पंतप्रधान कार्यालय
केरळच्या आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
28 JAN 2026 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2026
नमस्कारम !
केरळचे राज्यपाल, श्रीयुत राजेंद्र आर्लेकर जी, आर्य वैद्यशाळेशी संबंधित सर्व मान्यवर, महिला आणि पुरुष,
आज या प्रतिष्ठेच्या प्रसंगी, तुम्हा सर्वांशी जोडले जाणे माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आयुर्वेदाचे जतन, संरक्षण आणि प्रसार करण्यात आर्य वैद्यशाळेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या 125 वर्षांच्या प्रवासात या संस्थेने, आयुर्वेदाला उपचाराची एक सशक्त व्यवस्था म्हणून प्रस्थापित केले आहे. आज या निमित्ताने, मी आर्य वैद्यशाळेचे संस्थापक, वैद्यरत्नम पी. एस. वारियर जी यांच्या योगदानाचे स्मरण करतो. आयुर्वेदाप्रति त्यांचा दृष्टिकोन आणि लोककल्याणासाठी असलेले त्यांचे समर्पण, आजही आपल्याला प्रेरित करते.
मित्रांनो,
केरळची आर्य वैद्यशाळा ही भारताच्या त्या उपचार परंपरेचे जिवंत प्रतीक आहे, जिने शतकानुशतके मानवतेची सेवा केली आहे. भारतात आयुर्वेद कोणत्याही एका काळापुरता किंवा एका क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नाही. प्रत्येक कालखंडात या प्राचीन चिकित्सा पद्धतीने जीवन समजून घेण्याचा, संतुलन राखण्याचा आणि निसर्गाशी ताळमेळ बसवण्याचा मार्ग दाखवला आहे. आज आर्य वैद्यशाळा 600 पेक्षा अधिक आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करते; देशाच्या विविध भागांत या संस्थेची रुग्णालये आयुर्वेदिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करत आहेत, ज्यामध्ये जगातील 60 पेक्षा अधिक देशांतील रुग्णांचा समावेश असतो. आर्य वैद्यशाळेने हा विश्वास आपल्या कार्यातून निर्माण केला आहे. जेव्हा लोक संकटात किंवा आजारपणात असतात, तेव्हा तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी एक मोठी आशा बनता.
मित्रांनो,
आर्य वैद्यशाळेसाठी सेवा हा केवळ एक विचार नाही, तर ही भावना त्यांची कृती, दृष्टिकोन आणि संस्थांमध्येही दिसून येते. संस्थेचे धर्मादाय रुग्णालय गेल्या 100 वर्षांपासून—आणि 100 वर्षे हा काही कमी कालावधी नाही—100 वर्षांपासून निरंतर लोकांच्या सेवेत कार्यरत आहे. यामध्ये रुग्णालयाशी संबंधित सर्व लोकांचे योगदान आहे. मी रुग्णालयाचे वैद्य, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर सर्व लोकांचेही अभिनंदन करतो. धर्मादाय रुग्णालयाच्या प्रवासाची 100 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तुम्ही सर्वजण अभिनंदनास पात्र आहात. केरळच्या लोकांनी आयुर्वेदाच्या ज्या परंपरा शतकानुशतके जिवंत ठेवल्या आहेत, तुम्ही त्या परंपरांचे संरक्षणही करत आहात आणि संवर्धनही करत आहात.
मित्रांनो,
देशात प्रदीर्घ काळापासून प्राचीन चिकित्सा पद्धतींकडे 'सायलो' मध्ये म्हणजे तुकड्या-तुकड्यांत पाहिले जात होते. गेल्या 10-11 वर्षांत या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आता आरोग्य सेवांकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, सिद्ध आणि योग या सर्वांना आपण एका 'छत्राखाली' आणले आहे आणि यासाठी विशेषत्वाने 'आयुष' मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. आपण 'प्रिव्हेंटिव्ह हेल्थ' म्हणजेच प्रतिबंधात्मक आरोग्यावर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. याच विचारातून 'नॅशनल आयुष मिशन' सुरू करण्यात आले, 12,000 पेक्षा अधिक 'आयुष वेलनेस सेंटर्स' उघडण्यात आली. या केंद्रांमध्ये योग, प्रतिबंधात्मक काळजी, सामुदायिक आरोग्य सेवा या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आपण देशातील इतर रुग्णालयांनाही आयुष सेवांशी जोडले आहे आणि आयुष औषधांच्या नियमित पुरवठ्यावरही लक्ष दिले आहे. याचा उद्देश स्पष्ट आहे की, भारताच्या या पारंपरिक चिकित्सा ज्ञानाचा लाभ देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना मिळावा.
मित्रांनो,
सरकारच्या धोरणांचा स्पष्ट प्रभाव आयुष क्षेत्रावर दिसून येत आहे. आयुष मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वेगाने पुढे सरसावले आहे आणि त्याचा विस्तार झाला आहे. भारतीय पारंपरिक निरामयता जगापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने 'आयुष एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल'ची स्थापना केली आहे. आयुष उत्पादने आणि सेवांना जागतिक बाजारपेठेत चालना मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. याचे अतिशय सकारात्मक परिणामही आपल्याला पाहायला मिळत आहेत. वर्ष 2014 मध्ये भारतातून सुमारे 3,000 कोटी रुपयांच्या आयुष आणि हर्बल उत्पादनांची निर्यात होत होती; तीच आता 6,500 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचा मोठा फायदा देशातील शेतकऱ्यांनाही होत आहे.
मित्रांनो,
भारत आज आयुषवर आधारित 'वैद्यकीय मूल्य पर्यटनासाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयाला येत आहे. म्हणूनच आपण 'आयुष व्हिसा'सारखी पावलेही उचलली आहेत. यामुळे परदेशातून येणाऱ्या लोकांना आयुष चिकित्सेच्या अधिक चांगल्या सुविधा मिळत आहेत.
मित्रांनो,
आयुर्वेदासारख्या प्राचीन चिकित्सा पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रत्येक मोठ्या मंचावर अभिमानाने या विषयाला पुढे नेत आहे. मग ती ब्रिक्स देशांची परिषद असो किंवा जी-20 देशांची बैठक असो, जिथे कुठे संधी मिळाली तिथे मी आयुर्वेदाला सर्वांगीण आरोग्याचे एक माध्यम म्हणून सादर केले आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या 'ग्लोबल ट्रेडिशनल मेडिसिन सेंटर'ची स्थापनाही केली जात आहे. जामनगरमध्येच 'इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेद'ने आपले काम सुरू केले आहे. आयुर्वेदिक औषधांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गंगा नदीच्या काठावर औषधी वनस्पतींच्या शेतीलाही प्रोत्साहन दिले जात आहे.
मित्रांनो,
आज मला तुम्हा सर्वांना देशाच्या आणखी एका यशाची माहिती द्यायची आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, नुकतीच युरोपियन संघासोबत व्यापारी कराराची ऐतिहासिक घोषणा झाली आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की, हा व्यापारी करार भारतीय पारंपरिक औषध सेवा आणि व्यावसायिकांना मोठी चालना देईल. युरोपीय संघाच्या ज्या सदस्य देशांमध्ये नियम अस्तित्वात नाहीत, तिथे आमचे आयुष प्रॅक्टिशनर्स भारतात मिळवलेल्या त्यांच्या व्यावसायिक पात्रतेच्या आधारावर आपली सेवा देऊ शकतील. याचा मोठा फायदा आयुर्वेद आणि योगाशी संबंधित आपल्या तरुणांना होईल. या करारामुळे युरोपमध्ये आयुष वेलनेस सेंटर्सच्या स्थापनेलाही मदत मिळेल. आयुर्वेद-आयुषशी संबंधित तुम्हा सर्व मान्यवरांचे मी या कराराबद्दल अभिनंदन करतो.
मित्रांनो,
भारतात आयुर्वेदाच्या माध्यमातून शतकानुशतके उपचार केले जात होते. परंतु हे दुर्दैव आहे की, आपल्याला देशात आणि प्रामुख्याने परदेशात लोकांना आयुर्वेदाचे महत्त्व पटवून द्यावे लागते. याचे एक मोठे कारण म्हणजे 'एव्हिडन्स बेस्ड रिसर्च'म्हणजेच पुराव्यावर आधारित संशोधनाची कमतरता आणि रिसर्च पेपर्सचा अभाव. जेव्हा विज्ञानाच्या सिद्धांतांवर आयुर्वेदिक पद्धतीची चाचणी घेतली जाते, तेव्हा लोकांचा विश्वास अधिक दृढ होतो. म्हणूनच मला या गोष्टीचा आनंद आहे की, आर्य वैद्यशाळेने आयुर्वेदाला विज्ञान आणि संशोधनाच्या कसोटीवर सातत्याने पारखले आहे. ही संस्था सीएसआयआर आणि आयआयटी सारख्या संस्थांसोबत मिळून काम करत आहे. 'ड्रग रिसर्च', 'क्लिनिकल रिसर्च' आणि कॅन्सर केअरवरही तुमचा भर राहिला आहे. आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने, कॅन्सर रिसर्चसाठी 'सेंटर ऑफ एक्सलन्स'ची स्थापना करणे, हे याच दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मित्रांनो,
आता आपण बदलत्या काळानुसार, आयुर्वेदात आधुनिक तंत्रज्ञान आणि एआय चा वापर वाढवला पाहिजे. आजाराच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या पद्धतींनी उपचार करण्यासाठी बरेच काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले जाऊ शकतात.
मित्रांनो,
परंपरा आणि आधुनिकता हातात हात घालून चालू शकतात आणि आरोग्य सेवा लोकांच्या जीवनात विश्वासाचा आधार बनू शकते, हे आर्य वैद्यशाळेने दाखवून दिले आहे. या संस्थेने आयुर्वेदाचे प्राचीन ज्ञान जतन करतानाच आधुनिक गरजांचाही स्वीकार केला आहे. उपचार पद्धती अधिक व्यवस्थित केली आहे आणि रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवल्या आहेत. मी आर्य वैद्यशाळेचे या प्रेरक प्रवासासाठी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. ही संस्था येणाऱ्या वर्षांतही अशाच समर्पित वृत्तीने आणि सेवाभावाने लोकांचे जीवन अधिक सुखकर करत राहो, अशी मी कामना करतो. खूप खूप धन्यवाद!
नमस्कारम।
* * *
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2219978)
अभ्यागत कक्ष : 5
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam