पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथील नारी शक्ती वंदन सम्मेलनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

Posted On: 13 APR 2026 2:40PM by PIB Mumbai

व्यासपीठावर विराजमान दिल्लीच्या लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता जी, केंद्रीय मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी जी, श्रीमती सावित्री ठाकूर जी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर जी, येथे आपल्या सर्वांच्या मध्ये देखील अनेक ज्येष्ठ लोक बसले आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, आपल्या लोकसभेच्या माजी सभापती आदरणीय मीरा कुमार जी देखील आपल्या मध्ये आहेत. येथे उपस्थित सर्व माझ्या सन्माननीय भगिनींनो, यावेळी देशात बैसाखीच्या सणाचा उत्साह आहे. उद्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नवीन वर्ष देखील साजरे केले जाईल. मी आज जलियावाला बाग हत्याकांडाच्या वीर बलिदानींना देखील श्रद्धांजली अर्पण करतो.

मित्रांनो, 

देशाच्या विकास प्रवासाच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यांदरम्यान भारत 21व्या शतकातील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक निर्णय घेणार आहे. मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे, की 21व्या शतकातील महत्त्वाच्या निर्णयांपैकी हा एक महत्त्वाचा निर्णय हा आहे. हा निर्णय नारीशक्तीला समर्पित आहे, नारीशक्ती वंदनला समर्पित आहे. आपल्या देशाची संसद एका नवीन इतिहासाच्या उंबरठ्यावर आहे. एक असा नवीन इतिहास जो भूतकाळातील संकल्पनांना साकार करेल, जो भविष्यातील संकल्पांना पूर्णत्व देईल. समतेवर आधारित भारताचा हा संकल्प आहे की, जिथे सामाजिक न्याय केवळ एक घोषणा नसेल, परंतु आपल्या कार्यसंस्कृतीचा, आपल्या कामाच्या ठिकाणच्या वातावरणाचा, आपल्या निर्णय प्रक्रियेचा, स्वाभाविक भाग असेल.

मित्रांनो,

राज्यांच्या विधानसभांपासून ते देशाच्या संसदेपर्यंत, अनेक दशकांच्या प्रतीक्षेच्या अंताची वेळ शेवट 16-17-18 आहे. 2023 मध्ये जे नवीन संसद भवन निर्माण झाले, त्यामध्ये आम्ही 'नारी शक्ती वंदन अधिनियम'च्या रूपाने पहिले पाऊल उचलले होते. ते वेळेत लागू व्हावे आणि महिलांचा सहभाग आपल्या लोकशाहीला मजबुती देईल, यासाठी 16 एप्रिलपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राच्या विशेष बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. आणि त्यापूर्वी आज आयोजित केलेल्या नारी शक्ती वंदनचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी माता-भगिनींचे आशीर्वाद आम्हाला  मिळत आहेत. मी येथे तुम्हाला उपदेश देण्यासाठी किंवा जागृत करण्यासाठी आलेलो नाही. मी आज आलो आहे तुम्हा सर्वांचे, देशातील कोटी-कोटी माता-भगिनींचे आशीर्वाद घेण्यासाठी. देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्व येथे उपस्थित राहिलात, मी तुमच्या या उपस्थितीसाठी, या महत्त्वाच्या कार्यासाठी तुम्ही जो वेळ काढला आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करतो. तसेच भारताच्या सर्व महिलांना एका नवीन युगाच्या आगमनाबद्दल शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

लोकशाही व्यवस्थेत महिलांना आरक्षण देण्याची गरज अनेक दशकांपासून प्रत्येकाला जाणवत होती आणि यावर सातत्याने चर्चा देखील होत असे. या विषयावर जवळपास 4 दशके म्हणजे 40 वर्षे उलटून गेली. यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे आणि अनेक पिढ्यांचे प्रयत्न सामील आहेत. प्रत्येक पक्षाने या विचाराला आपापल्या पद्धतीने पुढे नेले आहे. 2023 मध्ये जेव्हा नारी शक्ती वंदन अधिनियम पारित झाला, तेव्हा देखील सर्व पक्षांनी एकमताने त्याला मंजूरी दिली. आणि तेव्हा एकमताने हेही सांगितले गेले की कोणत्याही परिस्थितीत तो 2029 पर्यंत लागू झालाच पाहिजे. कायदा पारित होऊनही तो लागू न होणे, हे सभागृहातील कोणालाही मान्य नव्हते. आणि विशेषतः आमच्या विरोधी पक्षातील सर्व सहकाऱ्यांनी ठामपणे या गोष्टीवर जोर दिला होता की 2029 पर्यंत तो लागू व्हायला हवा. 2029 ची वेळ मर्यादा लक्षात घेता, सरकारने विरोधकांनी जी गोष्ट मांडली होती, आमच्यासाठी ती गोष्ट देखील गंभीर असते आणि म्हणूनच आम्ही सतत विचारविनिमय करत राहिलो, मंथन करत राहिलो, नवनवीन मार्ग शोधत राहिलो, ज्यांचा संविधानाचा सखोल अभ्यास आहे अशा लोकांचाही सल्ला घेतला. आणि आता 16 एप्रिलपासून संसदेत याच विषयावर सविस्तर चर्चा देखील होणार आहे.

मित्रांनो,

आमचा प्रयत्न आहे आणि आमची प्राथमिकता देखील आहे की, यावेळी देखील हे काम संवाद, सहयोग आणि सहभागाच्या माध्यमातूनच पूर्ण व्हावे. मला पूर्ण विश्वास आहे की, ज्या प्रकारे हा अधिनियम पारित झाला आणि संसदेची, सभागृहाची प्रतिष्ठा वाढली, त्याचप्रमाणे यावेळी देखील सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे संसदेची प्रतिष्ठा नवीन उंची गाठेल. देशातील प्रत्येक नारीला देखील अभिमान वाटेल की, प्रत्येक पक्षांनी राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्या हितासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, मी पाहत आहे की, गेल्या काही दिवसांपासून देशभरातील महिला या विषयावर ठामपणे आपले मत मांडत आहेत. व्यापक स्वरूपात चर्चा सुरू आहे आणि ही लोकशाहीची एक खूप मोठी ताकद आहे. विधानसभा आणि लोकसभेत पोहचण्याच्या त्यांच्या आणि तुमच्या स्वप्नांना, आता नवे पंख मिळणार आहेत. मला जाणवत आहे की, देशात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्यलढ्यापासून ते संविधान सभेच्या निर्णयांपर्यंत, स्वतंत्र भारताच्या पायाभरणीत भारतीय नारीशक्तीने अमूल्य योगदान दिले आहे, इतिहास याचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्यानंतरही ज्या महिलांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाली, त्यांनी देशासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. आपल्या देशात राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत, महिलांनी ज्या-ज्या पदांवर काम केले आहे, त्यांनी आपला एक वेगळा वारसा निर्माण केला आहे. सध्या देखील आपल्या देशात राष्ट्रपतींपासून ते अर्थमंत्र्यांपर्यंत, अशी महत्त्वाची पदे महिलाच सांभाळत आहेत. त्यांनी देशाची प्रतिष्ठा आणि गौरव, दोन्ही वाढवले आहेत.

मित्रांनो,

आपल्या देशात महिला नेतृत्वाचे उत्तम उदाहरण म्हणजे पंचायती राज संस्था आहेत. आज भारतात 14 लाखांहून अधिक महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यशस्वीरित्या काम करत आहेत. जवळपास 21 राज्यांमध्ये तर पंचायतींमध्ये त्यांचा सहभाग जवळपास 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आणि मी जेव्हा परदेशी पाहुण्यांशी कधी या विषयावर बोलतो, तेव्हा हा आकडा ऐकून ते आश्चर्यचकित होतात. 

मित्रांनो,

ही काही साधी गोष्ट नाही. लाखो महिलांची राजकारण आणि सामाजिक जीवनातील ही सक्रियता, जगातील मोठ्या नेत्यांना आणि राजकीय तज्ज्ञांना देखील खूप थक्क करणारी बाब आहे. आणि यामुळे संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावते.

मित्रांनो,

अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे की, जेव्हा निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला, तेव्हा व्यवस्थेत देखील संवेदनशीलता आली आहे. आणि ही एक खूप मोठी ताकद असते, आणि याचा परिणाम म्हणजे पाणी, शिक्षण, आरोग्य, पोषण, अशा अनेक विषयांवर अधिक समर्पण भावनेने, अधिक संवेदनशीलतेने, परिणामकारक कामे झाली आहेत. मला वाटते, जल जीवन मिशन, त्याच्या सर्वात मोठ्या यशाचे उदाहरण आहे; यामध्ये पंचायत स्तरावर महिलांच्या सहभागाचीच खूप मोठी भूमिका आहे.

मित्रांनो,

आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून ज्या लाखो महिला काम करत आहेत, नेतृत्व करत आहेत, त्यांच्याकडे तळागाळातील खूप समृद्ध आणि दीर्घ अनुभव आहे. त्या आता अधिक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तयार आहेत आणि उत्सुक ही आहेत. मी माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो. मी 2001 मध्ये नवीनच मुख्यमंत्री बनलो होतो, मला सरकार चालवण्याचा, शासन व्यवस्थेचा जास्त अनुभव नव्हता, एक प्रकारे मी नवीन व्यक्ती होतो. कदाचित 2002 किंवा 2003 ची घटना असेल, आमचे एक आमदार माझ्याकडे आले आणि म्हणाले की, त्यांच्या मतदारसंघातील एका गावातील पंचायतीच्या भगिनी मला भेटू इच्छितात. हा खेडा जिल्हा, आणंद जिल्ह्याचा परिसर होता, जिथे सरदार साहेबांचा जन्म झाला होता. मी म्हणालो, जर त्यांना पंचायतविषयक काही काम असेल तर त्यांना पंचायत मंत्र्यांना भेटू द्या. पण ते म्हणाले, नाही साहेब, त्या तुम्हालाच भेटू इच्छितात. मी विचारले का? तर ते म्हणाले, पंचायतीमध्ये सर्वच्या सर्व सदस्य महिला आहेत, आमच्या पंचायतीत एकही पुरुष सदस्य नाही. मी विचारले, असे कसे? ते म्हणाले, गावकऱ्यांनी ठरवले की यावेळी सरपंच महिला आहे तर सदस्यही सर्व महिलाच असतील, त्यामुळे कोणताही पुरुष निवडणूक लढलाच नाही. माझे लक्ष साहजिकच तिकडे गेले, मी म्हणालो, नक्कीच मी त्यांना भेटेन. छोटेसे गाव होते, कदाचित 13 सदस्यांची पंचायत होती. मी त्यांना वेळ दिला, त्या सर्व भेटायला आल्या. 13 भगिनी होत्या, त्यात ज्या गावाच्या सरपंच होत्या, त्या कदाचित 8 वी पर्यंत शिकलेल्या होत्या. बाकी ज्या भगिनी होत्या, त्यातील एक-दोन भगिनींनी पदरही घेतला होता. त्यातील काही जणींनी कदाचित शाळाही पाहिली नसेल. मला वाटले की, या सर्वांना मोठ्या लोकांनी किंवा सदस्यांनी काहीतरी कागदपत्रे हातात दिली असतील, काही मागणी घेऊन आल्या असतील की माझ्या गावात हे करा, माझ्या गावात ते करा. पण मी थक्क झालो, त्यांच्या हातात कोणताही कागद नव्हता. त्या बसल्यावर मी ओळख करून घेतली. मी विचारले, तुम्ही वेळ मागितली होती, काय काम होते? त्या म्हणाल्या, काही काम नाहीये, आम्ही निवडून आलो आहोत म्हणून फक्त भेटायला आलो होतो. आता हे माझ्यासाठी मोठे आश्चर्य होते, कारण नेते लोक जेव्हा येतात तेव्हा फक्त निवेदने घेऊन येतात. मग मी त्यांना विचारले, अच्छा सांगा, तुम्हाला जर 5 वर्षे इतके मोठे काम मिळाले आहे, तुम्ही सर्व भगिनी गाव सांभाळणार आहात, तर तुमचे स्वप्न काय आहे? 5 वर्षांत तुम्ही काय कराल? गाव कसे बनवाल? सामान्यतः काय उत्तर मिळाले असते? आमच्यासारखे जे मोठे दिसतात ना, ते काय उत्तर देतात – शाळा बांधू, रुग्णालय बांधू, रस्ता बनवू, अशीच उत्तरे देतात. त्या दिवशी 8 वी शिकलेल्या त्या सरपंचाने आणि तिच्यासोबत आलेल्या महिला सदस्यांनी मला जे उत्तर दिले, ते कदाचित जगातील मोठ्यात मोठा अर्थशास्त्रज्ञही देऊ शकणार नाही. आणि ती गोष्ट आज माझ्यासाठी एका धड्यासारखी आहे. मी मुख्यमंत्री झालो, पंतप्रधान झालो, पण त्या पंचायतीच्या महिलांची ती गोष्ट माझ्यासाठी आज ही मार्गदर्शक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे काय उत्तर दिले असेल? जेव्हा मी त्यांना विचारले, काय कराल तुम्ही, तुम्हाला 5 वर्षे मिळाली आहेत, गावाने तुमची निवड केलीच आहे तर; तेव्हा त्यांनी मला उत्तर दिले की, "साहेब, एकच इच्छा आहे." मी विचारले काय? आणि ते उत्तर आज ही माझ्या कानात घुमत राहते. त्या म्हणाल्या, "आमची इच्छा आहे की, आमच्या गावात कोणीही गरीब राहू नये." मोठमोठ्या अर्थशास्त्रज्ञांसाठी सुद्धा यापेक्षा मोठा संदेश असू शकत नाही. हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता आणि ते शब्द आजही माझ्या कानात घुमत राहतात. म्हणूनच जमिनीशी जोडलेल्या अनुभवातून जी वाणी निघते ना, ती वेदवाक्य बनते.

आणि म्हणूनच मित्रांनो,

नारीशक्ती वंदन अधिनियम लागू करणे, अशा सर्व महिलांच्या जीवनातील एक खूप मोठी संधी ठरणार आहे. आता पंचायतीपासून पुढे जाऊन संसदेपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे.

मित्रांनो,

आज विकसित भारताच्या आपल्या प्रवासात महिलांची भूमिका अधिकच महत्त्वाची झाली आहे. मला समाधान आहे की 2014 मध्ये, तुम्हा सर्व देशवासियांनी आम्हाला येथे सेवा करण्याची संधी दिली, आणि तेव्हापासून आतापर्यंत, आमच्या सरकारने महिलांच्या जीवनचक्राच्या प्रत्येक टप्प्यासाठी योजना तयार करून त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. आज पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आमचे सरकार कोणती ना कोणती योजना घेऊन भारताच्या माता-भगिनींच्या सेवेत हजर आहे. गर्भात मुलीची हत्या होऊ नये, यासाठी आम्ही ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान सुरू केले. गर्भावस्थेत मातेला योग्य पोषण मिळावे, यासाठी प्रत्येक गर्भवती मातेला ‘मातृ वंदना योजने’ अंतर्गत 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. जन्मानंतर मुलीला शिक्षणात अडचण येऊ नये, यासाठी जास्तीत जास्त व्याज मिळावे अशी ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरू केली. मुलीला गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी लहानपणी तिला योग्य वेळी लस मिळत राहावी, यासाठी ‘मिशन इंद्रधनुष’ सुरू केले. मुलीला शाळेत शौचालयाचा त्रास होऊ नये, यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत देशात करोडो शौचालये बांधली गेली. मुलीला मासिक पाळीच्या काळात त्रास होऊ नये, यासाठी जवळपास मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याचे अभियान सुरू केले गेले. मुलगी जर क्रीडा क्षेत्रातपुढे जाऊ इच्छित असेल, तर तिला ‘खेलो इंडिया अभियान’ अंतर्गत वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंत मदत मिळत आहे. मुलगी जर मोठी होऊन भविष्यात सैन्यात जाऊ इच्छित असेल, तर त्यासाठी सरकारने सैनिक स्कूलमध्ये प्रवेशाचे दरवाजे उघडले आहेत, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये जाण्याचे मार्ग उघडले आहेत. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात, मुलीला स्वयंपाकघरात धुराचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आम्ही ‘उज्ज्वला योजना’ सुरू केली, कोट्यवधी गॅस कनेक्शन मोफत दिले. मुलीला मैलोनमैल डोक्यावर पाणी वाहून न्यावे लागू नये, यासाठी आम्ही ‘हर घर नल से जल’ अभियान सुरू केले. मुलीला आपल्या कुटुंबासाठी रेशनची चिंता करावी लागू नये, यासाठी मोफत रेशनची योजना सुरू करण्यात आली. आपल्या कौटुंबिक जीवनात मुलींना उपचारांची चिंता नसावी, यासाठी त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्मान योजना आधार बनली आहे. 80 टक्के सवलतीत स्वस्त औषधांसाठी जन औषधी केंद्रे असोत, या सर्वांचा सर्वात जास्त फायदा आपल्या भगिनी आणि मुलींना होत आहे.

मित्रांनो, 

तुम्ही सर्व या गोष्टीला चांगल्या प्रकारे जाणता, की भारतात महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी त्यांची आर्थिक भागीदारी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक योजनेत या बाबीला प्राधान्य देण्यात आले आहे. आधी कुटुंबाची संपत्ती मुख्य स्वरूपात पुरुषांच्या नावावर असायची. घर आहे तर पुरुषाच्या नावावर, शेत आहे तर पुरुषाच्या नावावर, दुकान आहे तर पुरुषाच्या नावावर, गाडी आहे तर पुरुषाच्या नावावर, स्कूटर आहे तर ती सुद्धा पुरुषाच्या नावावर, आणि हे सहज चालत होते. आम्ही ‘पीएम आवास योजना’ मध्ये घरांना प्राधान्याच्या आधारावर कुटुंबाच्या महिलांच्या नावावर नोंदणी करणे सुरू केले. मुले शाळेत जातात तर स्वाभाविक रूपाने वडिलांचे नाव नाव नोंदवले जात असे, पण आम्ही बदल करून आईचे नावही नोंदवले जावे, अशी व्यवस्था केली. गेल्या 11 वर्षात या निर्णयाचा लाभ 3 कोटींपेक्षा अधिक महिलांना झाला आहे आणि त्या स्वतःच्या घराच्या मालकीण बनल्या आहेत.  यामुळे आज घरांमध्ये महिला सुद्धा आर्थिक रूपाने सुद्धा सशक्त बनत आहेत. साधारणपणे वडील आणि मुलगा व्यवसायाविषयी चर्चा करत असताना, जर आई चहा घेऊन आली आणि थोडा वेळ उभी राहिली, तर अरे तू जा, किचनमध्ये जा, आम्ही बोलत आहोत, असे सांगितले जाते.  मी गृहस्थ नाही आहे, पण माहिती खूप आहे. पण आता महिलांकडे आर्थिक ताकद आली आहे, त्यामुळे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सन्मानाने सहभाग वाढला आहे. आता मुलगाही म्हणतो—“आईलाही बोलवा, तिलाही चर्चेत सहभागी करा.”

मित्रांनो, 

2014 मध्ये आमच्या देशात कोट्यवधी महिला अशा होत्या ज्यांनी कधी बँकेचा दरवाजा सुद्धा पाहिला नव्हता. महिला बँकिंग व्यवस्थेशी जोडल्याच नव्हत्या, तर त्यांना बँकिंगचा लाभ कसा मिळणार? आम्ही जनधन योजना सुरू केली आणि देशातील 32 कोटी पेक्षा जास्त महिलांची बँक खाती उघडली. मी जेव्हा गुजरातमध्ये होतो, तेव्हां एका निर्णयासाठी मला सुरुवातीला खूप अडचण आली होती. गुजरातमध्ये सहकारी दुग्ध व्यवसायाचे मोठे साम्राज्य आहे, खूप मोठे काम होते, आणि पशुपालनाचे जास्तीत जास्त काम आमच्या माता-भगिनी करतात. त्या दूध देण्यासाठी जातात आणि त्याचे पैसे आठवड्यानंतर पुरुषांना दिले जातात. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा बदल केला, मी सांगितले की मी पुरुषांना देणार नाही, त्या वेळी मी बँकांमध्ये दूध भरण्यासाठी येणाऱ्या भगिनींची बँक खाती उघडली, आणि तेव्हांपासून डेअरीमध्ये दुधाचे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जाऊ लागले.

मित्रांनो, 

आज आमच्या मुली नवीन-नवीन व्यवसाय करत आपली ओळख निर्माण करत आहेत.  मुद्रा योजनेअंतर्गत 60 टक्क्यांहून अधिक कर्ज महिलांनी घेतले आहेत. देशाच्या स्टार्टअप क्रांतीतही महिला आघाडीवर आहेत. आज 42 टक्क्यांहून अधिक नोंदणाकृत स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक आहे. महिलांच्या करिअरवर परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही मातृत्व रजा सुद्धा वाढवून 26 आठवडे केली आहे. जगातील समृद्ध देशांमध्ये सुद्धा अशी सुविधा नाही. जेव्हा मी त्यांना सांगतो तेव्हा त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारतात.

मित्रांनो, 

तुम्हाला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी देशाने ‘स्किल इंडिया मिशन’ सुरु केले. आम्ही कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले होते. आज त्याचे परिणाम आपण हजारो ड्रोन दीदींच्या माध्यमातून होत असलेल्या कृषी क्रांतीच्या रूपात पाहत आहोत. मी एकदा या ज्या ड्रोन दीदी आहेत, त्यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत होतो. गावातील मुली, सुना- तीज्या ड्रोन चालवत आहेत—त्यांनी मला सांगितले, “आधी आम्हाला गावात कोणी नावाने हाक मारायचे, आता आम्हाला ‘पायलट’ म्हणून हाक मारतात.” आमची ओळख बनली आहे, आम्ही पायलट आहोत. म्हणजेच, एका छोट्याशा निर्णयामुळे समाजातील धारणा किती वेगाने बदलू शकते, हे दिसून येते. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महिला आधुनिक शेती शिकत आहेत. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, गेल्या 11 वर्षात सुमारे 10 कोटी महिला, स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्या आहेत. सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देत असलेल्या अशा 6 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आणि यातील 3 कोटींहून जास्त ग्रामीण महिला लखपती दीदी बनल्या आहेत. आणि या महिला स्वयं-सहायता गटांना बँकांकडून कर्ज दिले जाते आणि तुम्ही जाणून आनंदी होईल,  जर त्यांना बुधवारपर्यंत पैसे जमा करायचे असतील, तर त्या मंगळवारीच जमा करतात—एक दिवस आधीच. या बहिणींच्या प्रामाणिकपणामुळे कोणताही एनपीए होत नाही;, सर्वच्या सर्व पैसे बँकांमधून जातात, तितकेच परत येतात. आणि मी शासनात आल्यानंतर बँकिंग व्यवहारांत गरीबांची समृद्धी आणि श्रीमंतांची गरीबीही पाहिली आहे.

एवढेच नाही मित्रांनो, 

इतकेच नव्हे तर आपल्या माता-भगिनी ‘व्होकल फॉर लोकल’च्या ब्रँड ॲम्बेसेडर बनत आहेत. भगिनींनो, महिला-नेतृत्वाखालील विकास दृष्टिकोनाचे खूप मोठे यश म्हणजे त्याने महिलांविषयीच्या जुन्या विचारसरणीला आव्हान दिले. आता जी-20 परिषदेदरम्यान आपण अध्यक्षपद भूषवत होतो, तेव्हां जगातील देशांना मला समजवावे लागले होते की, महिला विकास आणि महिला-नेतृत्वाखालील विकास यात काय फरक असतो. जगाचा एक खूप मोठा वर्ग महिला विकासा पर्यंत सहमत होता, महिला-नेतृत्वाखालील विकास मला प्रयत्न करावे लागत होते. आणि त्यात आम्ही यशस्वी देखील झालो. या विचाराचा परिणाम आहे की, आज महिला त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा शिखरे सर करत आहेत जिथे कधी पुरुषांचे वर्चस्व होते. आज आमच्या मुली फायटर पायलट बनून  आकाशाला गवसणी घालत आहेत. आज भारतात जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत, हा आकडा सुद्धा तुम्हाला आनंदी करेल, जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत महिला पायलटांची टक्केवारी सर्वात जास्त भारतात आहे. आज पीएचडी प्रवेशामध्ये मुलींची संख्या 2014 च्या तुलनेत दुप्पट झाली आहे. उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात जवळपास अर्धा वाटा मुलींचा आहे. गणित आणि विज्ञान, म्हणजेच STEM शिक्षणात मुलींचा सहभाग जवळजवळ 43 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मला आठवते मी जगातील एका विकसित देशात एकदा गेलो होतो, तर तिथले शिक्षण मंत्री माझ्यासोबत लिफ्टमध्ये होतो, त्यांनी मला विचारले की भारतात महिलांचे शिक्षण कसे आहे? मी सांगितले—खूप चांगले, काही ठिकाणी तर पुरुषांपेक्षा अधिक. त्यांनी STEM मध्ये महिलांचा वाटा विचारला, तेव्हा मी सांगितले—सुमारे ५० टक्के. हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले. हे जगातील विकसित देशाच्या शिक्षण मंत्र्याबद्दल मी बोलत आहे.

मित्रांनो, 

आपल्या समाजात एक मोठे आव्हान महिला सुरक्षेबाबत सुद्धा राहिले आहे. शतकानुशतके महिलांना आपल्या सुरक्षेसाठी मौन बाळगावे लागले आहे. आमच्या सरकारने या दिशेने सुद्धा ठोस पावले उचलली आहेत. न्याय व्यवस्था अधिक संवेदनशील बनावी, निर्णय प्रक्रिया वेगवान व्हावी, यासाठी आम्ही कायदेशीर बदल तर केलेच आहेत, सोबतच, फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयांची स्थापना सुद्धा केली गेली आहे. भारतीय न्याय संहितेत सुद्धा महिला सुरक्षेला प्राधान्य दिले गेले आहे. एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सोपी बनवली गेली आहे, आता कोणत्याही ठिकाणाहून ई-एफआयआर किंवा झिरो-एफआयआर दाखल केली जाऊ शकते. पीडितेचा जबाब ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड करण्यासारख्या व्यवस्था लागू केल्या गेल्या आहेत. अशी कितीतरी पावले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्ही पुरोगामी समाजाची संकल्पना साकार करत आहोत.

मित्रांनो, 

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक चिंता, सुख-दुःखात, प्रत्येक संधीच्या वेळी, अशा प्रत्येक परिस्थितीचा विचार करून आमच्या सरकारने अनेक लहान-मोठ्या पावलांद्वारे महिलांचे सशक्तीकरण केले आहे. याचाच परिणाम आहे, की देश आता आपल्या लोकशाहीला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे.

मित्रांनो, 

देशाच्या नारीशक्तीने आपल्या परिश्रमाने, धैर्याने आणि आत्मविश्वासाने नवीन उंची गाठली आहे. आता आपल्याला मिळून या शक्तीला नवीन ऊर्जा द्यायची आहे, त्यासाठी संधींचा विस्तार करायचा आहे. मी आज या मंचावरून देशातील प्रत्येक माता, भगिनी, मुली, सर्वांना विश्वास देऊ इच्छितो, की देश त्यांच्या आकांक्षा समजतो, आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रत्येक आवश्यक पावले उचलत आहे.

मित्रांनो, 

संसदेत होणाऱ्या चर्चेपूर्वी मी, देशाच्या नारीशक्तीला सुद्धा हे आवाहन करतो, की तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेत आपला सक्रिय सहभाग ठेवा. तुम्ही आपापल्या क्षेत्रातील खासदारांना सुद्धा नक्की भेटा. देशातील महिलांनी आपल्या खासदारांकडे आपली बाजू मांडावी, आपल्या अपेक्षा त्यांना सांगाव्यात. आणि ज्या दिवशी ते सदनात येण्यासाठी आपल्या इथून निघतील, तेव्हा त्यांना पुष्पहार घालून शुभेच्छा देत निरोप द्या. जेणेकरून जेव्हा माता-भगिनींचे आशीर्वाद घेऊन खासदार निघतील, तेव्हा ते योग्य निर्णय घेतील. महिलांच्या हिताचा निर्णय घेतील, आणि सर्वानुमते योग्य दिशा निवडतील. 

मित्रांनो, 

माझी आपल्या सर्वांंना एक विनंती आहे. नारी शक्ती वंदन कार्यक्रमात होत असलेल्या चर्चांना देशातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवा. वैयक्तिक संवादातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, अन्य प्रचार साधनांच्या माध्यमातून, आपल्याला हा मोठा निर्णय देशातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवायचा आहे. आपल्याला त्यांना जागरूक करायचे आहे, जेणेकरून, त्या या मोठ्या निर्णयाची ताकद समजून घेऊ शकतील, जेणेकरून, त्या आपली भूमिका समजून घेऊ शकतील, आणि, उघडपणे हे स्वप्न पाहू शकतील, की येणाऱ्या काळात राज्यांपासून ते देशाच्या संसदेपर्यंत, त्या आपली उपस्थिती नोंदवू शकतात. चला, आपण सर्वजण मिळून हा संकल्प करूया, नारीशक्तीला त्यांचे अधिकार मिळतील, आणि त्या निर्णय प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी सुद्धा होतील. हीच आमच्या उज्ज्वल भविष्याची सर्वात मोठी हमी आहे. मी तर हे सुद्धा म्हणेन की 16-17-18, या दिवशी जे  सभापती महोदयांच्या अधिकाराचे क्षेत्र आहे. पण माझी इच्छा आहे की त्या वेळी प्रेक्षक गॅलरी महिलांनीच भरलेली असावी. संपूर्ण देशात एक उत्सवाचे वातावरण निर्माण होईल, आणि हा पक्ष तो पक्ष असा विषय राहणार नाही, कोण जिंकले, कोण हरले, कोणी केले, कोणी नाही, याचे सर्व श्रेय देशाच्या मातृशक्तीला आहे, सर्व श्रेय देशाच्या संसदेला आहे, सर्व श्रेय भारतातील सर्व राजकीय पक्षांना आहे, सर्व श्रेय गेल्या 3-4 दशकांपासून सातत्याने या दिशेने प्रयत्न करत आहेत, या सर्वांचे श्रेय आहे. हा सर्वांचा, सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे. याच विश्वासासह आपण सर्वांनी वेळ काढून, इतक्या उत्साहासह या कार्यक्रमात सहभागी झालात, मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो.

खूप-खूप धन्यवाद.

***

NitinFulluke / NehaKulkarni / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2252536) अभ्यागत कक्ष : 9