MIFF banner

माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांमधील उत्कृष्टतेच्या उत्सवासह 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (MIFF 2026) समारोप


सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय माहितीपटासाठीचा 'सुवर्ण शंख' (Golden Conch) पुरस्कार 'सिल्व्हर' या पोलिश माहितीपटाने पटकावला

'मिफ' (MIFF) ही आता सर्जनशील उत्कृष्टतेचा उत्सव साजरी करणारी एक जागतिक चळवळ बनली, क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड’ यातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, 21 जून 2026

 

चित्रपट, कथाकथन, कलात्मक शोध आणि सर्जनशीलता यांबद्दलच्या त्यांच्या उत्कटतेने एकत्र आलेल्या चित्रपट निर्माते, चित्रपटप्रेमी, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आणि तरुण सर्जनशील मनांच्या उत्साही उपस्थितीत 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (MIFF 2026) आज समारोप झाला."

आज मुंबईत झालेल्या या नेत्रदीपक समारोप सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अपर सचिव श्री. प्रभात, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव किरण कुलकर्णी, प्रख्यात चित्रपट निर्माते आणि महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, तसेच उद्योग क्षेत्रातील धुरीण, चित्रपट निर्माते, ज्युरी सदस्य आणि भारतातील तसेच परदेशातील मान्यवर पाहुणे उपस्थित होते.

महोत्सवात तब्बल 6 श्रेणींमध्ये एकूण 17 पुरस्कार देण्यात आले. यामध्ये एक प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार, पाच रौप्य शंख पुरस्कार, तर 11 सन्मानचिन्हांचा समावेश आहे. 

महोत्सवातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार आणि 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक (चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान प्रमाणात विभागले जाते) असा पुरस्कार पोलंडच्या सिल्व्हर या माहितीपटाला प्रदान करण्यात आला. पोलिश सांस्कृतिक मंत्री-प्लेनिपोटेन्शरी आणि संचालिका  मालगोर्झाता वेजिसिस-गोवेंबियाक यांनी दिग्दर्शिका नतालिया कोनियार्झ आणि चित्रपटाचे निर्माता माचेय कुबिकी यांच्या वतीने हा सर्वोच्च पुरस्कार स्वीकारला.

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपटाचासाठीचा रौप्य शंख पुरस्कार आणि 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक इराणी चित्रपट 'अंडर द स्नो'ला प्रदान करण्यात आले. या चित्रपटाचे सहनिर्माते दीपांकर प्रकाश यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिका नफिसेह झारे आणि अन्य निर्माते कोट्टुकथिरा प्रकाश यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. 

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन चित्रपटासाठीचा रौप्य शंख पुरस्कार आणि 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक (चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान प्रमाणात विभागले जाते) जर्मनीच्या मायाज साँग या ॲनिमेशन चित्रपटाला प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार प्रमुख ॲनिमेटर आणि स्टुडिओ प्रतिनिधी सानिका कुलकर्णी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते फ्रांझिस्का शोननबर्गर आणि जयकृष्णन सुब्रमण्यन यांच्या वतीने स्वीकारला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचा (सिनेमॅटोग्राफर) पुरस्कार 'टर्टल वॉकर' या भारतीय माहितीपटासाठी कृष्ण मखिजा यांना प्रदान करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचा (एडिटिंग) पुरस्कार रशियाचे येवगेनी स्मिरनोव्ह आणि मॅक्सिम स्मिरनोव्ह यांच्या 'अबाउट द काऊ' या लघुपटाला मिळाला. दिग्दर्शक अँटोन सिमुखिन यांनी संपादक जोडीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलक (साऊंड डिझायनर) पुरस्कार देवा आज पण व्हय या चित्रपटासाठी अभय रुमडे (पर्पल हेझ स्टुडिओ) यांना प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपटासाठीचा रौप्य शंख पुरस्कार आणि 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक (दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यात विभागून) 'वाई' या माहितीपटाला मिळाले. निर्माते भरतबाला गणपती यांच्या वतीने दिग्दर्शक साईनाथ एस. उस्काईकर आणि जवाहर शर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटासाठीचा रौप्य शंख (सिल्व्हर काँच) पुरस्कार आणि 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक 'स्मॉल क्लाउड्स' या चित्रपटाने पटकावले. एफटीआयआय निर्मित या चित्रपटाचा पुरस्कार एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह आणि दिग्दर्शक शुभम सुमित यांनी स्वीकारला.

राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपटासाठीचा ' रौप्य शंख' पुरस्कार आणि 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक 'आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगलम्मन टेम्पल स्ट्रीट' या चित्रपटाने पटकावले. दिग्दर्शक आणि निर्माते भुवनेश एम. कुमार यांना पुरस्कार आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत 'सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार' हा पुरस्कार 'स्मॉल क्लाउड्स' या चित्रपटासाठी रणधीर बिस्वास यांनी पटकावला.

राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार अखिल कृष्णन यांना 'मेडे (MAYDAY)' या चित्रपटासाठी मिळाला. संकलक अखिल कृष्णन यांच्या वतीने दिग्दर्शक सरथ अंबट यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रीय स्पर्धेच्या श्रेणीअंतर्गत सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा पुरस्कार बिज्ञान दहल यांना कोव्हार्टी (Kovarty) या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.

सर्वात अभिनव/प्रायोगिक चित्रपटासाठीचा प्रमोद पाटी विशेष परिक्षक (ज्युरी) पुरस्कार तैवानच्या, ‘द होर्डर्स’ (The Hoarders) या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका चुआन यिंग लियाओ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

विकसित भारत/ वंदे मातरम् ची 150 वर्षे/ भारत@2026 या विषयावरील सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर (The Last Shelter) या लघुपटाला मिळाला. भारत अरोरा आणि राजेश भाटिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठीचा भारतीय माहितीपट निर्माता संघ (IDPA - Indian Documentary Producers Association) पुरस्कार मिलन कुमार यांना, द ओल्ड बुल नोज, ऑर वन्स न्यू (The Old Bull knows, or Once Knew) या चित्रपटासाठी यांना मिळाला.

आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक महासंघ (FIPRESCI) यांच्याद्वारे देण्यात येणारा, FIPRESCI हा आंतरराष्ट्रीय समीक्षक पुरस्कार प्रदीप कंचनुरू यांना त्यांच्या ‘द हग ऑफ एम्प्टिनेस’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ्फ) समारोप सोहळ्यातील बीजभाषणात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी उपस्थितांना संबोधित केले. लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन चित्रपटांना समर्पित असलेल्या मिफ्फने, जगातील सर्वात प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक महोत्सव म्हणून ओळख प्रस्थापित केली असल्याचे ते म्हणाले. तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून मिफ्फ हे सर्जनशील प्रतिभा, कथात्मक मांडणीकार आणि द्रष्ट्या कलाकारांसाठी एक बहुआयामी व्यासपीठ ठरले आहे. कलात्मक उत्कृष्टता, सांस्कृतिक विविधता आणि अर्थवाही कथात्मक मांडणीचा गौरव करणारे हे राष्ट्रीय व्यासपीठ आता खऱ्या अर्थाने जागतिक चळवळीत रूपांतरीत झाले आहे अशा शब्दांत त्यांनी मिफ्फच्या आजवरच्या वाटचालीचा गौरव कैला.

गेल्या पाच आवृत्त्यांपासून या महोत्सवाने साध्य केलली प्रगती म्हणजे, या महोत्सवाची वाढती प्रासंगिकता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढत्या प्रतिष्ठेचे द्योतक आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2025 रोजी मुंबईत उद्घाटन झालेल्या वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजक शिखर परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचा संदर्भही राज्यपालांनी आपल्या संबोधनात मांडला. माध्यम, मनोरंजन, ॲनिमेशन, गेमिंग, डिजिटल आशय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठीचे एक जागतिक व्यासपीठ या शिखर परिषदेचे आयोजन केले गेले होते. या शिखर परिषदेच्या निमित्ताने ‘सर्जनशील कलाकारांना आणि देशांना जोडणे’ या मुख्य संकल्पनेअंतर्गत 90 पेक्षा जास्त देशांमधील सर्जनशील कलाकार, या उद्योग क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्त्वे, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकत्र आले होते ही बाब त्यांनी नमूद केली.

या महोत्सवाने, भारताला,  सृजनशील अर्थव्यवस्था आणि डिजिटल कथाकथनाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्याच्या महत्त्वाकांक्षेला बळकटी दिली,  भारताचे सांस्कृतिक संबंध मजबूत करत  माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील देशाची वाढती सुप्तशक्तीही प्रदर्शित केली,  पंतप्रधानांच्या भारतात निर्मिती करा, जगासाठी निर्मिती करा या दृष्टिकोनाला पुढे नेले आणि सृजनशील उद्योगांना विकसित भारत 2047 चा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून स्थापन केले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरेंज इकॉनॉमी म्हणजेच मनोरंजन उद्योगाच्या प्रचंड क्षमतेवर वारंवार भर दिला आहे; ही एक सृजनशील अर्थव्यवस्था असून ती संस्कृती, सर्जनशीलता, माध्यम आणि नवोन्मेष यावर आधारित आहे.

