माहिती आणि प्रसारण मंत्रालय
तळापर्यंतच्या डिजिटल क्रिएटर्सना प्रकाशझोतात आणण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 'जेम्स ऑफ इंडिया' स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्याचा प्रारंभ
शूट, अपलोड, शाईन : जेम्स ऑफ इंडिया चॅलेंजसाठी 1 ऑगस्टपासून मायवेव्हजवर प्रवेशिका स्वीकारण्यास होणार सुरुवात
राज्य आणि जिल्हा प्रशासनांकडून या स्पर्धेचे प्रत्यक्ष पातळीवर आयोजन; क्रिएटर्सना प्रोत्साहन देण्यापासून ते परीक्षकांकडून मूल्यमापनापर्यंतची जबाबदारी
युट्युब आणि मेटा यांची या स्पर्धेसाठी भागीदारी; आपल्या क्रिएटर इकोसिस्टम्स करणार सामायिक
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2026 3:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,21 जुलै 2026
उदयोन्मुख ऑरेंज अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या आणि देशाच्या सर्जनशील क्षेत्राला बळकटी देण्याच्या सरकारच्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंजच्या प्रायोगिक टप्प्याचा प्रारंभ केला. जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज हा, देशभरातल्या तळागाळातल्या डिजिटल क्रिएटर्सना अर्थात सर्जकांना शोधण्यासाठी, त्यांची प्रतिभा संवर्धित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आखणी केलेला राष्ट्रीय उपक्रम आहे.
पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने तंत्रज्ञानाला सक्षमीकरण, समावेशन आणि राष्ट्रउभारणीचे प्रभावी साधन म्हणून स्वीकारले आहे. डिजिटल इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमुळे तंत्रज्ञानाचा लाभ व्यापक प्रमाणात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला असून नवोन्मेषासाठी अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रारंभ केलेल्या वेव्हज ओटीटी अंतर्गत असलेल्या मायवेव्हज, सिटीझन क्रिएटर मंचावर या उपक्रमाची आखणी केली आहे. देशातील डिजिटल सर्जनशील अर्थव्यवस्था बळकट करतानाच नागरिकांना त्यांचा मूळ कन्टेन्ट अर्थात आशय तयार करण्यास, अपलोड करण्यास आणि सामायिक करण्यास सक्षम करणे, हा या मंचाचा उद्देश आहे. वापरकर्त्यांनी निर्माण केलेल्या आशयाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन घडवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून संकल्पित केलेले मायवेव्हज, आता जेम्स ऑफ इंडिया चॅलेंजसाठी पाया प्रदान करते. याद्वारे सर्जकांना अस्सल डिजिटल कथाकथनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा सांगण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी याविषयी सांगितले.''भारतातील प्रत्येक जिल्ह्याकडे सांगण्यासारखी एक कथा आहे आणि जेम्स ऑफ इंडिया आपल्या क्रिएटर्सना ती कथा मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. हा उपक्रम आपल्या तरुणांच्या सर्जनशीलतेचा गौरव करण्याइतकाच, आपल्या जिल्ह्यांमधील विलक्षण विविधतेला अभिमानाने जगासमोर आणण्याबाबतही आहे."
सर्जकांचे एक चैतन्यमयी राष्ट्रीय जाळे निर्माण करणे, हा या चॅलेंजचा उद्देश आहे. या अंतर्गत भारतातील प्रत्येक जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जगासमोर आणत, तिथली संस्कृती, वारसा, पर्यटन, परंपरा, इतिहास आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी यांचे अस्सल डिजिटल कथाकथनाद्वारे सादरीकरण करण्यास क्रिएटर्सना प्रोत्साहन दिले जाईल.
सहभागी कसे व्हायचे : या चॅलेंजमधील सहभागासाठी क्रिएटर्स WAVES OTT प्लॅटफॉर्मवरील MyWAVES सेक्शनद्वारे 1 ते 3मिनिटांचे व्हिडिओ सादर करू शकतात. प्रायोगिक टप्प्यासाठी सबमिशन विंडो अर्थात सादरीकरण खिडकी, 1ऑगस्ट 2026 रोजी खुली होईल. ती 31 ऑगस्ट 2026 पर्यंत खुली असेल.
प्रायोगिक टप्प्याची व्याप्ती आणि भागीदारी: हा प्रायोगिक टप्पा अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव, गोवा आणि लडाख या प्रदेशांमध्ये राबविला जात आहे.प्रसार भारती, माय भारत आणि संबंधित राज्य व जिल्हा प्रशासनांच्या सहकार्याने हा टप्पा राबविला जाणार आहे. क्रिअटर्सचा सहभाग वाढवण्यासाठी आणि संहिता निर्मितीला चालना देण्यासाठी स्थानिक सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांचाही यात सक्रिय सहभाग असेल.
या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी मंत्रालय युट्यूब आणि मेटा यांसारख्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांशी सहकार्य करत आहे. ही दोन्ही व्यासपीठे आपापल्या नेटवर्कद्वारे क्रिअटर्सच्या समुदायांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतील आणि या स्पर्धेचा प्रसार करतील.
पुरस्कार आणि सन्मान: उत्कृष्ट प्रतिभेचा गौरव करण्यासाठी, या कार्यक्रमांतर्गत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातील:
जिल्हा स्तर: प्रति जिल्हा 50,000 रुपये रकमेचे जास्तीत जास्त 20 पुरस्कार.
राज्य स्तर: प्रत्येक जिल्ह्यातून एका उत्कृष्ट क्रिअटर्सची निवड 2 लाख रुपयांच्या राज्य-स्तरीय पुरस्कारासाठी केली जाईल.
राष्ट्रीय स्तर: त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात, निवडक राज्य-स्तरीय प्रवेशिकांना 5 लाख रुपयांचे राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील.
निष्पक्ष मूल्यमापन सुनिश्चित करण्यासाठी, संबंधित प्रशासनाकडून जिल्हा आणि राज्य स्तरावरील परीक्षण समित्या स्थापन केल्या जातील. या समित्यांमध्ये संस्कृती, वारसा, पर्यटन, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण या क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींचा समावेश असेल.

भविष्यातील देशव्यापी अंमलबजावणी: या प्रायोगिक टप्प्यातून मिळालेले अनुभव आणि माहितीच्या आधारे, जेम्स ऑफ इंडिया स्पर्धा कालांतराने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत वाढवली जाणार आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्याची विशेष ओळख आणि वारसा यांचे जतन व सादरीकरण करणाऱ्या डिजिटल क्रिअटर्सची एक चैतन्यशील आणि देशव्यापी परिसंस्था निर्माण करणे हे याचे अंतिम उद्दिष्ट आहे.
निलीमा चितळे/सोनाली काकडे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2287041)
आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam