गृह मंत्रालय
कोविड 19 विरुद्धच्या लढयात पुकारलेला देशव्यापी लॉकडाऊन 3 में पर्यंत वाढवण्याचा निर्णय जनसामान्यांच्या आयुष्याचे संरक्षण करण्यासाठी–अमित शहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतेने जगासमोर कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील एक उदाहरण प्रस्थापित केले आहे–गृहमंत्री
कोविड-19 विरुद्धच्या लढाईत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये कौतुकास्पद समन्वय- गृहमंत्री
कोविड-19 लढाईत आघाडीवर असणाऱ्या आरोग्यसेवा व्यवसायिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सलाम- गृहमंत्री
देशात अन्न, औषधे आणि इतर दैनंदिन आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा, कोणत्याही नागरिकाने घाबरून जाण्याची गरज नाही- अमित शहा
Posted On:
14 APR 2020 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020
केंद्र सरकारने कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार व्यक्त करत म्हंटले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 चा प्रसार थांबवण्यासाठी आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याचा हा निर्णय देशवासियांच्या आयुष्याचे संरक्षण करण्यासाठी घेतला आहे.
कोविड-19 चा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करताना शहा म्हणाले की, आज संपूर्ण जग या जागतिक महामारीचा सामना करीत आहे आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वात भारतीय जनतेने या आजाराशी लढा देण्याकरिता संपूर्ण जगासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. सरकारने योग्यवेळी घेतलेले निर्णय आणि त्यातील लोकसहभाग यामधून हे दिसून येते, असे ते म्हणाले.
या महामारीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्यातील समन्वय किती महत्वाचा आहे हे सांगताना गृहमंत्री म्हणाले, ज्याप्रकारे सर्व राज्य सरकारे केंद्र सरकारच्या सोबत काम करत आहे ते खरेच खूप कौतुकास्पद आहे. हा समन्वय अधिक दृढ करणे आवश्यक आहे जेणेकरुन सर्व नागरिक लॉकडाऊन योग्य प्रकारे पाळतील आणि कोणालाही त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करताना कोणतीही अडचण येणार नाही, असेही ते म्हणाले.
कोविड-19 विरुद्धच्या लढाईत आघाडीवर काम करणाऱ्या आरोग्यसेवा व्यवसायिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सलाम करत शहा म्हणाले की, या लढाईत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे आमचे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार, पोलिस आणि सर्व सुरक्षा कर्मचारी यांचे योगदान अतिशय हृदयस्पर्शी आहे. या कठीण काळातील त्यांचे धैर्य आणि समजूतदारपणा सर्व भारतीयांना प्रेरणा देत आहे. सर्व नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्यांना सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.
या संकट समयी देशातील नागरिकांना आश्वस्त करताना आणि एकमेकाला सहाय्य करण्यासाठी प्रोत्साहन देताना शहा म्हणाले की, “देशाचा गृहमंत्री म्हणून मी जनतेला खात्री देतो की देशात अन्न, औषधे आणि इतर दैनंदिन आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे, त्यामळे कोणत्याही नागरिकाने घाबरून जाण्याची गरज नाही. त्यासोबतच संपन्न लोकांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांच्या आसपासच्या गरीब जनतेला मदत करावी.”
*****
G.Chippalkatti/S.Mhatre/P.Kor
(Release ID: 1614358)
Visitor Counter : 216
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam