शिक्षण मंत्रालय

शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना घरबसल्या प्रभावीपणे शिक्षण देता यावे, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेने स्वीकारली अनोखी पद्धत


कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर स्वयंप्रभा डीटीएच वाहिन्यांद्वारे केव्हीएस, एनव्हीएस, सीबीएसई आणि एनसीईआरटी यांच्यासह संयुक्तपणे स्काईपच्या माध्यमातून थेट सत्रांचे प्रसारण

Posted On: 14 APR 2020 5:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

 

कोविड -19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांवर होऊ नये, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काही नवे, वैशिष्ट्यपूर्ण आणि तातडीचे उपक्रम हाती घेतले आहेत.

शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना घरबसल्या प्रभावीपणे शिक्षण देता यावे, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेने एक अनोखी पद्धत सुरू केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'स्वयम' या एमओओसी मंचाद्वारे इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांचा मजकूर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला असून, त्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाचे उद्दीष्ट साध्य केले जात आहे. या 'स्वयम' पोर्टलवर स्व-शिक्षण साहित्याबरोबरच व्हिडीओ लेक्चर्स तसेच स्व-मूल्यांकनाची सुविधाही प्रदान करण्यात आली आहे. चर्चा मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शंका सोडविल्या जात आहेत.

याव्यतिरिक्त, ज्यांच्याकडे इंटरनेट उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वयंप्रभा दूरचित्रवाणी वाहिनीवरून व्हिडीओ लेक्चर्स प्रसारित केले जातात, तसेच शिक्षक आणि विषय तज्ञांशी संवाद साधता यावा, यासाठी थेट प्रसारणाची सत्रेही प्रसारित केली जातात.

जेईई आणि एनईईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरत आहे.

देशभरात कोविड -19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था, स्काईपद्वारे केव्हिस, एनव्हीएस तसेच सीबीएसई आणि एनसीईआरटी यांच्यासोबत संयुक्तपणे स्वयंप्रभा डीटीएच वाहिनी पाणिनी (# 27), एनआयओएसची शारदा वाहिनी (# 28) आणि एनसीईआरटीची किशोर मंच वाहिनी (# 31) च्या माध्यमातून थेट सत्राचे प्रसारण करते आहे. त्यामुळे आता विषयतज्ञ स्वयंप्रभाच्या माध्यमातून स्काईपद्वारे आपापल्या घरातून थेट प्रक्षेपणासाठी उपलब्ध होत आहेत.

या डीटीएच वाहिन्या आणि एनआयओएस यूट्यूब वाहिन्यांवर विद्यार्थ्यांना सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत ध्वनिमुद्रित शैक्षणिक कार्यक्रम पाहता येतात, त्यानंतर दुपारी एक ते संध्याकाळी सात असे सहा तास, चार वेगवेगळ्या विषयांचे तज्ञ प्रत्येकी दीड तासाचे सत्र घेतात, या सत्रांचे थेट प्रसारण केले जाते. या थेट सत्रादरम्यान स्क्रिनवर दिलेल्या फोन क्रमांकावर फोन करून तसेच एनआयओएसच्या 'स्टुडंट पोर्टल'द्वारे विद्यार्थ्यांना आपले प्रश्न संबंधित विषय तज्ञांना विचारता येतात.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांच्या विनंतीनुसार टाटा स्काय आणि एअरटेल डीटीएच ऑपरेटर्सनी आपापल्या डीटीएच प्लॅटफॉर्मवर तीन स्वयंप्रभा डीटीएच वाहिन्या प्रसारित करण्यास सहमती दर्शविली आहे. आता डीडी-डीटीएच आणि जिओ टीव्ही अ‍ॅप व्यतिरिक्त सर्व डीटीएच सेवा प्रदात्यांच्या माध्यमातून या तीन्ही स्वयंप्रभा डीटीएच वाहिन्या उपलब्ध आहेत. या वाहिन्या नि:शुल्क असल्यामुळे कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता लोक आपल्या डीटीएच सेवा प्रदात्याला या वाहिन्या उपलब्ध करून देण्याची विनंती करू शकतात. कोविड – 19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या या कठीण परिस्थितीतही, या उपक्रमांमुळे, विद्यार्थी आपले शिक्षण सुरू ठेवू शकतात.

विविध डीटीएच सेवा प्रदात्यांमार्फत पुढील वाहिन्यांवर ही सेवा उपलब्ध आहे:

एअरटेल टीव्ही: वाहिनी # 437, वाहिनी # 438 & वाहिनी # 439

व्हीएम व्हीडीयोकॉन: वाहिनी # 475, वाहिनी # 476, वाहिनी # 477

टाटा स्काय: वाहिनी # 756 स्वयंप्रभा डीटीएच वाहिनीसाठी पॉप अप होणारी विंडो.

डीश टीव्ही: वाहिनी # 946, वाहिनी # 947, वाहिनी # 949, वाहिनी # 950

ज्यांच्या घरी इंटरनेट उपलब्ध नाही, अशांसाठी स्वयंप्रभा हे शिक्षण घेण्याचे एक प्रभावी साधन आहे. स्वयंप्रभा हा 32 डीटीएच वाहिन्यांचा समूह असून, जीएसएटी -15 उपग्रहाच्या माध्यमातून 24 तास उच्च-प्रतिच्या दर्जेदार शैक्षणिक कार्यक्रमांच्या प्रसारणासाठी तो समर्पित आहे. त्यावरून दररोज किमान 4 तास अवधीचे नवे कार्यक्रम प्रसारित होतात, ज्यांचे दिवसभरात पाच वेळा पुन:प्रसारण केले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळी ते कार्यक्रम पाहता येतात. BISAG, गांधीनगर येथून या वाहिन्यांचे सहक्षेपण केले जाते. या वाहिन्यांसाठी एनपीटीईएल, आयआयटी, यूजीसी, सीईसी, इग्नू, एनसीईआरटी आणि एनआयओएस तर्फे मजकूर/माहिती पुरवली जाते. INFLIBNET सेंटरतर्फे या वेब पोर्टलची देखभाल केली जाते. या सर्व 32 वाहिन्या डीडी डीटीएच आणि जियो टीव्ही मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत.

 

डीटीएच वाहिन्यांवर पुढील बाबी समाविष्ट आहेत :

अ) उच्च शिक्षण: कला, विज्ञान, वाणिज्य, उपयोजित कला, सामाजिक विज्ञान आणि मानव्यविद्या, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विधी, वैद्यकशास्त्र, शेती अशा विविध शाखांचे पदव्युत्तर आणि पदवीपूर्व स्तरावरील अभ्यासक्रमांवर आधारित मजकूर उपलब्ध आहे. एमओसीसी अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी विकसित स्वयम मंचाच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ब) शालेय शिक्षण (इयत्ता नववी ते बारावी): शिक्षक प्रशिक्षणाबरोबरच देशातील विद्यार्थ्यांनाही शिक्षण तसेच शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने संबंधित विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते. त्याचबरोबर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी स्पर्धात्मक परीक्षांच्या पूर्वतयारीसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरतो.

क) पाठ्यक्रमावर आधारित अभ्यासक्रम, जे भारतातील आणि भारताबाहेरील नागरिकांची निरंतर शिक्षण घेण्याची आवश्यकता पूर्ण करतात.

ड) विद्यार्थ्यांना (इयत्ता अकरावी आणि बारावी) स्पर्धा परिक्षांच्या पूर्वतयारीसाठी उपयुक्त.

सीईसी-युजीसी तर्फे 01-10 वाहिन्यांचे व्यवस्थापन केले जाते

एनपीटीईएल तर्फे 11 ते 18 वाहिन्यांचे व्यवस्थापन केले जाते

आयआयटी दिल्ली तर्फे माध्यमिकच्या विद्यार्थांसाठी 19 ते 22 वाहिन्यांचे व्यवस्थापन केले जाते, त्यास आयआयटी –पाल (PAL) असे म्हटले जाते.

इग्नू नवी दिल्ली तर्फे 23, 24, 25 आणि 26 या वाहिन्यांचे व्यवस्थापन केले जाते

एनआयओएस नवी दिल्ली तर्फे 27, 28 आणि 30 या वाहिन्यांचे व्यवस्थापन केले जाते

युजीसी - INFLIBNET  गांधीनगर तर्फे 29 या वाहिनीचे व्यवस्थापन केले जाते.

एनसीईआरटी तर्फे 31 या वाहिनीचे व्यवस्थापन केले जाते.

इग्नू आणि एनआयओएस तर्फे संयुक्तपणे 32 या वाहिनीचे व्यवस्थापन केले जाते.

स्वयंप्रभा वाहिनीच्या अधिक तपशिलांसाठी पुढील दुवा पाहा. https://www.swayamprabha.gov.in/index.php/ch_allocation

 

G.Chippalkatti/M.Pange/P.Kor


(Release ID: 1614388) Visitor Counter : 436