माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑरेंज इकॉनॉमी आणि सर्जनशील शिक्षणाला चालना देण्यासाठी भरीव तरतुदींची केली घोषणा


भारतातील एव्हीजीसी क्षेत्र आणि कौशल्य परिसंस्था मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात  घोषणा

या अर्थसंकल्पाचे युवा शक्ती आणि नारी शक्तीला बळकट करण्याचे उद्दिष्ट आहे आणि तो कर्तव्याने प्रेरित आहे: अश्विनी वैष्णव

Posted On: 01 FEB 2026 7:35PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक वर्ष 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. भारताच्या शिक्षण आणि कौशल्य परिसंस्थेसाठी एक परिवर्तनकारक आराखडा मांडताना, अर्थमंत्र्यांनी ऑरेंज इकॉनॉमी अर्थात 'केशरी अर्थव्यवस्थेला’ प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील सर्जनशील उद्योगांना बळकटी देण्यासाठी प्रमुख उपक्रम जाहीर केले आहेत.

भारतातील ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्राच्या जलद वाढीला अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले. 2030 पर्यंत या उद्योगाला अंदाजे 20 लाख व्यावसायिकांची गरज भासणार आहे, असे  अर्थमंत्र्यांनी नमूद केले. या विस्तारत असलेल्या परिसंस्थेला बळ देण्यासाठी त्यांनी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज', मुंबई यांना देशभरातील 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये 'एव्हीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब्स' स्थापित करण्यासाठी मदतीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रयोगशाळांमधून तरुणांसाठी नवीन सर्जनशील करिअरच्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.

भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ तयार करण्यासाठी, भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी आणि देशभरातील विद्यार्थ्यांसाठी संधींचा विस्तार करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. “हा अर्थसंकल्प युवा शक्ती आणि महिलांच्या सामर्थ्याने प्रेरित असलेला एक कर्तव्य प्रेरित अर्थसंकल्प आहे,” असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वेव्हजच्या माध्यमातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेले आहे, असे त्यांनी नमूद केले. आयआयटी  आणि आयआयएम च्या धर्तीवर स्थापन झालेली आयआयसीटी  मुंबई, 'क्रिएटर लॅब्ज'च्या माध्यमातून 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांशी जोडली जाईल, ज्यामुळे 20 लाख नवीन रोजगार निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आर्थिक पाहणी अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, भारताचे मीडिया आणि एंटरटेनमेंट  क्षेत्र हे सेवा अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास आले आहे, ज्यामध्ये ऑडिओ-व्हिज्युअल उत्पादन, ब्रॉडकास्टिंग, डिजिटल कंटेंट, ऍनिमेशन, गेमिंग, जाहिरात आणि थेट मनोरंजन यांचा समावेश होतो. गेल्या दशकात, हे क्षेत्र डिजिटल आणि प्लॅटफॉर्म-आधारित वितरणाकडे वेगाने वळले आहे, ज्यामुळे महसूल मॉडेल्स, रोजगार आणि मूल्य साखळी  यामध्ये बदल झाला आहे. 2024 मध्ये अंदाजे 2.5 ट्रिलियन रुपये मूल्य असलेल्या या क्षेत्राची वाढ वाढते उत्पन्न, इंटरनेटचा प्रसार, ओटीटी  विस्तार आणि एआय  आधारित नाविन्यपूर्ण बदलांमुळे होत आहे.

केशरी अर्थव्यवस्थेबद्दल

केशरी अर्थव्यवस्था' म्हणजे अर्थव्यवस्थेचा असा भाग जो सर्जनशीलता, संस्कृती आणि बौद्धिक संपदेवर आधारित असतो. यामध्ये मूल्य हे प्रामुख्याने भौतिक वस्तूंपेक्षा कल्पना, ज्ञान, कलात्मक अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक आशयातून  निर्माण होते.

***

निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2221919) अभ्यागत कक्ष : 66