ते पुढे म्हणाले की, चित्रपट क्षेत्र हे या अर्थव्यवस्थेच्या सर्वात गतिमान स्तंभांपैकी एक आहे. ते मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करते, उद्यमशीलतेला प्रोत्साहन देते, तांत्रिक नवोन्मेषाला चालना देते आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देते. मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत माहितीपट वास्तव टिपतात, इतिहास जतन करतात, परंपरांना आव्हान देतात आणि सामाजिक परिवर्तनाला प्रेरणा देतात. ते समाजांना आवाज प्रदान करतात, गंभीर समस्यांकडे लक्ष वेधतात आणि आपल्या सामूहिक भविष्याला आकार देणाऱ्या कथांचे दस्तऐवजीकरण करतात, असेही महाराष्ट्राचे राज्यपाल यावेळी  म्हणाले.

"भारताची मनोरंजन क्षेत्रातील राजधानी असलेल्या मुंबईत या प्रमुख आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सातत्याने होत असल्याचा मला विशेष अभिमान वाटतो," असे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नमूद केले. चित्रपट, कला आणि सर्जनशीलता या क्षेत्रांत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे आणि मिफ्फ ने  चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्टतेचे जागतिक केंद्र म्हणून आपले स्थान अधिक बळकट केले आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

लघुपट चित्रपट-अभिव्यक्तीच्या अस्सल स्वरूपांपैकी  एक असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. अगदी कमी कालावधीतही चित्रपट निर्माते त्यातून अर्थगर्भ भावना, अभिनव कल्पना आणि प्रभावी कथानक सादर करतात.  लघुपट हे अनेकदा सर्जनशीलतेची प्रयोगशाळा ठरतात, जिथे नवीन प्रतिभा उदयास येते आणि चित्रपट निर्मितीची नवीन भाषा जन्माला येते. ॲनिमेशन चित्रपटांविषयी बोलताना ते म्हणाले की, या प्रकारात उल्लेखनीय बदल झाले आहेत. ॲनिमेशन हे शिक्षण, संवाद, सांस्कृतिक संवर्धन  आणि सर्जनशील अभिव्यक्तीचे एक प्रभावी माध्यम बनले आहे. कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर, ॲनिमेशनमुळे कथाकारांना भौतिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन गुंतागुंतीच्या कल्पना अत्यंत प्रभावीपणे मांडता येणे शक्य झाले आहे. “अॅनिमेशन  आपल्याला स्वप्ने, इतिहास, विज्ञान आणि मानवी अशा प्रकारे पाहण्याची संधी देते जे आकर्षक आणि सर्वसामान्यांसाठी  सहज सोपे असतात”, असे जिष्णू देव वर्मा म्हणाले. 

आज भारत हा जगातली सर्वात मोठी तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. तरूणांकडे त्यांच्या स्वत: च्या कल्पना आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुणांना त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या आणि संघर्षाच्या कथा सांगण्यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे, असे राज्यपाल पुढे म्हणाले. महिलांना त्यांच्या अभिनव कथा सांगण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. चित्रपट निर्मितीमध्ये तंत्रज्ञान हे एक अत्यंत प्रभावी साधन ठरले आहे. मात्र त्याच वेळी,  सावधगिरीचा इशारा देत, राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा हुशारीने आणि विवेकाने वापर केला पाहिजे. एआय मध्ये जगात उलथापालथ करण्याची मोठी क्षमता आहे, कारण ते हुबेहूब नक्कल करते, हे लक्षात घेऊन, चित्रपट निर्मात्यांच्या बौद्धिक संपदेचे रक्षण करणे गरजेचे आहे. 

राज्यपाल राज्यातील 29 विद्यापीठांचे कुलपती आहेत. त्या अनुषंगाने, मिफ्फच्या आयोजकांनी या भव्य महोत्सवाच्या आयोजनात या विद्यापीठांच्या माध्यम आणि मनोरंजन विभागांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुरस्कार विजेते, स्पर्धक, ज्युरी सदस्य आणि आयोजकांचे अभिनंदन करताना जिष्णू देव वर्मा म्हणाले की, या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेल्या चित्रपटांनी लोकांना माहिती देण्याची, प्रेरित करण्याची, शिक्षित करण्याची आणि समाजात परिवर्तन घडवून आणण्याची दृश्य कथाकथनाची विलक्षण ताकद दाखवून दिली. तसेच, सर्जनशीलता हे केवळ एक कलात्मक वैशिष्ट्य नसून संवाद, सह-वेदना आणि सकारात्मक बदलाचे एक प्रभावी माध्यम आहे, याचीही जाणीव  करून दिली. आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी सर्वांना आवाहन केले की, त्यांनी अर्थपूर्ण कथाकथनाला सातत्याने पाठबळ द्यावे, सृजनात्मक उत्कृष्टतेला प्रोत्साहन द्यावे आणि सृजनशील अर्थव्यवस्था क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचे स्थान अधिक मजबूत करावे.

या महत्वाच्या व्यासपीठाच्या संवर्धनासाठीचे समर्पण आणि दूरदर्शी भूमिकेबद्दल, त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी आणि सर्व भागीदार संस्थांचे अभिनंदन केले. यंदाच्या मिफ्फ महोत्सवाने नवी ऊंची गाठल्याचा विश्वास व्यक्त करून, त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. प्रभात  हे आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले की, या आठवड्यात महोत्सवाच्या विविध आयोजन स्थळी प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन यासारख्या 'नॉन-फीचर' चित्रपटांचे शाश्वत  महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले, आणि हेच या चित्रपट महोत्सवाचे खरे यश आहे.

या समारोप सोहळ्यात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी याप्रसंगी MIFF 2026 चा अहवाल सादर केला. सर्वात प्रभावशाली सत्य हे मोठ्या पडद्यावर नाही, तर अत्यंत प्रामाणिकपणे मांडलेल्या छोट्या फ्रेम्सच्या माध्यमातून मांडले जाते, असे ते म्हणाले. लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन ही, जगातील वास्तवापासून दूर पळणारी माध्यमे नाहीत, त्याऊलट ही माध्यमे एखाद्या आरशाप्रमाणेच त्या त्या वास्तवाचा प्रभाव प्रेक्षकांसमोर मांडतात, असे प्रतिपादन मगदूम यांनी केले.

ते पुढे म्हणाले, मिफ्फ 2026 ला जगभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या महोत्सवासाठी विविध देशांमधून 1,459 चित्रपटांचे अर्ज आले होते. या महोत्सवातील स्पर्धा विभागात 13 देशांमधील चित्रपटकर्मींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 144 चित्रपटांचा समावेश होता. यांपैकी 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय चित्रपटांच्या प्रवेशिका होत्या अशी माहिती त्यांनी दिली. बिगर स्पर्धा विभागात एकूण 202 चित्रपटांचे खेळ दाखवले गेले. याअंतर्गत 46 सहभागी देशांमधील 106 आंतरराष्ट्रीय आणि 96 राष्ट्रीय चित्रपटांचा समावेश होता. या महोत्सवादरम्यान एकंदरीत 83 तासांपेक्षा जास्त कालावधीचे स्क्रिनिंग केले गेले अशी माहितीही त्यांनी दिली. मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रेमंड क्रुम रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट तसेच मराठी चित्रपट, इफ्फी क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो, या आणि अशा 24 विशेष विभागांतर्गत निवडक चित्रपटांच्या खेळांची सत्रे आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून नावाजलेल्या कलाकृती, नवीन उदयोन्मुख प्रतिभा आणि प्रादेशिकत्वाच्या मूळांशी रुजलेली कथात्मक मांडणी एकाच व्यासपीठावर पाहण्याचा अनुभव आला असे त्यांनी सांगितले. सेंटिनरी ट्रिब्यूट अर्थात शताब्दी आदरांजली या विशेष विभागाअंतर्गत  दिग्गज चित्रपटकर्मी डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या दोन चित्रपटांचे खेळ दाखवून, त्यांच्या प्रतिभेचा गौरव केला गेला, असे त्यांनी म्हटले.

19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (मिफ) समारोप होत असताना, कथाकथन, सर्जनशीलता आणि सिनेमॅटिक उत्कृष्टतेची भावना चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांना समान रितीने प्रेरित करत आहे. जर चित्रपट हे आत्म्यासाठी एखाद्या अन्नपदार्थाप्रमाणे असतील, तर 'मिफ'ने पुन्हा एकदा सशक्त कथा, विविध दृष्टिकोन आणि परिवर्तनशील विचारांनी मनाचे पोषण केले आहे. हा अध्याय इथे संपत असला तरी, अर्थपूर्ण सिनेमाचा उत्सव साजरा करण्याचा प्रवास असाच सुरू राहील. चित्रपटप्रेमी आता 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी - IFFI) तसेच 2028 मध्ये होणाऱ्या 'मिफ'च्या आगामी आवृत्तीची आतुरतेने वाट पाहतील, जेव्हा जगभरातील कथाकारांचे स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा पडदा उघडेल आणि जोडण्याची, प्रेरित करण्याची तसेच चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्याची चित्रपटांची अफाट शक्ती पुन्हा एकदा अधोरेखित होईल.

 

* * *

पीआयबी मुंबई | जयदेवी पुजारी स्‍वामी/हर्षल आकुडे/राधिका अघोर/भक्‍ती सोनटक्‍के/राजेश शिरभाते/सुषमा काणे/राजश्री आगाशे/तुषार पवार/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2276316   |   Visitor Counter: 50

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , English , Urdu , Gujarati , Odia