गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन क्रमांक 1930 च्या कार्याचा आढावा घेतला आणि ही सेवा अधिक उत्तम बनवण्याचे निर्देश दिले
प्रविष्टि तिथि:
17 JUN 2026 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2026
नवी दिल्ली येथे आयोजित उच्च-स्तरीय बैठकीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन क्रमांक 1930 चा आढावा घेतला आणि ही सेवा अधिक उत्तम बनवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.सायबर गुन्हे विशेषतः सायबर आर्थिक फसवणुकीपासून नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या विविध नागरिक-केंद्री यंत्रणांचा देखील या बैठकीत आढावा घेण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, 1930 ही राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन नागरिकांना सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारी, विशेषतः आर्थिक सायबर फसवणुकीशी संबंधित गुन्हे सोप्या आणि तत्पर पद्धतीने नोंदवणे शक्य करून देणारा एक महत्वाचा मंच म्हणून उदयाला आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत मागणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेवर मदत मिळाली पाहिजे आणि कोणतीही तक्रार दुर्लक्षित अथवा प्रलंबित राहता कामा नये हे सांगण्यावर केंद्रीय मंत्र्यांनी अधिक भर दिला.
1930 या हेल्पलाईन यंत्रणेची कार्यक्षमता, प्रतिसाद क्षमता आणि सेवा वितरण आणखी सुधारण्यासाठी ही सेवा कृत्रिम बुद्धिमत्तेसह (एआय) इतर प्रगत तंत्रज्ञानांच्या स्वीकाराच्या माध्यमातून सर्वसमावेशकदृष्ट्या आधुनिक आणि अद्ययावत करण्याचे निर्देश अमित शाह यांनी यावेळी संबंधितांना दिले.
देशभरातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील 1930 कॉल सेंटर्स तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत आणखी बळकट करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. यासाठी आवश्यक असलेली हार्डवेअर आणि तांत्रिक अद्ययावतीकरण विषयक मदत केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे करण्यात येईल तर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तक्रारींचा वेळेवर निपटारा सुलभतेने व्हावा म्हणून या केंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ असेल याची सुनिश्चिती केली पाहिजे असे ते म्हणाले.
राष्ट्रीय सायबर गुन्हे प्रतिसाद यंत्रणा आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने, पुरेसे मनुष्यबळ आणि कॉल हाताळणी क्षमता यांनी सुसज्ज असे राष्ट्रीय स्तरावरील 1930 कॉल सेंटर स्थापन करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या. हे राष्ट्रीय कॉल सेंटर राज्य पातळीवर अनुत्तरीत राहिलेल्या कॉल्सची हाताळणी करेल आणि प्रत्येक पिडीताला वेळेवर मदत मिळेल तसेच तक्रारींची त्वरित नोंदणी होईल याची सुनिश्चिती करून घेईल.

सायबर आर्थिक फसवणुकींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने हाती घेतलेला महत्त्वाचा उपक्रम असलेल्या नागरिक आर्थिक सायबर फसवणूक अहवाल आणि व्यवस्थापन यंत्रणेच्या (सीएफसीएफआरएमएस) कामगिरीचा देखील आढावा सदर बैठकीमध्ये घेण्यात आला. ही यंत्रणा बँकिंग नेटवर्कच्या माध्यमातून होऊ शकणारे फसवणुकीचे आर्थिक व्यवहार रोखते आणि त्यायोगे पीडितांचे पैसे सुरक्षित राखण्याची आणि ते परत मिळवून देण्याची शक्यता वाढवते.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2274329)
आगंतुक पटल : 8