माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाची चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती भवनात पाच स्मरणिकांचे प्रकाशन


या स्मरणिका सर्वसमावेशक लोकशाहीवर देशाचा असलेला विश्वास प्रतिबिंबित करतात आणि नागरिकांना भारताच्या वारशाचा अभिमान बाळगण्यास प्रेरित करतात: द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या शालीनता, नम्रता, विद्वत्ता आणि संविधानाप्रती असलेल्या अढळ निष्ठेद्वारे सर्वोच्च घटनात्मक पदाची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे: उपराष्ट्रपती

Posted On: 28 JUL 2026 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2026

 

माननीय राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या पांच स्मरणिकांच्या संचाचे आज उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात उपराष्टपतींनी हा संच राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांना सादर केला.

माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाची चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, आज राष्ट्रपती भवनात, 'राष्ट्रपती भवन: राष्ट्र का भवन', 'सेवा और संवेदना', 'समावेशी सहभागिता' आणि 'भारतीयता का उत्सव' या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या 'प्रकाशन विभागा'द्वारे ही पुस्तके  प्रकाशित करण्यात आली आहेत. या पुस्तकांव्यतिरिक्त, 'आमा राष्ट्रपती आमा गौरव' या ओडिया भाषेतील पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. 'आमा राष्ट्रपती आमा गौरव' हा भारताच्या माननीय राष्ट्रपतींवर लिहिण्यात आलेल्या  लेखांचा संग्रह आहे.

भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती, सी. पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या उपस्थितीत या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

या पुस्तकांची शीर्षके सर्वसमावेशक लोकशाहीवरील आपली श्रद्धा प्रतिबिंबित करतात असे राष्ट्रपती याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाल्या. या सचित्र पुस्तकांमधून वाचकांना राष्ट्रपती भवनाच्या परंपरा, कार्यपद्धती आणि विविध पैलूंची ओळख होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या, 25 जुलै 2022 रोजी जेव्हा त्यांनी भारताच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा ती त्यांच्यासाठी सन्मानापेक्षाही  अधिक जबाबदारीची बाब होती. गेल्या चार वर्षांत आपण याच कर्तव्यभावनेतून आपली जबाबदारी पार पाडली असल्याचे त्यांनी नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या, “राष्ट्रपती भवनात किंवा विविध राज्यांच्या दौऱ्यांदरम्यान जेव्हा त्या लोकांना, विशेषतः तरुणांना भेटतात, तेव्हा त्या त्यांना नैतिक मूल्यांशी जोडलेले राहण्यास आणि राष्ट्र आणि  समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्यास प्रोत्साहित करतात. महिलांनी स्वावलंबी बनावे आणि आत्मविश्वास बाळगून प्रगतीच्या मार्गावर आगेकूच करावी, असे आवाहन याप्रसंगी राष्ट्रपतींनी केले. तसेच, आदिवासी समुदायातील सदस्यांशी संवाद साधताना त्या त्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासोबतच विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची विनंती करतात.

राष्ट्रपती मुर्मु यांच्या कार्यकाळातील अनेक उपक्रम अधोरेखित करताना उपराष्ट्रपतींनी काही उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला- जसे की - ऐतिहासिक मुघल गार्डन चे नाव 'अमृत उद्यान' असे करणे, डेहराडूनमधील 'राष्ट्रपती निकेतन' आणि 'राष्ट्रपती तपोवन' सर्वसामान्यांसाठी खुले करणे, राष्ट्रपती भवन दिव्यांगजनांसाठी अधिक सोयीस्कर व सुविधायुक्त करण्यासाठी प्रयत्न, आणि सर एडविन ल्यूटीयन्स यांच्या अर्ध पुतळ्याच्या जागी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल भारतरत्न चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा पुतळा बसवणे- या कामांचा उपराष्ट्रपतींनी उल्लेख केला. राष्ट्रीय संस्थांना वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त करण्यासाठी केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न या उपक्रमांतून दिसून येतात आणि त्याचवेळी या प्रयत्नांतून राष्ट्रपतींची संस्थात्मक संकल्पना जनतेच्या जवळ आणली जाते, अशी भावना उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

या प्रकाशित पुस्तकांबद्दल उपराष्ट्रपती म्हणाले, "राष्ट्रपती मुर्मु यांच्या सार्वजनिक जीवनाची घडण करणारी सेवा आणि संवेदनशीलता ही मूल्ये 'सेवा और संवेदना' या पुस्तकात अधोरेखित होतात, तर भारताचा विकास सर्वसमावेशक आणि सहभागात्मक असावा, या त्यांच्या धारणेचे दर्शन 'समावेशी सहभागिता' या पुस्तकात घडते. 'भारतीयता का उत्सव' या पुस्तकात, भारतीय संस्कृतीची कालातीत मूल्ये आणि लक्षणीय सांस्कृतिक विविधता यांची सकौतुक मांडणी केली आहे, असे सांगत उपराष्ट्रपती म्हणाले की "राष्ट्रपती मुर्मु यांनी सातत्याने भारताची विविधता साजरी करतानाच राष्ट्राला एकात्म ठेवणारी सांस्कृतिक संपन्नता, स्थानिक परंपरा आणि आध्यात्मिक वारसा प्रकाशात आणला आहे."

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आयोजित या पुस्तक प्रकाशन समारंभाला केंद्रीय माहिती प्रसारण तथा संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल.मुरुगन उपस्थित होते. या पुस्तकांमध्ये देशाची सांस्कृतिक विविधता अचूक रेखाटली आहे, असे ते म्हणाले. भावी पिढ्यांसाठी संदर्भग्रंथ म्हणून ही पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज प्रकाशित झालेली पुस्तके, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या राष्ट्रपती म्हणून करकीर्दीचे दस्तावेजीकरण करण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरतील, असेही त्यांनी सांगितले. 

 

* * *

नेहा कुलकर्णी/राधिका अघोर/सविता म्‍हस्‍कर/जाई वैशंपायन/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2296681) अभ्यागत कक्ष : 31