अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये क्रीडा साहित्यासाठी समर्पित उपक्रमाचा प्रस्ताव, उत्पादन, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्याचा उद्देश


उच्च दर्जाच्या, परवडणाऱ्या क्रीडा साहित्याचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्याच्या भारताच्या क्षमतेवर उपक्रमाचा भर

पुढील दशकात क्रीडा क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी 'खेलो इंडिया मिशन'ची घोषणा

'खेलो इंडिया' कार्यक्रमाद्वारे सुरू केलेल्या क्रीडा प्रतिभेच्या पद्धतशीर विकासाला पुढे नेणार 'खेलो इंडिया मिशन'

प्रविष्टि तिथि: 01 FEB 2026 3:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2026

 

उच्च दर्जाच्या, परवडणाऱ्या क्रीडा साहित्याचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्याची भारताची क्षमता लक्षात घेत, देशात क्रीडा साहित्य क्षेत्रासाठी एक समर्पित उपक्रम सुरू केला जाणार आहे. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना ही माहिती दिली.

क्रीडा साहित्यासंबंधीची ही घोषणा या वर्षीच्या अर्थसंकल्पाचे आधारस्तंभ असलेल्या तीन कर्तव्यांपैकी पहिल्या कर्तव्यावर केंद्रित आहे, ते म्हणजे, 'उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवून तसेच जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर लवचिकता निर्माण करून आर्थिक विकासाला गती देणे आणि ती गती कायम राखणे'. क्रीडा साहित्याच्या या उपक्रमाचा उद्देश उपकरणांच्या रचनेपासून ते मटेरियल सायन्सेस या दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्पादन, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देणे हा आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात भारताची क्रीडा परिसंस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन म्हणाल्या, “क्रीडा क्षेत्रात रोजगार, कौशल्य विकास आणि नोकरीच्या संधींचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. 'खेलो इंडिया' कार्यक्रमाद्वारे सुरू केलेल्या क्रीडा प्रतिभेच्या पद्धतशीर विकासाला पुढे नेत, पुढील दशकात क्रीडा क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी 'खेलो इंडिया मिशन' सुरू करण्याचा प्रस्ताव मी देत आहे.” हे पाऊल अर्थसंकल्पात नमूद केलेल्या दुसऱ्या कर्तव्याशी सुसंगत आहे, ते म्हणजे ‘जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांची क्षमता वाढवणे, जेणेकरून भारताच्या समृद्धीच्या प्रवासात ते सक्षम भागीदार बनतील'.

अर्थमंत्र्यांनी सांगितल्यानुसार, 'खेलो इंडिया मिशन' खालील गोष्टींना सुलभ करेल:

  • मूलभूत, मध्यम आणि उच्च स्तरावरील प्रशिक्षण केंद्रांद्वारे समर्थित एकात्मिक प्रतिभा विकास मार्ग,
  • प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा पद्धतशीर विकास,
  • क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण,
  • क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्पर्धा आणि लीग;  आणि
  • प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास.

 

* * *

हर्षल आकुडे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2221571) आगंतुक पटल : 114
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam