उपराष्ट्रपती कार्यालय
तामिळनाडूत तिरुवरुर इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्या 11 व्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन उपस्थित
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2026 4:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2026
तामिळनाडूतील तिरुवरुर इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्या 11 व्या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपतींनी पदवी मिळवून आपल्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा गाठणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तिरुवरूर हे शहर, भव्य त्यागराज मंदिराचे माहेरघर आणि अत्यंत पवित्र शहर असून, अनेक शतकांपासून अध्यात्म, विद्वत्ता आणि कलात्मक उत्कृष्टतेचे केंद्र राहिले आहे, असे राधाकृष्णन म्हणाले.
गेल्या बारा वर्षांत उच्च शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याचे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. देशभरातील दीक्षांत समारंभांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक महिला पदवी आणि पदके मिळवताना आपल्याला अनेकदा दिसतात, असे सांगत, हा एक स्वागतार्ह बदल असल्याचे, उपराष्ट्रपती म्हणाले.
आजच्या काळातील शिक्षणाचे मूल्यमापन केवळ परीक्षा किंवा गुणांच्या आधारे करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
“स्वतंत्रपणे विचार करण्याची, प्रभावी संवाद साधण्याची, सहकार्याने काम करण्याची आणि आयुष्यभर शिकत राहण्याची क्षमता यावरून शिक्षणाचे मूल्यमापन झाले पाहिजे.” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी “ड्रग्जला म्हणजेच अंमली पदार्थांच्या सेवनाला नकार द्या” या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार करताना, आपल्या मित्रांनाही अंमली पदार्थांच्या गैरवापरापासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रत्येक पदवीधराला यश, समाधान, उत्तम आरोग्य आणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान दिल्याचे समाधान लाभावे, अशा शुभेच्छा, उपराष्ट्रतींनी विद्यार्थ्यांना दिल्या.
या दीक्षांत समारंभात एकूण 1,103 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विशेष कामगिरी करणाऱ्या 50 सुवर्णपदक विजेत्यांचा समावेश आहे. एकूण 1,103 पदवीधरांपैकी 616 महिला आहेत. तसेच 50 पैकी 37 सुवर्णपदके महिलांनी मिळवली आहेत.
* * *
सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300461)
आगंतुक पटल : 11