आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती

Posted On: 05 APR 2020 6:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020

 

देशामध्ये कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव थांबवण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना केल्या आहेत.त्यावर अतिशय उच्च स्तरावरून देखरेख केली जात आहे.

देशभरात कोविड-19 चा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, सज्जता आणि अंमलबजावणी योग्य प्रकारे होत असल्याची खातरजमा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अधिकारप्राप्त गटांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. रुग्णालये, अलगीकरण आणि विलगीकरण सुविधा, चाचण्या आणि क्रिटिकल केअर प्रशिक्षण इत्यादींची उपलब्धता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची या गटांनी यावेळी पंतप्रधानांना माहिती दिली.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल झाज्जर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला( एम्स), कोविड-19 वर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली.

झाज्जरचे 300 खाटांचा अलगीकरण कक्ष असलेले एम्स रुग्णालय पूर्णपण कोविड-19 रुग्णालय म्हणून काम करेल ज्यामुळे अलगीकरण केलेल्या रुग्णांना तातडीने आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या सुविधा देता येतील, असे त्यांनी सांगितले. या अतिशय भयंकर विषाणूचा प्रतिबंध करणारी लस तयार करण्यासाठी जगभरात अनेक तज्ञ दिवसरात्र अथक प्रयत्न करत आहेत आणि अद्याप ती लस तयार झालेली नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांचे मुख्य सचिव, सर्व जिल्ह्यांचे डीएम, एसएसपी, सीएमओ, आयडीएसपी कर्मचारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज चर्चा केली. औषधे व वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणारे उद्योग सुरळीत सुरू राहतील याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये प्रतिबंधात्मक धोरणाविषयी एक ओरिएन्टेशन अर्थात प्रारंभिक माहिती देण्यात आली.

कोविड-19 व्यवस्थापन योजना तयार करण्याची सूचनाही सर्व जिल्ह्यांना देण्यात आली आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भिलवाडा, आग्रा, गौतम बुद्ध नगर, पथनमथिट्टा( केरळ), पूर्व दिल्ली आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्र या जिल्ह्यांचे जिल्हा आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या अनुभवांची परस्परांमध्ये देवाणघेवाण केली.

आजच्या तारखेपर्यंत देशभरातील 274 जिल्ह्यांमध्ये कोविड-19चा संसर्ग झाला आहे.

आयसीएमआरकडून क्लस्टर्स अर्थात कन्टेनमेंट झोन आणि स्थलांतरित/ निर्वासितांसाठी तयार केलेल्या मोठ्या निवारागृहांमध्ये कोविड-19 साठी तातडीच्या ऍन्टिबॉडी रक्त चाचण्या करण्यासंदर्भात सूचनांची नियमावली जारी करण्यात आली आहे. या सूचनांनुसार घेतलेल्या चाचण्यांचे अहवाल तातडीने आयसीएमआर पोर्टलवर पाठवण्याची खबरदारी या केंद्रानी घेतली पाहिजे. यामुळे संपर्कातून संसर्गाचा माग काढण्याची आणि वेळेवर उपचार सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल.

तसेच अलीकडेच आयसीएमआरने जारी केलेल्या नियमावलीमध्ये असे सांगण्यात आले आहे की सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोविड-19 चा फैलाव वाढू शकतो. कोविड-19 महामारीचा फैलाव वाढण्याचा धोका लक्षात घेऊन लोकांना असे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी कोविड-19 चा प्रभाव कायम असताना सार्वजनिक ठिकाणी धूरविरहित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करू नये आणि थुंकू नये.

आतापर्यंत देशात 3374 प्रकरणांची आणि 79 मृत्यूंची नोंद झाली आहे. 267 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि नियमावली संदर्भात अधिकृत आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे पुढील संकेतस्थळाला भेट द्या. https://www.mohfw.gov.in/.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक प्रश्न  technicalquery.covid19[at]gov[dot]in या ईमेलवर आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in या ईमेलवर पाठवता येतील.

कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला फोन करा. हेल्पलाईन क्रमांक: +91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री). राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी  https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.

 

B.Gokhale/ S.Patil/P.Kor


(Release ID: 1611478) Visitor Counter : 209