आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
पश्चिम बंगाल, ओदिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या चार मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंत्रिमंडळाने दिली मंजुरी, भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे 410 किलोमीटरची वाढ
या प्रकल्पांसाठी एकूण अंदाजित खर्च 9,450 कोटी रुपये अपेक्षित असून, सर्व कामे 2030-31 पर्यंत केली जाणार पूर्ण
Posted On:
19 AUG 2026 5:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 9,450 कोटी रुपये एकूण खर्चाच्या चार प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- खरगपूर – भद्रक (राणीताल) चौथी मार्गिका – 173 किमी (पश्चिम बंगाल आणि ओदिशा)
- भद्रक – हरिदासपूर चौथी लाईन – 75 किमी (ओदिशा)
- गुम्मिडीपुंडी – गुडूर तिसरी आणि चौथी मार्गिका – 90 किमी (आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू)
- कटक – पारादीप (बडाबांधा) तिसरी आणि चौथी मार्गिका - 72 किमी (ओदिशा)
रेल्वे मार्गिकांची क्षमता वाढल्यामुळे प्रवास आणि वाहतूक अधिक सुलभ होऊन भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि सेवांची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढेल. या मल्टीट्रॅकिंग प्रकल्पामुळे रेल्वे वाहतुकीचे व्यवस्थापन अधिक सुरळीत होण्यास तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नव्या भारताच्या दृष्टिकोना'शी सुसंगत आहेत. या भागाचा सर्वांगीण विकास साधून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्याच्या माध्यमातून या प्रदेशातील नागरिकांना ‘आत्मनिर्भर’ बनवण्यास हे प्रकल्प हातभार लावतील.
हे प्रकल्प पीएम गति शक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्यानुसार नियोजित असून, एकात्मिक नियोजन आणि भागधारकांशी सल्लामसलत करून बहुमार्गीय संपर्क आणि ‘लॉजिस्टिक’ म्हणजेच माल आणि इतर वाहतूक कार्यक्षमता वाढवण्यावर त्यांचा भर आहे. हे प्रकल्प लोक, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड संपर्क देतील.
पश्चिम बंगाल, ओदिशा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये नियोजित हे चार प्रकल्प भारतीय रेल्वेच्या सध्याच्या जाळ्यात सुमारे 410 किलोमीटरची भर घालतील. प्रस्तावित बहुमार्गीकरण प्रकल्पांमुळे सुमारे 60 लाख लोकसंख्या असलेल्या जवळपास 6448 गावांशी संपर्क बळकट होईल.
प्रस्तावित क्षमता वाढीमुळे देशभरातील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांना रेल्वेने जोडून घेता येईल. यामध्ये कुलडीहा वन्यजीव अभयारण्य, भितरकणिका राष्ट्रीय उद्यान, माँ भद्रकाली मंदिर, माँ धामराई मंदिर, पंचलिंगेश्वर मंदिर, तालसरी–उदयपूर आणि चांदीपूर समुद्रकिनारा, पुलिकत सरोवर, नेलापट्टू पक्षी अभयारण्य, भगवान वीरराघव पेरुमाळ मंदिर, गडा कुजंगा जगन्नाथ मंदिर, सराळा मंदिर, धवलेश्वर मंदिर, ललितगिरी (एक बौद्ध स्थळ) इत्यादींचा समावेश आहे.
प्रस्तावित प्रकल्प हे कोळसा, लोह खनिज, सिमेंट, लोखंड आणि पोलाद, कंटेनर, वाहने, अन्नधान्य इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी अत्यावश्यक मार्ग आहेत. या क्षमता वाढीच्या कामांमुळे 76 दशलक्ष टन प्रति वर्ष इतकी अतिरिक्त माल वाहतूक शक्य होईल. रेल्वे ही पर्यावरणस्नेही आणि ऊर्जा-कार्यक्षम वाहतुकीची पद्धत असल्याने, यामुळे देशाला हवामान उद्दिष्टे साध्य करण्यास आणि लॉजिस्टिक खर्च कमी करण्यास मदत होईल, तसेच तेलाची आयात (सुमारे 13 कोटी लीटर) कमी होईल आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन (सुमारे 65 कोटी किलो) कमी होईल, हे सुमारे 2.6 कोटी झाडे लावण्याइतके आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2301260)
अभ्यागत कक्ष : 66
Read this releasein:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu_Vw
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam