पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींविषयी आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद
पश्चिम आशियातील संकटाच्या काळातही दुग्धखरेदी, प्रक्रिया आणि पुरवठा देशभरात सुव्यवस्थित आणि विना-अडथळा सुरू
सर्व राज्यांचे महासंघ आणि दुग्ध संघटना यांचे समर्पित पोर्टल स्थापन करून, दुग्धउत्पादने तसेच दूध, इंधन आणि पॅकेजिंग वस्तू यांच्या पुरवठा साखळीवर दैनंदिन देखरेख ठेवण्याची व्यवस्था
बगदाद इथल्या भारतीय दूतावासाच्या मदतीने इराकमधून 12 भारतीय खलाशी काल मुंबईत परतले
Posted On:
21 APR 2026 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026
पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीबाबत माध्यमांना सतत माहिती देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आजही नॅशनल मीडिया सेंटर इथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, बंदरे, जलमार्ग आणि नौवहन तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी इंधन उपलब्धता, सागरी कार्यान्वयन, संकटग्रस्त प्रदेशातील भारतीय नागरिकांना दिली जाणारी मदत आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये स्थैर्य राखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. त्याशिवाय, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अखत्यारीतील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागानेही अद्ययावत माहिती सादर केली.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाविषयीची अद्ययावत माहिती :
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच इतर संबंधित मंत्रालयांच्या समन्वयाने दुग्धउत्पादनांची मूल्यसाखळी सुविहीत सुरू राहण्यासाठी, अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
पश्चिम आशियातल्या संकटग्रस्त परिस्थितीनंतरहीम देशभरात दूध खरेदी, प्रक्रिया आणि पुरवठा अव्याहतपणे सुरू आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या किमती स्थिर आहेत, बाजारात कोणतीही पुरवठाविषयक अडचण निर्माण झालेली नाही. संपूर्ण संकटकाळात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना देयकेही नियमितपणे दिली जात आहेत.
या विभागाने हाती घेतलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे:
• पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली, सर्व हितधारकांसोबत नियमित बैठका घेऊन, बदलत्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
इंधन उपलब्धता
• इंधन ( गॅस) पुरवठ्यासंदर्भात, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालयाने, 8 एप्रिल 2026 च्या आदेशान्वये, महत्वाचे उद्योग, ज्यात दुग्धउत्पादने प्रक्रिया केंद्राचाही समावेश आहे, त्यांना मार्च 2026 पूर्वीच्या, ठोक, बिगर-घरगुती ( व्यावसायिक) एलपीजी पुरवठ्याच्या 70 टक्के पुरवठा होईल, हे सुनिश्चित करण्यात आले आहे. जेणेकरुन, दुग्धव्यवसायात कुठल्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत. त्याशिवाय, सर्व दुग्धव्यवसाय प्रकल्पांना एलपीजी वरुन, पीएनजी कडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पॅकेजिंग साहित्य
• पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालयाने स्थापन केलेल्या पेट्रोकेमिकल्सविषयक संयुक्त कार्यगटाचा सदस्य म्हणून, दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या पॅकेजिंग साहित्याच्या गरजांशी संबंधित मुद्दे या कार्यगटामार्फत सोडविण्यात आले आहेत. दुग्ध उद्योगात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पॅकेजिंगसाठी आवश्यक असलेल्या एलडीपीई या महत्त्वाच्या कच्च्या मालापैकी 0.23 टीएमटी चे वाटप मंत्रालयाने केले आहे. तसेच, दुग्ध पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कपांसाठी आवश्यक असलेले पॉलिप्रोपिलीन आणि पॉलिस्टायरीन यांचा सतत पुरवठा सुनिश्चित करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
• देशभरात पॅकेजिंग साहित्याचा सुरळीत पुरवठा राहावा यासाठी विभाग प्लास्टिक पॅकिंग साहित्य पुरवठादारांशी समन्वय साधला जात आहे.
दुग्ध क्षेत्रावर पश्चिम आशिया संकटाच्या परिणामांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि दूध स्थितीचा आढावा घेण्यासाठी देशभरातल्या राज्य दूध महासंघ/ दूध संघांसोबत 20.4.2026 रोजी बैठक घेण्यात आली. दुग्ध क्षेत्राला इंधन (गॅस) आणि प्लास्टिक पॅकेजिंग साहित्याच्या पुरवठ्याशी संबंधित कोणतीही समस्या नाही.
इंधन आणि पॅकेजिंग सामग्री, दुधाची उपलब्धता आणि दुग्ध पुरवठा साखळी यांवर दैनंदिन देखरेख शक्य व्हावी यासाठी 30.3.2026 रोजी समर्पित पोर्टल सुरू करण्यात आले असून त्यावर राज्य महासंघ आणि दुग्ध संघांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
निर्यात माल भारतीय बंदरांवर परत आणण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, 25.03.2026 पासून प्राण्यांच्या विलगीकरणाशी संबंधित मंजुरीची एक सुलभ कार्यपद्धती अधिसूचित करण्यात आली.
अंमलबजावणी आणि देखरेखसंबंधी कारवाई
एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात कारवाई सुरू आहे. देशभरात काल 2200 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी धडक कारवाई अधिक कडक केली असून 274 एलपीजी वितरकांवर दंड आकारण्यात आला आणि कालपर्यंत 67 एलपीजी वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आले.
एलपीजी पुरवठा
देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याची स्थिती:
सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होत आहे.
घरगुती ग्राहकांना एलपीजी पुरवठ्यात प्राधान्य देण्यात आले आहे.
एलपीजी वितरकांकडे सिलेंडर तुटवड्याची कोणतीही घटना नोंदवली गेली नाही.
व्यवसायिक ऑनलाइन एलपीजी सिलेंडर बुकिंग 98 टक्क्यांपर्यंत वाढले.
वितरणातील गैरव्यवहार टाळण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) आधारित वितरणात सुमारे 92% वाढ झाली आहे. डीएसी ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त होतो.
व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटप उपाययोजना:
एकूण व्यावसायिक एलपीजी वाटप संकटापूर्वीच्या पातळीच्या सुमारे 70% पर्यंत वाढवण्यात आले असून 10% वाटा सुधारणांशी-संलग्न आहे.
दिनांक 3 एप्रिल 2026 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी 5 किलो एफटीएल सिलिंडरसाठी 7400 हून अधिक जागरूकता शिबिरे आयोजित केली, यामध्ये 1,07,000 हून अधिक 5 किलोच्या एफटीएल सिलिंडरची विक्री करण्यात आली. काल, 410 हून अधिक शिबिरांमधून 5891 इतक्या 5 किलो एफटीएल सिलिंडरची विक्री झाली.
5 किलो एफटीएल जनजागृती शिबिरांपैकी एक शिबिर 20 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातल्या तारापूर येथे आयओसीएलद्वारे आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आणि सुमारे 550 – 5 किलो एफटीएल सिलेंडर्स विकले गेले.
23 मार्च 2026, पासून,19.28 लाखांहून अधिक 5 किलो एफटीएल सिलेंडर विकले गेले आहेत.
एप्रिल-26 या महिन्यादरम्यान (दिनांक 20.04.26 पर्यंत) एकूण 1,23,680 मेट्रिक टन (19 किलो एलपीजी सिलेंडरच्या 65 लाखांहून अधिक संख्येइतके) व्यावसायिक एलपीजीची विक्री करण्यात आली आहे.
20.04.2026 रोजी 8822 मेट्रिक टन (19 किलोच्या 4.64 लाख अधिक सिलेंडर्सच्या समतुल्य) व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली.
नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपाययोजना
घरगुती पीएनजी (डी-पीएनजी) आणि वाहतुक क्षेत्रातील सीएनजी पुरवठ्याला 100% प्राधान्य देण्यात आले आहे.
मार्च 2026 पासून, 5.01 लाखांहून अधिक पीएनजी जोडण्यांना गॅस पुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय, 5.68 लाखांहून अधिक ग्राहकांची नवीन जोडण्यांसाठी नोंदणी झाली आहे.
19.04.2026 पर्यंत, सुमारे 39,400 पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in संकेतस्थळाद्वारे आपल्या एलपीजी जोडण्या परत केल्या आहेत.
कच्च्या तेलाची स्थिती आणि तेलशुद्धीकरण कारखान्यांचे कामकाज
सर्व तेलशुद्धीकरण कारखाने उच्च क्षमतेने कार्यरत असून त्यांच्याकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, तसेच पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा राखला जात आहे.
• देशांतर्गत वापराची मागणी पुरवता यावी यासाठी तेलशुद्धीकरण कारखान्यातील घरगुती एलपीजीच्या उत्पादनात वाढ करण्यात आली आहे.
• 9 एप्रिल 2026 पासून 4400 मेट्रिक टनपेक्षा जास्त प्रोपिलीनची विक्री झाली आहे.
सागरी सुरक्षा आणि जहाजवाहतूक परिचालन
पर्शियन आखातातील सद्यस्थिती तसेच भारतीय जहाजे आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली. त्यात असे नमूद करण्यात आले की:
• संपूर्ण भारतातील बंदरांवरील कामकाज सामान्य असून कोणत्याही प्रकारची गर्दी झाल्याचे वृत्त नाही. या संदर्भात, मालवाहतुकीत लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि पूर्वी कळवल्याप्रमाणे प्रमुख पश्चिमी बंदरांमधून शहरात परत येणाऱ्या जवळपास 97% कंटेनर्सची वाहतूक सुरळीत झाली आहे.
• 28 फेब्रुवारी 2026 पासून एकूण 9 एलपीजी जहाजे आणि कच्चे तेल वाहून नेणाऱ्या एका जहाजाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास केला आहे, जे या प्रदेशातील सागरी वाहतूक हळूहळू स्थिर होत असल्याचे द्योतक आहे.
• या भागातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असून गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांशी संबंधित कोणतीही दुर्घटना घडल्याचे वृत्त नाही.
• डीजी शिपिंग कंट्रोल रूम अपडेट: कंट्रोल रूमने कार्यान्वित झाल्यापासून 7,086 दूरध्वनी आणि 14,975 पेक्षा जास्त ईमेल्स हाताळले आहेत. गेल्या 24 तासांत 168 दूरध्वनी आणि 370 ईमेल्स प्राप्त झाले आहेत.
• मायदेशी परत पाठवण्याबाबत अद्ययावत माहिती: मंत्रालयाने, नौवहन महासंचालनालयाच्या (डीजी शिपिंग) माध्यमातून आतापर्यंत 2,590 हून अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत पाठवण्याची सोय केली आहे, ज्यामध्ये गेल्या 24 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून परत आणलेल्या 27 खलाशांचा समावेश आहे.
या प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा
परराष्ट्र मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशिया प्रदेशातील घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून असून या प्रदेशातील भारतीय समुदायाची सुरक्षा, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. अशी माहिती देण्यात आली की:
• पंतप्रधानांच्या निर्देशानुसार, आखाती देशांशी विशेष संपर्क साधला जात आहे.
• राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी 19 एप्रिल 2026 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली.
• यापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीला आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्र्यांनी कतारला भेट दिली.
• ज्या देशांची हवाई हद्द खुली आहे, तेथून या प्रदेशातून भारतासाठी विमानसेवा सुरू आहे. 28 फेब्रुवारीपासून या प्रदेशातून सुमारे 11,61,000 प्रवाशांनी भारतात प्रवास केला आहे.
इराकमधून भारतीय खलाशांच्या परतीबाबत अद्ययावत माहिती
• इराकमध्ये अडकलेले 12 भारतीय खलाशी इराकी हवाई हद्द खुली झाल्यानंतर काल मुंबईत दाखल झाले. बगदादमधील भारतीय दूतावासाने त्यांना सर्वतोपरी मदत केली आणि त्यांची भारतात परतण्याची सोय केली.
सुषमा काणे/राधिका अघोर/सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2254272)
अभ्यागत कक्ष : 11