संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला भारत निर्णायक प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचा पुरावा; 27व्या कारगिल विजय दिनानिमित्त द्रास येथे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन


"पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केवळ पीओकेवरच होईल; पीओके हा भारताचा अविभाज्य भाग"

"भारत प्रगती आणि नवोन्मेषाचा मार्ग स्वीकारतो, तर पाकिस्तान दहशतवाद आणि घुसखोरीला प्रोत्साहन देतो"

"‘ये दिल मांगे मोअर’ हीच संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला प्रेरणा देणारी भावना"

"विकसित भारत@2047 ही केवळ आर्थिक समृद्धीची संकल्पना नाही; ती सामरिक सामर्थ्य, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक सलोखा यांप्रती असलेली दृढ बांधिलकी आहे."

प्रविष्टि तिथि: 26 JUL 2026 12:25PM by PIB Mumbai


‘ऑपरेशन सिंदूर’ चे यश हेच सिद्ध करते की पाकिस्तानच्या कोणत्याही दुष्कृत्याला किंवा दुस्साहसाला त्याच्या कल्पनेपलीकडचे चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारताकडे आहे,” असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. यासोबतच, पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा होणार नाही आणि भविष्यात काही संवाद झालाच, तर तो केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच (PoK) होईल, जो भारताचा एक अविभाज्य भाग असून त्यावर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताबा मिळवला आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. 26 जुलै 2026 रोजी द्रास येथे पार पडलेल्या 27 व्या ‘कारगील विजय दिवस’ सोहळ्यात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वावर गदा आणणाऱ्या प्रत्येक कुकृत्याला भारतीय सशस्त्र दले त्याच खंबीरपणे उत्तर देतील; ज्या शौर्याने आणि धैर्याने त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना धडा शिकवला होता, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.  

पाकिस्तानमध्ये लष्कर आणि दहशतवादी यांच्यातील फरक आता संपला असून, त्या देशाने दहशतवादालाच आपल्या सरकारी धोरणाचा एक भाग बनवले आहे, असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. पाकिस्तानचे सैन्य केवळ दहशतवादी संघटनांना आश्रयच देत नाही, तर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कामही करते, असे ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आम्ही हे स्पष्ट केले की, भारत आता दहशतवादी आणि त्यांना खतपाणी घालणारी सरकारे यांना वेगळे मानत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  कारगील युद्धाला 27 वर्षे उलटून गेली आहेत आणि या काळात भारत व पाकिस्तानने निवडलेले मार्ग पूर्णपणे भिन्न झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. भारत नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे नवे मार्ग शोधत आहे, भारत चिप डिझायनिंगमध्ये व्यस्त आहे, तर पाकिस्तान दहशतवादाची रचना करण्यात मग्न आहे, भारत स्टार्टअपची परिसंस्था उभी करत आहे, तर पाकिस्तान दहशतवादाची परिसंस्था निर्माण करत आहे, भारत सेमीकंडक्टरचे उत्पादन करत आहे; तर पाकिस्तान मानवी बॉम्ब तयार करत आहे, भारताची ओळख अंतराळ मोहिमांसाठी आहे, तर पाकिस्तान छुप्या मोहिमा चालवत आहे, भारत अंतराळात उपग्रह पाठवत आहे, तर पाकिस्तान सीमेपार दहशतवादी पाठवण्यावर भर देत आहे, भारत जगाला सॉफ्टवेअर पुरवत आहे, तर पाकिस्तान स्लीपर सेल्सची निर्यात करत आहे, भारत डेटा सेंटर्स उभारणीत व्यस्त आहे; तर पाकिस्तान कट्टरतावादी केंद्रे स्थापन करत आहे. भारत 'यूपीआय' (UPI) च्या माध्यमातून जगाला जोडत आहे, तर पाकिस्तान दहशतवादाला हवाला नेटवर्कशी जोडत आहे, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.  थोडक्यात सांगायचे तर, आपले मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत; त्यामुळे पाकिस्तानने आपल्या कुरापतींनी भारताच्या समृद्धीच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास, आमची सशस्त्र दले त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

