पंतप्रधान कार्यालय
कोविड -19 चा सामना करण्याबाबत रणनीती आखण्यासाठी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढविण्याची केली सूचना
यापूर्वी आपला मंत्र ‘जान है तो जहान है’ होता, पण आता ‘जान भी जहान भी' : पंतप्रधान
विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा परिणाम जाणून घेण्यासाठी पुढील 3-4 आठवडे अतिशय महत्वाचे : पंतप्रधान
शेतमालाची विक्री सुलभ करण्यासाठी एपीएमसी कायद्यात बदल करण्यासह कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी पंतप्रधानांनी सुचवल्या विशेष उपाययोजना
कोविड -19 विरुद्धच्या आपल्या लढाईत आरोग्य सेतू ॲप हे एक आवश्यक साधन , प्रवास सुकर करण्यासाठी ई-पास म्हणून वापरता येणार ; पंतप्रधान
आरोग्य व्यावसायिकांवरील हल्ले आणि ईशान्य तसेच काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाच्या घटनांचा पंतप्रधानांनी केला निषेध
देशात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा असल्याचे पंतप्रधानांचे आश्वासन, काळाबाजार आणि साठेबाजीविरोधात दिला कडक इशारा
Posted On:
11 APR 2020 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 चा सामना करण्यासाठी रणनीती आखण्याबाबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांबरोबर साधलेला हा तिसरा संवाद आहे, यापूर्वीचा संवाद 2 एप्रिल आणि 20 मार्च 2020 रोजी झाला होता.
पंतप्रधान म्हणाले की केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोविड -19 चा परिणाम कमी होण्यात नक्कीच मदत झाली आहे , परंतु परिस्थिती वेगाने बदलत असल्यामुळे सतत दक्षता घेणे अतिशय गरजेचे आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा परिणाम जाणून घेण्यासाठी पुढील 3-4 आठवडे अतिशय महत्वाचे असल्यावर त्यांनी भर दिला आणि त्याचबरोबर या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी टीमवर्क ही गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशात अत्यावश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा आहे आणि आघाडीवर काम करत असलेल्यांना संरक्षणात्मक आणि महत्वपूर्ण उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याबद्दल पंतप्रधानांनी आश्वस्त केले. तसेच काळा बाजार आणि साठेबाजी विरोधात त्यांनी कठोर संदेश दिला. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांवरील हल्ल्याचा तसेच ईशान्य आणि काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाच्या घटनांचा पंतप्रधानांनी निषेध केला. अशा प्रकरणांचा निर्धाराने सामना करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लॉकडाउनचे उल्लंघन रोखणे आणि सामाजिक अंतर पाळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
लॉकडाउनमधून बाहेर पडण्याच्या योजनेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, लॉकडाऊनचा कालावधी आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याबाबत राज्यांमध्ये एकमत असल्याचे दिसतआहे. यापूर्वी सरकारचे ब्रीदवाक्य ‘जान है तो जहान है’ हे होते पण आता ते ‘जान भी जहान भी’ असे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्याबाबत आणि टेली-मेडिसिनद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याबाबत पंतप्रधानांनी सूचना केल्या. मंडईंमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी शेतीच्या उत्पादनांसाठी थेट विपणनास प्रोत्साहन दिले जाऊ शकते, यासाठी एपीएमसीच्या आदर्श कायद्यांमध्ये त्वरित सुधारणा करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दारात उत्पादनांची विक्री करण्यास मदत होईल.
आरोग्य सेतू ॲप मोठ्या संख्येने डाउनलोड होणे सुनिश्चित करण्यासाठी ते लोकप्रिय करायचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. दक्षिण कोरिया आणि सिंगापूर यांना कोविड ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात कसे यश मिळाले याबाबत त्यांनी माहिती दिली. या अनुभवांच्या आधारे, अॅपच्या माध्यमातून भारताने स्वत: प्रयत्न केले आहेत जे महामारी विरुद्धच्या लढ्यात भारताचे एक आवश्यक साधन असेल , असे ते म्हणाले. अॅपचा ई-पास होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली ज्यामुळे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी प्रवासाची सुविधा मिळू शकेल.
आर्थिक आव्हानांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हे संकट म्हणजे स्वयंपूर्ण होण्याची आणि देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याची संधी आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कोविड बाधित रुग्णांबाबत , सामाजिक अंतर राखण्याबाबत , आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची निर्मिती , स्थलांतरितांच्या अडचणी कमी करणे आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या महामारीचा विरुद्धच्या लढाईत संसाधनांना चालना देण्यासाठी त्यांनी केंद्राकडे आर्थिक आणि वित्तीय मदतीची देखील मागणी केली.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि केंद्र सरकारचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
(Release ID: 1613371)
Visitor Counter : 513
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam