राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तळाच्या  स्तरातल्या समस्यांवर उपाय शोधणाऱ्या नवोन्मेषकांच्या गटाशी राष्ट्रपतींचा संवाद

प्रविष्टि तिथि: 31 JUL 2026 3:32PM by PIB Mumbai

 

समाजाच्या तळातल्या स्तरावरच्या समस्यांवर उपाय शोधणाऱ्या 'अटल इनोव्हेशन मिशन'च्या, नवोन्मेषकांच्या एका गटाने आज (31 जुलै 2026) राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या नवोन्मेषकांनी भरविलेल्या प्रदर्शनालाही राष्ट्रपतींनी भेट देऊन त्यांनी शोधलेल्या नावीन्यपूर्ण उपायांची पाहणी केली तसेच त्यांच्याशी संवादही साधला.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या देशाची प्रचंड व्याप्ती आणि नवोन्मेषी वृत्ती यांचा उपयोग करून घेऊन तळाच्या  स्तरातल्या नवोन्मेषाच्या' क्षेत्रात जागतिक महासत्ता बनण्याची भारतामध्ये क्षमता आहे. तळाच्या  स्तरावरच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात स्थानिक पातळीवरील अनुभव, वैज्ञानिक विचारसरणी आणि वैयक्तिक सृजनशीलतेला सामाजिक जबाबदारीच्या भावनेची जोड असल्याने सामाजिक गरजांसाठी ते चांगल्या प्रकारे लागू पडणारे असतात यावर राष्ट्रपतींनी भर दिला. देशभरातील नवोन्मेषक राष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाच्या असलेल्या स्थानिक समस्यांवर उपाय शोधत आहेत आहे, हे पाहून आपल्याला आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या. तळागाळातील नवोन्मेषक टाकाऊ गोष्टींचे संपत्तीत रुपांतर, ऊर्जा संवर्धन, महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधांमध्ये वाढ, पर्यावरण रक्षण, कृषी आणि कलांचे जतन यांसारख्या क्षेत्रांमध्ये कशा प्रकारे योगदान देत आहेत हे आजच्या प्रदर्शनातून दर्शविले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले .

राष्ट्रपती म्हणाल्या की, सामाजिक बदल हे केवळ कल्पनांमधून साकारत नाहीत. या कल्पना अंमलात येण्यासाठी प्रतिभावंतांना मार्ग दाखवणारे योग्य व्यासपीठ आणि संसाधने उपलब्ध करून देणारे वातावरण गरजेचे असते. अटल सामुदायिक नवोन्मेष केंद्रांद्वारे तळागाळातील नवोन्मेषकांना मार्गदर्शन आणि तांत्रिक साहाय्य पुरवण्याबरोबरच नाविन्यपूर्ण कल्पनांचे शाश्वत उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची संधी दिली जात  आहे, हे आपण आनंदाने नमूद करत असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रत्येक नागरिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नवोन्मेषी मानसिकता बाळगून प्रयत्न करेल, तेव्हाच 'विकसित भारता'चे स्वप्न साकार होईल, असे राष्ट्रपती म्हणाल्या. विविध संस्था आणि नागरिक एका सामायिक उद्दिष्टासाठी एकत्रितपणे काम करत असून नवोन्मेषी संस्कृती बळकट होत आहे, याचे आपल्याला समाधान आहे. अशा प्रयत्नांचे लाभ समाजातील विविध स्तरांपर्यंत पोहोचतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अनेक नवोन्मेषकांनी मर्यादित संसाधने, अनिश्चितता आणि वारंवार उद्भवणारी आव्हाने असून देखील आपल्या प्रयत्नात खंड पडू न दिल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले . व्यक्ती, कुटुंबे किंवा समुदायांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नवोन्मेषावर असलेल्या त्यांच्या अढळ विश्वासाबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. आपल्या नवोन्मेषांमध्ये सातत्याने सुधारणा करावी, संशोधन संस्था, उद्योगक्षेत्र आणि इतर नवोन्मेषकांशी सहकार्य वाढवावे, तसेच आपल्या नवोन्मेषांचा विस्तार व्यापक पातळीवर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असा सल्लाही त्यांनी या नवोन्मेषकांना दिला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-

***

निलिमा चितळे/मंजिरी गानू/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2292682) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam