गोवा, 25 नोव्हेंबर 2026
पाच भाषांमध्ये 800 हून अधिक चित्रपटांचे उपशीर्षक भाषांतर करणाऱ्या प्रसिद्ध उपशीर्षककार रेख्स यांनी भारतीय चित्रपट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात उपशिर्षकांची भूमिका आणि त्यामागील कलात्मक प्रक्रिया याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. गोव्यात सुरू असलेल्या 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘वर्ड्स अक्रॉस बॉर्डर्स: सबटायटलिंग अक्रॉस कल्चर्स’ या शीर्षकाच्या मास्टरक्लास दरम्यान त्या बोलत होत्या.
उपशीर्षक लेखन हे केवळ शब्दांचे भाषांतर नसून त्यासाठी संयम, सर्जनशीलता, सांस्कृतिक जाण आणि चित्रपटातील भावभावना समजून घेण्याची संवेदनशीलता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अचूकतेचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या, “उपशिर्षक लेखनासाठी संयम आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा तपासून पहावी लागते.”

ओटीटी व्यासपीठांचा उदय होण्यापूर्वीच्या काळात, उपशीर्षके प्रामुख्याने पुरस्कार सोहळ्यांसाठी पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांसाठी तयार केले जात असत, अशी रेख्स यांनी आठवण सांगितली. मात्र, डिजिटल माध्यमांवरील चित्रपटांच्या प्रसारणामुळे उपशीर्षकांची व्याप्ती वाढली असून प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे, असे त्या म्हणाल्या. ओटीटी व्यासपीठांकडून मूळ उपशिर्षकांमध्ये बदल केले जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मूळ भाषांतराचा आशय आणि प्रामाणिकपणा जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
आपला सर्जनशील दृष्टिकोन सांगताना त्यांनी स्पष्ट केले की उपशीर्षक लेखनासाठी कोणतीही निश्चित नियमावली नाही. अनेकदा त्यासाठी स्वतःची वैयक्तिक पद्धत विकसित करावी लागते, असे त्या म्हणाल्या. गाण्यांची उपशिर्षके लिहिताना त्यात यमक असावे, याला त्या प्राधान्य देतात असे त्या म्हणाल्या. त्यामुळे प्रेक्षकांना गाण्याचे बोल आणि संवाद यांमधील फरक ओळखण्यास मदत होते. उपशीर्षकांची मांडणी करताना त्या पिरॅमिडसारखी रचना वापरतात. यात लहान वाक्य वरच्या बाजूला आणि मोठी वाक्ये त्याखाली असतात. तसेच अधिक स्पष्टपणे दिसण्यासाठी पिवळ्या रंगातील उपशीर्षकांना त्या पसंती देतात असे त्यांनी सांगितले.
उपशीर्षक लेखनातील बारकावे स्पष्ट करताना, रेख्स यांनी बोलीभाषेतील शब्दप्रयोग आणि 'डांगामारी' सारख्या गाण्यांचे भाषांतर करताना येणाऱ्या आव्हानांचा उल्लेख केला. त्यांनी 'वेशम' आणि 'वेशम' या तमिळ शब्दांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले की, उच्चारणातील एका लहानशा फरकाने अर्थ वेषांतरापासून विषापर्यंत कसा बदलू शकतो. 'कबाली'मधील आपल्या कामाची आठवण सांगताना, त्यांनी रजनीकांत यांच्या हास्याच्या विविध छटा व्यक्त करण्यासाठी 'मनमोहक हास्य' आणि 'संशयी हास्य' यांसारख्या अभिव्यक्तींचा कसा वापर केला, हे सांगितले.
उपशीर्षक लेखन हे सर्वसमावेशकतेचे महत्त्वाचे साधन असल्याचे सांगत त्यांनी श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी त्याचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. तसेच विशिष्ट संस्कृतीशी संबंधित शब्दप्रयोगाने नातेसंबंध व्यक्त करणाऱ्या संकल्पनांचे भाषांतर करताना शब्दशः भाषांतर करण्याऐवजी त्यांचा संदर्भ आणि अर्थ काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापराविषयी सावधगिरीचा इशारा देताना रेख्स म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार केलेली उपशीर्षके अनेकदा मूळ अर्थाचा विपर्यास करू शकतात, स्त्रीपुरुषवाचक संदर्भ बदलू शकतात आणि प्रसंगातील भावनिक आशय टिपण्यात अपयशी ठरू शकतात. “कृत्रिम बुद्धिमत्तेला शब्दकोशातील शब्द माहित असतात, मात्र नाट्य आणि मनातील भावना त्याला समजत नाहीत.” असे त्या म्हणाल्या. यातून उपशीर्षक लेखनात मानवी सर्जनशीलतेचे महत्त्व आजही कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
"उपशीर्षके ही पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेतील केवळ उरलेले काम नाही," असे सांगत त्यांनी उत्तम उपशीर्षकांमधून केवळ संवादांचे पुनरुत्पादन न होता चित्रपटाचा आशय आणि भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यावर भर दिला. उपशिर्षकांमुळे कथा भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून जगभरातील प्रेक्षकांशी जोडल्या जातात असे त्या म्हणाल्या.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे