गृह मंत्रालय
राजस्थानमध्ये सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये सीमासुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बिकानेर येथे घेतली सुरक्षा आढावा बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय सीमांवर सर्वोच्च स्तराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध
बीएसएफ, सीबीडीटी, एनसीबी आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य करून घुसखोरी, अमली पदार्थ तस्करी, अतिक्रमण, दहशतवादाला वित्तपुरवठा तसेच सीमापार गुन्हेगारीला आळा घालावा
Posted On:
27 MAY 2026 6:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राजस्थानमधील बिकानेर येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या जिल्ह्यांमधील सुरक्षाविषयक मुद्यांचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली.

या बैठकीत, प्रत्येक सीमावर्ती जिल्ह्यासाठी व्यापक सुरक्षा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमाव्यवस्थापन अधिक समावेशक आणि मजबूत करण्यासाठी या एकात्मिक दृष्टिकोनामध्ये स्थानिक नागरिक, राज्य सरकार यंत्रणा आणि सर्व संबंधित सुरक्षा यंत्रणा सक्रियपणे सहभागी होतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध विशेषतः आंतरराष्ट्रीय सीमेपासून 0-15 किलोमीटर परिसरात होणाऱ्या अशा बांधकामांविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरणाची कठोर अंमलबजावणी करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशी सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्याचे निर्देश दिले.
घुसखोरी, अमली पदार्थांची तस्करी, अतिक्रमण, दहशतवादाला वित्तपुरवठा आणि इतर सीमापार गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी), अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) आणि राज्य शासनाच्या यंत्रणेसमवेत समन्वित सीमा व्यवस्थापन धोरणावर अमित शाह यांनी भर दिला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सायबर गुन्ह्यांवरील तातडीच्या कारवाईसाठी ‘1930’ कॉल सेंटरचा प्रभावीपणे वापर करण्याचे तसेच या प्रदेशात कायद्याची अंमलबजावणी आणि न्यायालयीन प्रक्रिया मजबूत करण्यासाठी तीन नवीन फौजदारी कायद्यांची पूर्ण अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत शेवटच्या टप्प्यापर्यंतचे प्रशासन मजबूत करणे, आर्थिक गुन्हेगारीला आळा घालणे, पायाभूत सुविधांमधील कमतरता भरून काढणे आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना आधार देण्यासाठी व्हायब्रंट व्हिलेज उपक्रम-2 (VVP-II) च्या यशस्वी अंमलबजावणीवर भर देण्यात आला. सीमावर्ती गावांमध्ये सर्व शासकीय योजनांचे 100% लाभ पोहोचवण्याचा पुनरुच्चारही करण्यात आला.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2265974)
अभ्यागत कक्ष : 16