देशाला असणाऱ्या कोणत्याही धोक्याला चोख आणि निर्णायक प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची राजकीय इच्छाशक्ती केंद्र सरकारकडे असल्याचे ते म्हणाले. भारतीय सैनिक सीमेचे रक्षण करत असताना कोणताही शत्रू देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1999च्या कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांना संरक्षणमंत्र्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा आणि कॅप्टन मनोज कुमार पांडे यांच्यासह असंख्य वीरपुत्रांचे त्यांनी स्मरण केले. या वीरांची गाथा संपूर्ण देशाला, विशेषतः युवा पिढीला आजही प्रेरणा देत असल्याचे ते म्हणाले. वैयक्तिक यश आणि राष्ट्रकर्तव्य यातील फरक समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक युवकासाठी 'कारगिल विजय दिवस' हा प्रेरणेचा स्त्रोत आहे, आत्मसमर्पण आणि सेवाभावाची हीच भावना कोणत्याही राष्ट्राचा खरा कणा असते, हेच हा दिवस आपल्याला शिकवतो, असे उद्गार त्यांनी काढले.

कारगिल युद्ध स्मारकातून अखंड भारताची झलक दिसून येते, कारण देशाच्या कानाकोपऱ्यातील शूरवीरांनी यात आपले प्राण पणाला लावले होते, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. "विविधतेने नटलेली ही ऐक्याची भिंत आपल्या देशाचे नुकसान करू पाहणाऱ्या कोणत्याही शत्रूविरुद्ध खंबीरपणे उभी आहे," असे ते म्हणाले.
मध्य पूर्व आशियातील आणि रशिया-युक्रेनमधील संघर्षांसारख्या घडामोडींनी केवळ सैन्याच्या क्षमतेचीच नव्हे, तर राष्ट्रांचा संयम, सहनशीलता आणि दृढ विश्वासाचीही परीक्षा घेतली आहे, याकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. भारताकडे अत्यंत सक्षम आणि बलाढ्य सैन्य दल असले, तरी राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामायिक जबाबदारी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 'राष्ट्र प्रथम' ही भावना, शिस्त आणि कर्तव्याची जाणीव यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.  प्रत्येक भारतीयामध्ये सैनिकासारखी जागृत जाणीव असली पाहिजे, प्रत्येक नागरिकाने सैनिक बनलेच पाहिजे असा माझा सल्ला नाही; पण देशाला कधी आपल्या जनतेच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्याची गरज भासलीच, तर प्रत्येक भारतीयाने देशाच्या रक्षणासाठी मानसिक, नैतिक आणि शारीरिकदृष्ट्या तत्पर राहिले पाहिजे. ज्याप्रमाणे प्रत्येक सैनिक हा सर्वात आधी एक भारतीय असतो, त्याचप्रमाणे सैनिकातील धैर्य, शिस्त आणि देशभक्तीची भावना ही प्रत्येक भारतीयाच्या मनात नेहमी जिवंत राहिली पाहिजे," असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचे स्वप्न हे केवळ आर्थिक समृद्धीपुरते मर्यादित नसून, ती देशाची सामरिक ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक सौहार्द जपण्याची एक कटिबद्धता आहे, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. राष्ट्रउभारणीच्या प्रत्येक क्षेत्रात कारगिल युद्धातील वीरांसारखाच त्याग आणि कर्तव्याची भावना अंगीकारूनच हे स्वप्न साकार होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार राष्ट्रीय सुरक्षा आणि सैनिकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले. "कोणताही ऋतू असो किंवा कोणतीही परिस्थिती, आपण आपल्या सीमांवर सदैव तत्पर आणि सतर्क राहिले पाहिजे, हाच धडा कारगिल युद्धाने आपल्याला शिकवला आहे," असे ते म्हणाले. सैन्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि बदलत्या काळानुसार लष्करी क्षमतांचे आधुनिकीकरण करण्यासाठी जितका भर दिला जात आहे, तितक्याच वेगाने सीमावर्ती भागांतील पायाभूत सुविधाही सातत्याने मजबूत केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या 'ये दिल मांगे मोर' या प्रसिद्ध वाक्यातून प्रेरणा घेत, संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भरता' मिळवण्यासाठी वेगाने पावले उचलली जात आहेत आणि या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे संरक्षण मंत्री म्हणाले. "आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा भारत 65 ते 70 टक्के संरक्षण साहित्य आयात करत असे. आज मात्र आपण 65 टक्के संरक्षण साहित्याची निर्मिती स्वतःच्याच देशात करत आहोत. आज आपल्या सैनिकांकडे स्वदेशी बनावटीची 'आकाश-तीर' ही एअर डिफेन्स कंट्रोल सिस्टीम आहे. आपण अत्याधुनिक 'आकाश' क्षेपणास्त्राची नवी पिढी विकसित केली आहे. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत', हलके लढाऊ विमान 'तेजस', हलके लढाऊ हेलिकॉप्टर 'प्रचंड', ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर 'ध्रुव', मुख्य युद्ध रणगाडा 'अर्जुन', 'पिनाका' मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर, 'अस्त्र' हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, तसेच आधुनिक ड्रोन्स आणि काउंटर-ड्रोन सिस्टीम देखील सैन्याची युद्धसज्जता अधिक मजबूत करत आहेत. पण, 'ये दिल मांगे मोर'. याहूनही अधिक आधुनिक शस्त्रे, पुढच्या पिढीची लढाऊ विमाने, पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रे भारतातच तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न असेच सुरू राहतील," असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमादरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले आणि 1999 च्या 'ऑपरेशन विजय'मध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या वीरपुत्रांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी मौन पाळले. लडाखचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, संरक्षण दल प्रमुख जनरल धीरज सेठ, नॉर्दर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा, 14 कॉर्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल मदनराज पांडे आणि 8 माउंटन डिव्हिजनचे जीओसी मेजर जनरल एपी सिंह यांनीही, कारगिल युद्धातील वीरांना आदरांजली वाहिली. या 'श्रद्धांजली समारोहा'ला लष्करी व नागरी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, कारगिल युद्धातील माजी सैनिक, शौर्य पुरस्कार विजेते, वीर नारी, हुतात्म्यांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

संरक्षणमंत्र्यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये स्वाक्षरी केली आणि 'ऑपरेशन विजय'दरम्यान भारतीय सैनिकांनी दाखवलेले धैर्य, दृढनिश्चय आणि अदम्य जिद्दीची गाथा सांगणाऱ्या, दोन नॉन-कमिशन ऑफिसरने सादर केलेल्या 'गौरव गाथा'चे अवलोकन केले. कारगिल युद्धाचा इतिहास आणि वारसा सर्वसामान्य जनतेपर्यंत अधिक व्यापकपणे पोहोचावा यासाठी तयार करण्यात आलेल्या 'व्हर्च्युअल वॉकथ्रू पोर्टल'चे उद्घाटनही त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी 'हट ऑफ रिमेंब्रन्स'ला भेट दिली आणि 'वीर भूमी' येथे जाऊन आदरांजली अर्पण केली.

राजनाथ सिंह यांनी उपस्थित मान्यवर, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांशी चहापानादरम्यान संवाद साधला. त्यानंतर, त्यांनी 14 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून वरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेल्या आणि कारगिल विजय दिवसाच्या औचित्याने आयोजित केलेल्या 'शौर्य विजय यात्रा' या मोटारसायकल रॅलीचा समारोप केला.

संरक्षणमंत्री द्रास येथे सशस्त्र दलांसह कारगिल विजय दिवस साजरा करत असताना, तिकडे नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन. एस. राजा सुब्रह्मणी, वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह, नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनीही वीरपुत्रांना आदरांजली अर्पण केली.

***

शिल्पा पोफळे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2289597) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam