रकाशयोजना या यंत्रामध्ये आहे.

या यंत्राचे उत्पादन नोएडाच्या मेसर्स रायट लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या मदतीने करण्यात आले असून डीआरडीओ भवनामध्ये असे एक यंत्र बसवण्यात आले आहे. या यंत्राचा वापर रुग्णालये, मॉल्स, कार्यालयीन इमारती, निवासी इमारती,विमानतळ, मेट्रो, रेल्वे आणि बस स्थानकांवर तसेच इतर आस्थापनांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आणि तिथून बाहेर पडताना करता येईल. तसेच विलगीकरण केंद्रांमध्येही हे यंत्र उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.

 

अतिनील स्वच्छता खोके आणि हातात पकडण्याचे अतिनील उपकरण

डीआयपीएएस म्हणजेच डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजियोलॉजी अँड अलाइड सायन्स तसेच आयएनएमएएस म्हणजेच न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स, दिल्लीची डीआरडीओ प्रयोगशाळा यांनी अतिनील स्वच्छता कक्ष आणि हातात पकडण्याचे अतिनील उपकरण तयार केले आहे. या उपकरणामध्ये वेव्हलेंथ 254 नॅनोमीटर्सच्या क्षमतेचे अतिनील किरण असतात.  ‘अतिनील-सी’मधून अगदी कमी कालावधीसाठी परंतु जास्त ऊर्जावान वेव्हलेंथचे प्रकाश किरण बाहेर पडतात. या किरणांमुळे कोविड-19 च्या विषाणूंमधली जनुकीय क्षमता-सामुग्री नष्ट होण्यास मदत होते. या किरणांमुळे आरएनएच्या संरचनेला वेढा घातला जातो. त्यामुळे विषाणूंचा प्रसार  करण्यास प्रतिबंध घातला जातो. ‘अतिनील-सी’ मुळे अतिशय वेगाने सूक्ष्मजीवाणू मृत होतात. ‘अतिनील-सी’चा उपयोग केला तर वस्तू स्वच्छ करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे होणारा दुष्परिणाम टाळता येतो. तसेच ‘अतिनील-सी’चा पर्याय हा पर्यावरणास्नेही असणार आहे. कोणत्याही प्रकारचा संपर्क न करता परिणामकारक स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्याची ही पद्धत आहे.

अतिनील-सी’ खोके हे मोबाईल फोनटॅब्लेट, पर्स, चलन,ऑफिसच्या फाइल्सचे कव्हर यांच्या निर्जंतुकीकरणासाठी विकसित केले आहे. ‘यूव्हीसी’ दिवा या  खोक्यात बसवण्यात आला आहे. या दिव्याच्या प्रकाश किरणांमुळे रोजच्या वापरातल्या सर्व वस्तू एका मिनिटात ‘निर्जंतूक करता येणार आहेत. या वस्तूंवर जर कोविड-19चे विषाणू असतील तर‘अतिनील-सी’मुळे ते निष्क्रिय होवू शकणार आहेत. या खोक्यामध्ये 185 एनएम किरणांचे उत्सर्जन करून ओझोन तयार केला जातो. खोक्यात ठेवलेल्या वस्तूंच्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण यामुळे होते.

हातामध्ये धरता येणारे एक यंत्र विकसित करण्यात आले असून त्याच्या मदतीले दोन इंचापेक्षाही कमी अंतरावर असलेल्या गोष्टी निर्जंतूक करता येतात. या यंत्रामध्ये आठ वॅटचा यूव्ही-सी दिवा बसवण्यात आला आहे. यामध्ये खूर्ची,फाइल्स, पोस्टाने आलेली पाकिटे, अन्नाची पाकिटे अशा वस्तूंवर 45 सेकंद यंत्र धरले की, त्या वस्तू निर्जंतूक होतात. या यंत्राचा उपयोग कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी केला गेला तर कोरोनाचा विषाणू प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Kor(Release ID: 1615378) Visitor Counter : 191