आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून(CDSCO) भारताच्या पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी, राष्ट्रीय डेंग्यू प्रतिबंधक प्रयत्नांना मिळणार बळ
4 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी CDSCO कडून रिकॉम्बिनंट लाइव्ह अटेन्युएटेड डेंग्यू लसीला मंजुरी
जागतिक आरोग्य संघटनेच्या पूर्वपात्रतेसह आणि उत्कृष्ट जागतिक सुरक्षितता नोंदीसह 42 देशांमध्ये डेंग्यू लसीला मंजुरी
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2026 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2026
भारतातील डेंग्यू प्रतिबंध आणि नियंत्रणाच्या प्रयत्नांना बळ देण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल टाकत , आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) 'डेंग्यू टेट्राव्हॅलंट व्हॅक्सीन (लाइव्ह, अटेन्युएटेड ) – Qdenga®' च्या विपणन प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. ही लस जर्मनीतील ताकेडा जीएमबीएच (Takeda GmbH) द्वारे उत्पादित केली असून मेसर्स ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे आयात केली जाणार आहे. देशात डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी मंजूर झालेली ही पहिलीच डेंग्यू लस आहे.
औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 आणि औषध नियम, 1945 च्या तरतुदींनुसार या लसीची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेच्या सर्वसमावेशक वैज्ञानिक मूल्यमापनानंतर ही मंजुरी देण्यात आली आहे.
Qdenga® ही रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेली लाइव्ह, अटेन्युएटेड टेट्राव्हॅलंट (एक जिवंत, सौम्य केलेली) डेंग्यू लस आहे. ही लस 'वेरो पेशी' (Vero cells) मध्ये तयार केली जाते, ज्यामध्ये सिरोटाइप-विशिष्ट पृष्ठभागावरील प्रथिनांचे कोडिंग करणारे जीन्स हे 'डेंग्यू व्हायरस टाइप-2' बॅकबोनमध्ये तयार केले जातात. या उत्पादनात अनुवंशिकदृष्ट्या सुधारित जीव (GMOs) समाविष्ट आहेत. हे फ्रीझ-ड्राइड पावडरच्या अर्थात गोठवलेल्या शुष्क भुकटीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते आणि त्यापासून तयार केलेले द्रावण त्वचेखाली टोचले जाते.
ही लस 4 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी वापरली जाते. लसीकरणाच्या शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार 0.5 ml चे दोन डोस 3 महिन्यांच्या अंतराने दिले जातात.
डेंग्यूचा प्रादुर्भाव असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये या लसीची सुरक्षितता, रोगप्रतिकारशक्ती आणि परिणामकारकता यांचे मूल्यमापन करणाऱ्या एका व्यापक जागतिक क्लिनिकल डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारे मिळवलेल्या पुराव्यांच्या आधारे ही मंजुरी देण्यात आली आहे. ब्राझील, थायलंड आणि श्रीलंका यांसारख्या 8 पेक्षा जास्त देशांमधील सहभागींवर या क्लिनिकल अभ्यासाची चाचणी घेण्यात आली. या मूल्यमापनामध्ये 4 ते 60 वर्षे वयोगटातील भारतीय लोकसंख्येवर घेण्यात आलेला महत्त्वाचा टप्पा 3 सुरक्षितता आणि रोगप्रतिकारशक्ती अभ्यासाचा देखील समावेश होता.
या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये आधीच नियामक मंजुरी मिळालेली आहे, तसेच जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) पूर्वपात्रता देखील प्राप्त झाली आहे. जागतिक स्तरावर या लसीचे 24 दशलक्षाहून अधिक डोस वितरित करण्यात आले आहेत. ही लस वापरात असलेल्या देशांमधील विपणन-पश्चात पाहणीच्या आकडेवारीतून ही लस अतिशय सुरक्षित असल्याचे निष्कर्ष दर्शवले आहेत, ज्यामध्ये कोणतीही सुरक्षितताविषयक अतिशय गंभीर चिंताजनक बाब आढळलेली नाही.
देशातील पहिल्या डेंग्यू लसीला मिळालेली मंजुरी ही डेंग्यूविरुद्धच्या भारतातील सार्वजनिक आरोग्य प्रतिसादातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत लागू केल्या जाणाऱ्या डास नियंत्रण, देखरेख, लवकरात लवकर निदान आणि रुग्ण व्यवस्थापन उपायांना यामुळे अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भक्कम आणि विज्ञानावर आधारित नियामक चौकटीद्वारे सुरक्षित, परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण लसी व औषधे वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे.
आशिष सांगळे /शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2286989)
आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam