गोवा, 22 नोव्हेंबर 2026
तुरुंगामध्ये अनेक वर्षे घालवल्यानंतर समाजात परत येणाऱ्या लोकांना बहुतेकदा त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी तसेच त्यांच्या भूतकाळाचे ओझे झुगारुन देण्यासाठी मूक संघर्षांचा सामना करावा लागतो, असे मत रशियातील चित्रपटनिर्माते निकिता गृशीन यांनी व्यक्त केले.गोवा येथे आयोजित 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आयोजित केलेल्या ‘न्यू होम’ या चित्रपटाशी संबंधित पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या दिग्दर्शक या नात्याने ते बोलत होते. इफ्फी 2026 मध्ये 101 मिनिटे कालावधीच्या. या रशियन भाषेतील चित्रपटाचा जागतिक प्रीमियर सादर होत असून हा चित्रपट महोत्सवाचा भागीदार देश म्हणून रशिया सादर करत असलेल्या विशेष प्रदर्शन विभागाचा भाग आहे.
_20261122142216_912f69.jpeg)
या चित्रपटाच्या मागील प्रेरणा समजावून सांगत गृशीन म्हणाले की, प्रदीर्घ काळ तुरुंगवासात राहिल्यानंतर पुनर्वसन प्रक्रियेतून जाणाऱ्या लोकांशी झालेल्या संवादांतून त्यांना या लोकांना समाजात पुन्हा सामावून जाण्यात येणाऱ्या अडचणींची कल्पना आली. त्यांना वाटले की, या अनुभवांकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही आणि म्हणून त्यांना त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर होणाऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून या लोकांच्या कहाण्या अधिक व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवायच्या होत्या. हा चित्रपट तुरुंगवासानंतर स्वतःचे आयुष्य पुन्हा सामान्यपणे सुरु करण्याचा आणि आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणारे पुरुष आणि स्त्रिया असा दोन्हींचा संघर्ष आपल्यासमोर मांडतो.
गृशीन यांनी लिहिलेला आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेला ‘न्यू होम’ (नॉव्ही डोम) हा चित्रपट सात वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटका झालेल्या आणि जवळ पैसे, कुटुंब किंवा जगण्याची स्पष्ट दिशा नसलेल्या अॅन्ना या स्त्रीची कहाणी सांगतो. एका समाजसेवी संस्थेकडून मदत मिळाल्यानंतर तिला रोजगार, निवारा आणि एक आधार गट सापडतो, जिथे तिची भेट रोमनशी होते. त्याच्या मदतीने ती तिचे आयुष्य हळूहळू पुन्हा सुरु करण्याच्या प्रयत्नात असतानाच तिला तिचे भविष्य ठरवणाऱ्या काही कठीण निवडीआधी तिचा भूतकाळ आणि अंतर्गत संघर्ष यांचा सामना करावा लागतो. हा चित्रपट अपराधीपणाची भावना, क्षमाशीलता, पुनर्वसन आणि दुसरी संधी मिळण्याची शक्यता अशा विविध संकल्पनांचा मागोवा घेतो.
या चित्रपटातील मध्यवर्ती पात्राच्या विकासाबद्दल बोलताना गृशीन यांनी स्पष्ट केले की, अॅन्नाचे पात्र कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीवर बेतलेले नाही. त्याऐवजी, त्यांनी अशाच प्रकारच्या परिस्थितींना तोंड दिलेल्या आणि स्वतःची आयुष्ये पुन्हा उभी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनेक लोकांशी झालेल्या संवादातून या पात्राची प्रेरणा घेतली.वास्तव जीवनातील ही निरीक्षणे चित्रपटाच्या कथेचा पाया बनली ज्यावर गृशीन यांनी स्वतःचे लिखाण आणि सर्जनशील पद्धतीने अर्थ लावण्यातून चित्रपटाची कथा तयार केली.

चित्रपटाच्या मुख्य संदेशावर भाष्य करताना दिग्दर्शक म्हणाले की, तुरुंगातून बाहेर पडणाऱ्या लोकांसमोरील आव्हाने कोणत्याही एका देशापुरती किंवा समाजापुरती मर्यादित नाहीत. शिक्षा पूर्ण केल्यानंतरही अनेकांच्या मनात अपराधीपणाची खोल भावना कायम राहते, ज्याचा परिणाम त्यांच्या निर्णयांवर होतो आणि त्यांना पुढे जाण्यापासून रोखते. अॅनाच्या प्रवासातून, व्यक्ती या भावनिक ओझ्याचा सामना कसा करतात आणि नव्याने सुरुवात करण्याचे धैर्य कसे मिळवतात, हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
पत्रकार परिषदेत दिग्दर्शकांसोबत उपस्थित असलेल्या छायाचित्रकार एकातेरिना स्मोलिना यांनी त्यांच्या सर्जनशील भागीदारीबद्दल सांगितले. फिल्म स्कूलपासूनच्या त्यांच्या ओळखीची आठवण करून देत त्या म्हणाल्या की, त्यांनी यापूर्वी तीन लघुपटांसाठी एकत्र काम केले आहे. त्यांची दीर्घकाळची मैत्री आणि एकमेकांच्या काम करण्याच्या पद्धतीची माहिती यामुळे सेटवर सहज समन्वय साधला गेला, ज्यामुळे निर्मिती प्रक्रिया सोयीस्कर आणि समाधानकारक झाली.
चित्रपट छायाचित्रण क्षेत्रात येणाऱ्या महिलांसमोरील आव्हानांबद्दल विचारले असता, स्मोलिना यांनी आठवण करून दिली की त्यांनाही सुरुवातीला भीती आणि अनिश्चिततेचा अनुभव आला होता. तथापि, त्यांनी हळूहळू या शंकांवर मात केली आणि उदयोन्मुख महिला छायाचित्रकारांना सुरुवातीच्या भीतीमुळे मागे न हटता आत्मविश्वास आणि जिद्दीने या व्यवसायाकडे पाहण्याचे आवाहन केले.
_20261122142259_bd0f2c.jpeg)
भारतीय आणि रशियन चित्रपटसृष्टीतील अधिक सहकार्याच्या संधींबद्दल बोलताना ग्रुशिन यांनी दोन्ही देशांमधील दीर्घकालीन चित्रपट संबंधांची आठवण करून दिली. भारतीय चित्रपटांना सोव्हिएत युनियनमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली होती आणि रशियन प्रेक्षकांच्या मनात त्यांचे विशेष स्थान कायम आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
ग्रुशिन यांनी भविष्यातील भारत-रशिया चित्रपट भागीदारीच्या क्षमतेबद्दल आशावाद व्यक्त केला आणि हे सहकार्य केवळ आर्थिक गुंतवणूक आणि तांत्रिक देवाणघेवाणीपुरते मर्यादित राहू नये, यावर भर दिला. दोन्ही देशांतील जनतेमधील संबंध अधोरेखित करणाऱ्या कथा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण मजबूत सर्जनशील भागीदारीसाठी अर्थपूर्ण पाया ठरू शकतात, असे ते म्हणाले.
अॅनाच्या प्रवासातून 'न्यू होम' हा चित्रपट राष्ट्रीय आणि सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाणारा मानवी अनुभव समोर आणतो, जो म्हणजे सन्मान, स्वीकृती आणि नव्याने सुरुवात करण्याची संधी शोधणे. इफ्फी 2026 च्या 'स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स' या संकल्पनेला अनुसरून, हा चित्रपट विविध वास्तव जवळ आणण्याची, सहानुभूती निर्माण करण्याची आणि सामायिक मानवी अनुभवांद्वारे प्रेक्षकांना जोडण्याची सिनेमाची क्षमता अधोरेखित करतो. रशियाच्या भागीदार देश विशेष विभागाचा भाग म्हणून या चित्रपटाचे सादरीकरण सांस्कृतिक सामंजस्य दृढ करण्यात आणि भारत व जगामधील सर्जनशील देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यात महोत्सवाची भूमिका दर्शवते. या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन किरण मुरली यांनी केले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/संजना चिटणीस/नितीन गायकवाड//दर्शना राणे