आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 सद्यस्थिती
Posted On:
09 APR 2020 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020
देशामध्ये कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव रोखण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी भारत सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना केल्या आहेत.त्यावर अतिशय उच्च स्तरावरून देखरेख केली जात आहे.
डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज निर्माण भवन येथे कोविड-19 संदर्भात मंत्रिगटाची उच्च स्तरीय बैठक झाली. या मंत्रिगटाने कोविड-19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनासंदर्भात सखोल चर्चा केली. पीपीई, एन-95 मास्क आणि व्हेंटिलेटर्स यांच्या पुरेशा साठ्याबाबतही मंत्रिगटाने चर्चा केली. पीपीई ( पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) च्या उत्पादनासाठी देशातील 30 उत्पादकांची निवड करण्यात आली असून त्यांना 1.7 कोटी पीपीईचे उत्पादन करण्याची ऑर्डर देण्यात आली आणि त्यांचा पुरवठा देखील सुरू झाला आहे, तसेच 49000 व्हेंटिलेटर्सची ऑर्डरही देण्यात आल्याची माहिती मंत्रिगटाला देण्यात आली. हॉटस्पॉट्स आणि समूह व्यवस्थापनासोबतच देशभरात टेस्टिंग किट्सची उपलब्धता आणि चाचण्यांचे धोरण यांचा देखील मंत्रिगटाने आढावा घेतला.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा(एचसीक्यू) वापर वैद्यकीय निर्देशांनुसार (प्रिस्क्रिप्शननुसार) झाला पाहिजे आणि हृदयक्रियेतील अनियमितता आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी ते धोकादायक ठरू शकत असल्याने त्यांच्यावर या औषधाचा वापर करण्यात येऊ नये, असे निर्देश मंत्रिगटाने दिले. देशात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरेसा साठा राखण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी मंत्रिगटाला देण्यात आली.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांना आणि राज्यांच्या आरोग्य विभागांच्या समूह संसर्ग प्रतिबंध योजना व रुग्णालय सज्जता( कोविड-19 रुग्णांसाठी आयसीयू व व्हेंटिलेटर व्यवस्थापन) योजनांशी संबंधित कामांमध्ये मदत करण्यासाठी उच्चस्तरीय बहुक्षेत्रीय केंद्रीय पथके तैनात केली आहेत. ही पथके बिहार, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगण आणि उत्तर प्रदेशात तैनात आहेत.
त्या व्यतिरिक्त सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च( सीएसआयआर प्रयोगशाळा) आणि हैदराबादची सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी( सीसीएमबी प्रयोगशाळा) आणि नवी दिल्लीची इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इन्टेग्रेटिव बायॉलॉजी( आयजीआयबी) नोवेल कोरोना विषाणूच्या संपूर्ण जिनोमचे सिक्वेन्सिंग करण्यासाठी या विषाणूच्या उत्क्रांतीची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी एकत्रित काम करत आहेत.
कोविड-19 व्यवस्थापनासाठी अनेक जिल्ह्यांकडून विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत.
- कर्नाल जिल्हा:
- एका कुटुंब कार्यक्रमाचा अवलंब: कर्नालमधील कुटुंबासोबत असलेले लोक, उद्योग आणि परदेशात राहणारे लोक यांनी कर्नालमधील गरजू कुटुंबांची मदत करण्यासाठी अतिशय उदारपणे सुमारे 64 लाख रुपयांची मदत केली आहे. या जिल्ह्यातील सुमारे 13000 गरीब कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.
- वंचित समूहांना दररोज भोजनाच्या 90,000 थाळ्या वितरित करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
- घरगुती विलगीकरणात असलेल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्नाल लाईव्ह ट्रॅकर सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे आणि नीड ऑन व्हील्स या ऑनलाईन डिलिव्हरी ऍपच्या माध्यमातून स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून घाऊन विक्रेते व दूध उत्पादकांकडून फळे/ भाजीपाला व दूध उपलब्ध करून दिले जात आहे.
- लखनौ जिल्हा:
- हॉटेलांचा वापर विलगीकरण केंद्राप्रमाणे करण्याचे प्रयत्न होत आहेत.
आतापर्यंत देशातील पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 5734 झाली आहे आणि त्यापैकी 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 473 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
कोविड-19 शी सबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि नियमावली संदर्भात अधिकृत आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे पुढील संकेतस्थळाला भेट द्या.
https://www.mohfw.gov.in/.
कोविड-19 शी सबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in या ईमेलवर आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in या ईमेलवर पाठवता येतील.
कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला फोन करा. हेल्पलाईन क्रमांक: +91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री). राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1612744)
Visitor Counter : 166
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam