शिक्षण मंत्रालय
इंडिया एआय शिखर परिषद 2026 मध्ये शिक्षण मंत्रालयाने आयोजित केले "भारतात एआय च्या सीमारेषांचा विस्तार करणे " याविषयावरील सत्र
भारताच्या जागतिक ज्ञान नेतृत्वात एआय महत्त्वाची भूमिका बजावेल आणि विकसित भारत साकारण्यातही महत्वाचे योगदान देईल : धर्मेंद्र प्रधान
Posted On:
17 FEB 2026 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित इंडिया एआय शिखर परिषद 2026 मध्ये आज "शिक्षण मंत्रालय - भारतात एआय च्या सीमारेषांचा विस्तार करणे " या विषयावरील विशेष सत्र आयोजित केले होते.

या सत्राला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी देखील उपस्थित होते.
ही शिखर परिषद म्हणजे भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला एक अभूतपूर्व उपक्रम आहे, असे प्रधान यावेळी म्हणाले.

भारताच्या वेगवान तांत्रिक प्रगतीला अधोरेखित करताना प्रधान यांनी सांगितले की देश कृत्रिम बुद्धिमत्तेला एका अभूतपूर्व गतीने आपल्या कवेत घेत असताना जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. भारताला एक जागतिक ज्ञान केंद्र म्हणून उदयाला आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एक परिवर्तनकारी भूमिका पार पाडेल आणि विकसित भारत 2047 च्या स्वप्नाला साकार करण्यातील त्याचे योगदान महत्त्वपूर्ण असेल, असे ते म्हणाले.

युवा नवोन्मेषकर्मींवर भर देत प्रधान म्हणाले की भारतातील युवाशक्ती याआधीच्या पिढीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करत आहे. शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण हे एकमेकांमध्ये खोलवर गुंफलेले आहेत, यावर त्यांनी भर दिला, विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांना एआयचा वापर शिक्षित करण्यासाठी, स्वीकारण्यासाठी, सक्षम करण्यासाठी आणि अभूतपूर्व उपक्रम तयार करण्यासाठी करण्याचे आवाहन केले. अशा प्रयत्नांमुळे भारताला विकसित होत असलेल्या जागतिक एआय परिसंस्थेत एक अग्रगण्य शक्ती म्हणून स्थान मिळण्यास मदत होईल.
इंडिया एआय समिट 2026 मधील चर्चा अभ्यासपूर्ण होती, असे जयंत चौधरी म्हणाले.
गेल्या दशकभरात शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ, धोरण चौकट, संस्थात्मक सुधारणा आणि शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि प्रगत संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात क्षमता-निर्मिती उपक्रमांद्वारे एआय-सक्षम शिक्षणाचा पाया घातला आहे.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय घोषणांनुसार केंद्र सरकारने आयआयटी मद्रास येथे शिक्षणासाठी एआय एक्सलन्स सेंटरची स्थापना केली आहे. शिक्षणात एआय चा समावेश करुन घेण्याच्या उद्देशाने एक पथदर्शी आराखडा तयार करण्यासाठी मंत्रालयाने शैक्षणिक संस्था, उद्योगजगत, नागरी समाज आणि शासकीय संस्थांशी विविध मुद्द्यांवर विचारविनिमय केला आहे.
या शिखर परिषदेत झालेल्या सत्रामध्ये भारताचे धोरणात्मक दृष्टिकोनातून अंमलबजावणीच्या दिशेने झालेले मोठे संक्रमण, सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर, उत्कृष्टता केंद्रे, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम एकत्रीकरण आणि उद्योग आणि स्टार्टअप्ससह सखोल सहकार्य यावर प्रकाश टाकण्यात आला.
या पॅनेलमध्ये शैक्षणिक, उद्योग आणि गुंतवणूक परिसंस्थेतील नामांकित नेते उपस्थित होते.
या चर्चेमध्ये प्रशासनाचा ढाचा , राष्ट्रीय शिक्षण मंच, स्वदेशी ए आय नवोन्मेष आणि आघाडीच्या एआय मॉडेल्सचा जबाबदारीने वापर हे एकत्र येऊन भारतातील शिक्षण परिणाम सुधारण्यात कसे योगदान देत आहेत, यावर भर देण्यात आला.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229166)
अभ्यागत कक्ष : 19