पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील कालियाबोर येथील रू 6950 कोटी रुपयांच्या काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्पाचे भूमीपूजन केले
काझीरंगा हे केवळ एक राष्ट्रीय उद्यान नव्हे तर तो आसामचा आत्मा आहे , भारताच्या जैवविधतेतील अमूल्य ठेवा आहे , शिवाय युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे: पंतप्रधान
जेव्हा निसर्गाची जपणूक केली जाते तेव्हा त्यातून नवीन संधी निर्माण होतात; गेल्या काही वर्षांत काझीरंगा मधील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे आणि होमस्टे सुविधा, गाईड्स सेवा, वाहतूक सुविधा, हस्तकला व लघु उद्योग यांच्या मदतीने स्थानिक युवकांना रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. : पंतप्रधान
अनेक वर्षे असे मानले जात होते कि निसर्ग आणि विकास या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी एकत्र केल्या जाऊ शकत नाहीत . परंतु आज भारताने जगाला दाखवून दिले आहे कि त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे साध्य केल्या जाऊ शकतात: पंतप्रधान
ईशान्य भारत आता विकासाच्या गंगेच्या काठांवर नसून तो दिल्लीच्या व संपूर्ण देशाच्या हृदयात वसला आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
18 JAN 2026 12:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील कालियाबोर येथील रू 6950 कोटी रुपयांच्या काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्पाचे(राष्ट्रीय महामार्ग 715 च्या कालियाबोर- नूमालीगढ टप्प्याचे चौपदरीकरण) भूमी पूजन केले. यावेळी त्याना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. काझीरंगाला आपण दुसऱ्यांदा भेट दिली असून 2 वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीतील अनेक प्रसंग त्यांच्या स्मरणात कायम कोरले गेले आहेत असे त्यांनी म्हटले. काझीरंगा मध्ये रात्री मुक्काम करण्याची संधी मिळाली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हत्तीवरून केलेल्या सफरीत त्यांना जवळून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता आला होता याचा त्यांनी उल्लेख केला.
आसामला भेट देऊन आपल्याला नेहमीच खूप आनंद होतो असे त्यांनी सांगितले. आसाम ही साहसी युवकांची भूमी असून आसामचे तरुण तरुणी सर्वच क्षेत्रात त्यांचे कलाकौशल्य दाखवण्यास तत्पर असतात असे त्यांनी सांगितले.
गुवाहाटी इथे कालच झालेल्या बुगुरुंबा द्वौ उत्सव प्रसंगी आपण उपस्थित होतो आणि तिथे बोडो समुदायाच्या लेकींनी त्यांच्या नृत्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला हे त्यांनी आवर्जून नमूद केले. 10 हजारांहून अधिक कलाकारांनी उत्साहाने सादर केलेल्या या बगुरुंबा नृत्यात खाम व सिफांग च्या तालावर नाचणाऱ्या कलाकारांनी सर्व उपस्थितांचे मन जिंकून घेतले होते असे ते म्हणाले.
या बागुरुंबा नृत्याच्या अनुभवाने डोळे व हृदयाला समाधान मिळाले असे त्यांनी सांगितले. या भव्य नृत्य सोहळ्यासाठी कलाकारांनी घेतलेली मेहनत, त्यांची तयारी व समन्वयाबद्दल त्यांनी आसामच्या कलाकारांचे कौतुक केले. बागुरुंबा द्व्हौ महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले. हा विक्रम सर्व देश व जगापर्यंत पोचवल्याबद्दल त्यांनी दूरचित्रवाणी माध्यमकर्मी तसेच समाजमाध्यमे चालवणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींचे आभार मानले.
गेल्याच वर्षी आपण झुमोईर महोत्सवाला उपस्थित होतो, आणि यावर्षी माघ बिहू सणादरम्यान आसामला भेट देण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्याच महिन्यात आपण अनेक विकासप्रकल्पांसाठी आसामला आलो होतो आणि गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारित भागाचे उदघाटन केल्याची तसेच नामरूप इथल्या अमोनिया युरिया संकुलाचे भूमिपूजन केल्याची आठवण त्यांनी ताजी केली. अशा प्रसंगांमधून सरकारचा ‘विकास भी विरासत भी; हा मंत्र अधिक ठळक होतो असे त्यांनी नमूद केले .
आसामच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील कालियाबोरचे ऐतिहासिक महत्व त्यांनी अधोरेखित केले. उत्तर आसाम साठी दळणवळणाचे केंद्र आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार म्हणून त्याचे महत्व असल्याचे त्यांनी सांगितले. महान सेनानी लछित बोरफुकन याने मुघल सैन्याला परतवून लावण्यासाठी कालियाबोर मधूनच मोहीम चालवली होती व आसामच्या जनतेने त्याच्या नेतृत्वाखालीच असामान्य साहस, एकता आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन करत मुघल सैन्याला पळवून लावले होते , याचे त्यांनी स्मरण करून दिले. हा विजय केवळ सैन्याचा नसून हे आसामच्या अभिमानाचे व आत्मविश्वासाचे प्रदर्शन होते असं ते म्हणाले. आहोम शासकांच्या काळापासून कालियाबोर चे व्यूहात्मक महत्व वादातीत असून आपल्या सरकारच्या कार्यकाळात हे शहर दळणवळण आणि विकासाचे महत्वाचे केंद्र बनत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आज आपला पक्ष देशभरातील जनतेसाठी पहिल्या पसंतीचा पक्ष बनत असून गेल्या दीड वर्षांपासून पक्षावरील लोकांचा विश्वास सतत वाढत आहे असे त्यांनी सांगितले. नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये तब्बल 20 वर्षांच्या काळानंतर जनतेने आपल्या पक्षाला विक्रमी संख्येने मते आणि जागा जिंकून दिल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात दोनच दिवसांपूर्वी झालेल्या महापौर व नगरसेवकांच्या निवडणुकांमध्येही आपल्या पक्षाला मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिकेत विक्रमी जनमत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील बहुतेक इतर शहरांमध्येही आपल्याच पक्षाला जनसेवेचे संधी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
केरळच्या जनतेनेही आपल्या पक्षाला मोठा पाठिंबा दिला असून राज्याची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये आपल्याच पक्षाचा महापौर आल्याचे त्यांनी म्हटले. जनतेला प्रगती व परंपरेचे रक्षण तर हवेच आहे, पण त्याचबरोबर उत्तम प्रशासन आणि विकास हवा आहे हेच नुकत्याच देशभरात झालेल्या विविध निवडणुकांच्या निकालातून दिसून येते असे त्यांनी सांगितले.
मोदी यांनी प्रतिपादन केले की, या निवडणुका आणखी एक संदेश देतात की, देश सातत्याने विरोधी पक्षाचे नकारात्मक राजकारण नाकारत आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, ज्या मुंबई शहरात विरोधी पक्षाचा जन्म झाला, तिथे आता तो चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे आणि ज्या महाराष्ट्रात त्यांनी दशके राज्य केले, तिथे तो पूर्णपणे संकुचित झाला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांनी देशाचा विश्वास गमावला आहे कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही आणि असा पक्ष आसाम किंवा काझीरंगाच्या हिताची कधीही सेवा करू शकत नाही.
काझीरंगाच्या सौंदर्याचे अत्यंत प्रेमाने वर्णन करणारे भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या शब्दांची पंतप्रधानांनी यावेळी आठवण करून दिली. ते म्हणाले की, हजारिकांच्या ओळींमध्ये काझीरंगाबद्दलचे प्रेम आणि आसामी लोकांचे निसर्गाशी असलेले नाते दोन्ही दिसून येते. त्यांनी यावर भर दिला की काझीरंगा हे केवळ एक राष्ट्रीय उद्यान नसून आसामचा आत्मा आणि भारताच्या जैवविविधतेचा एक अमूल्य दागिना आहे, ज्याला यूएनईएससीओ- य़ुनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. त्यांनी अधोरेखित केले की, काझीरंगा आणि त्यातील वन्यजीवांचे संरक्षण करणे हे केवळ पर्यावरणाचे रक्षण करण्याबद्दल नसून आसामचे भविष्य आणि येणाऱ्या पिढ्यांबद्दलची जबाबदारी देखील आहे. मोदी यांनी आसामच्या भूमीतून नवीन प्रकल्पांच्या शुभारंभाची घोषणा केली. या उपक्रमांचा व्यापक परिणाम होईल असे नमूद करताना त्यांनी त्याबद्दल जनतेचे अभिनंदन केले.
काझीरंगा हे एकशिंगी गेंड्याचे घर असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधानांनी पुराच्या वेळी येणाऱ्या आव्हानांना स्पष्ट केले. पुराच्या वेळी वन्यजीव उंचावरची जागा शोधतात आणि त्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो, जिथे ते अनेकदा अडकतात. वनक्षेत्र सुरक्षित ठेवून वाहतूक सुरळीत चालेल याची खात्री करणे हा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी माहिती दिली की या दृष्टीकोनातून कलियाबोर ते नुमलीगढ अशी 90 किलोमीटरची मार्गिका सुमारे ₹7,000 कोटी खर्चून विकसित केली जात आहे, ज्यामध्ये 35 किलोमीटरच्या उन्नत वन्यजीव मार्गिकेचा समावेश आहे. वाहने वरून जातील तर वन्यजीवांची खालून होणारी हालचाल विनाअडथळा सुरू राहील. गेंडे, हत्ती आणि वाघांच्या पारंपरिक हालचालींचे मार्ग लक्षात घेऊन याची रचना तयार करण्यात आली आहे. मोदी यांनी नमूद केले की, ही मार्गिका उर्ध्व आसाम आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानची जोडणीदेखील सुधारेल आणि नवीन रेल्वे सेवांसह लोकांसाठी नवीन संधी खुली करेल. या महत्त्वाच्या प्रकल्पांबद्दल त्यांनी आसामच्या जनतेचे आणि देशाचे अभिनंदन केले.
जेव्हा निसर्गाचे रक्षण होते तेव्हा संधी देखील निर्माण होतात हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी नमूद केले की, काझीरंगामध्ये अलीकडच्या काही वर्षांत पर्यटनात सातत्याने वाढ झाली आहे. पर्यटक निवास, मार्गदर्शक सेवा, वाहतूक, हस्तकला आणि लहान व्यवसायांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळाले आहेत.
आसामच्या जनतेचे आणि सरकारचे आणखी एका यशाबद्दल कौतुक करताना मोदी यांनी आठवण करून दिली की, एक काळ असा होता जेव्हा गेंड्यांची शिकार ही मोठी चिंतेची बाब होती; 2013 आणि 2014 मध्ये डझनभर एकशिंगी गेंडे मारले गेले होते. ते म्हणाले की, त्यांच्या सरकारने हे आता चालू शकणार नाही असा निर्णय घेतला आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत केली, वनविभागाला आधुनिक संसाधने पुरवली, पाळत ठेवणारी यंत्रणा वाढवली आणि 'वन दुर्गा'च्या माध्यमातून महिलांचा सहभाग वाढवला. परिणामी, त्यांनी अधोरेखित केले की, 2025 मध्ये गेंड्यांच्या शिकारीची एकही घटना नोंदवली गेली नाही, जे सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे आणि आसामच्या लोकांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले.
पंतप्रधानांनी निरीक्षण नोंदवले की, निसर्ग आणि प्रगती हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत असे दीर्घकाळ मानले जात होते, परंतु आज भारत जगाला दाखवून देत आहे की अर्थव्यवस्था आणि पर्यावरण दोन्ही एकत्र पुढे जाऊ शकतात. त्यांनी नमूद केले की, गेल्या दशकात जंगल आणि झाडांचे आच्छादन वाढले आहे, ज्यामध्ये लोकांनी "एक पेड माँ के नाम" मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला असून त्याअंतर्गत 260 कोटींहून अधिक झाडे लावली गेली आहेत. 2014 पासून वाघ आणि हत्तींच्या राखीव क्षेत्रांची संख्या वाढली आहे आणि संरक्षित तसेच सामुदायिक क्षेत्रांचा विस्तार झाला आहे. मोदींनी नमूद केले की एकेकाळी भारतातून नामशेष झालेले चित्ते आता परत आणले गेले आहेत आणि ते एक नवीन आकर्षण बनले आहेत. ते पुढे म्हणाले की भारत पाणथळ जागांच्या संवर्धनावर सतत काम करत आहे आणि आशियातील सर्वात मोठे रामसर पाणथळ जागांचे जाळे बनले आहे. रामसर स्थळांच्या संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान म्हणाले की, विकास हा वारसा जतन आणि निसर्गाच्या संरक्षणासह कसा हातात हात घालून पुढे जाऊ शकतो हे आसाम देखील जगाला दाखवत आहे.
मोदी यांनी नमूद केले की, ईशान्य भारताचे सर्वात मोठे दुःख नेहमीच अंतर राहिले आहे, मनांचे अंतर आणि ठिकाणांचे अंतर. ते म्हणाले की, दशकानुशतके या प्रदेशातील लोकांना असे वाटत होते की, विकास इतरत्र होत आहे आणि ते मागे पडत आहेत, ज्याचा परिणाम केवळ अर्थव्यवस्थेवरच नाही तर विश्वासावरही झाला. त्यांनी अधोरेखित केले की त्यांच्या पक्षाने केंद्र आणि राज्यातील सरकारांच्या माध्यमातून ईशान्येच्या विकासाला प्राधान्य देऊन ही भावना बदलली आहे. आसामला रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्गांनी जोडण्यासाठी एकाच वेळी काम सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले.
रेल्वे संपर्कजाळ्याचा विस्तार सामाजिक आणि आर्थिक पातळीवर फायदेशीर ठरतो यावर भर देताना, म्हणूनच ईशान्य भारतासाठी तो महत्त्वाचा आहे यावर भर देतानाच, विरोधकांनी याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीका केली. केंद्रात जेव्हा विरोधकांचे सरकार होते, तेव्हा आसामला रेल्वे अर्थसंकल्पात केवळ 2000 कोटी रुपये मिळत होते, तर त्यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात ही रक्कम जवळपास वार्षिक 10,000 कोटींपर्यंत वाढवण्यात आली जी तत्कालीन काळाच्या पाच पट अधिक आहे. मोदी म्हणाले की, वाढत्या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे, ज्यामध्ये रेल्वे मार्ग दुपदरीकरण आणि विद्युतीकरण यांमुळे रेल्वेची क्षमता वृद्धिंगत झाली आणि प्रवाशांना सुविधाही वाढल्या. पंतप्रधानांनी कालियाबोर येथून तीन नव्या रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे आसामच्या रेल्वे संपर्क जाळ्याचा उल्लेखनीय विस्तार झाला आहे. ते म्हणाले की, वंदे भारत शयनयान रेल्वे गुवाहाटी आणि कोलकाताशी जोडले जाणार असून, दीर्घ प्रवास अधिक आरामदायी होणार आहे, तर दोन अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या स्थानकांना जोडणार आहेत त्यामुळे लाखो प्रवाशांना थेट फायदा होणार आहे. या रेल्वेमुळे आसाममधील व्यापारी नव्या बाजारपेठांना जोडले जातील, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधींपर्यंत सुलभतेने पोचता येईल आणि देशाच्या विविध भागांमध्ये प्रवास करणे सोपे होणार आहे असेही मोदी यावेळी म्हणाले. अशा प्रकारच्या संपर्कजाळ्याच्या विस्तारामुळे ईशान्येकडील राज्येही विकासाच्या परीघावर, दूर अंतरावर राहिली नसून ती देशाच्या आणि राजधानी दिल्लीच्या जवळ आल्याचा आत्मविश्वास निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आसाम तोंड देत असलेल्या मोठ्या आव्हानाचा, म्हणजेच आसामची ओळख आणि संस्कृतीचे संरक्षण कऱण्याच्या गरजेचा, उल्लेखही पंतप्रधानानी केला. आसाममधील घुसखोरीला प्रभावीपणे आळा घालणे आणि जंगले, ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळे तसेच लोकांच्या जमिनीवरील अवैध अतिक्रमणापासून मुक्त केल्याबद्दल होणाऱ्या कौतुकाविषयीही त्यांनी आसाममधील सरकारचे अभिनंदन केले. याची तुलना विरोधकांशी करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी गेल्या अनेक दशकांपासून केवळ मतांसाठी आणि सरकार स्थापनेसाठी आसामची भूमी घुसखोरांच्या हाती सोपवल्याची टीका केली. ते म्हणाले, विरोधकांच्या राजवटीत घुसखोरी सातत्याने वाढत राहिली आणि या घुसखोरांना आसामच्या इतिहास, संस्कृती किंवा श्रद्धा यांची काहीच पर्वा न करताना मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केली. घुसखोरीमुळे प्राण्यांच्या मार्गांवर अतिक्रमण झाले, अवैध शिकारीला प्रोत्साहन मिळाले आणि तस्करी आणि इतर लहान गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असेही त्यांनी पुढे सांगितले.
घुसखोरांमुळे लोकसंख्याशास्त्रीय संतुलन बिघडत असून, ते संस्कृतीवर हल्ला करत आहेत, गरीब आणि तरूण यांच्याकडून रोजगार हिसकावत आहेत आणि आदिवासी प्रदेशातील जमिनींवर फसवणुकीने ताबा मिळवत आहेत, त्यामुळे आसाम आणि देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यांनी लोकांना विरोधकांपासून सावध रहाण्याचा इशारा देताना, घुसखोरांना संरक्षण देणे आणि सत्ता मिळवणे हे त्यांचे धोरण असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले की, विरोधक आणि त्यांचे मित्रपक्ष देशभरात हाच दृष्टिकोन राबवत असून, बिहारचे उदाहरण देताना, घुसखोरांना वाचवण्यासाठी मोर्चे आणि रॅली काढल्याचे सांगितले मात्र बिहारच्या जनतेने त्यांना नाकारल्याचेही सांगितले. आसामची जनताही विरोधकांना ताकदीने प्रत्युत्तर देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी यांनी आसामचा विकास संपूर्ण ईशान्येकडील प्रदेशासाठी प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करत आहे आणि ऍक्ट ईस्ट धोरणाला दिशा देत आहे, असे सांगितले. जेव्हा आसामची प्रगती होते, तेव्हा संपूर्ण ईशान्येकडील प्रदेशाची प्रगती होते आणि सरकारचे प्रयत्न आणि लोकांचा विश्वास, यामुळे हा प्रदेश नवी उंची गाठेल यावर त्यांनी भर दिला. आपल्या भाषणाचा समारोप करतना, पंतप्रधानांनी आज उद्घाटन केलेल्या प्रकल्पांबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा, केंद्रीय मंत्री सर्बांनंद सोनोवाल, पबित्रा मार्गरिटा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 6,950 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्पाचे (NH-715 कालियाबोर-नूमालीगड विभागाचे चौपदरीकरण)भूमीपूजन केले.
86 किलोमीटर लांबीचा काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्प हा पर्यावरणपूरक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आहे. यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून जाणारा 35 किलोमीटर लांबीची उन्नत वन्यजीव मार्गिका, 21 किलोमीटरचा बाह्यवळण विभाग आणि सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग -715 महामार्गाचे दोन मार्गिकांवरून चार मार्गिकामध्ये 30 किलोमीटरपर्यंतचे रुपांतरण याचा समावेश असेल.
या प्रकल्पाचे उद्दिष्ट, उद्यानाच्या समृद्ध जैवविविधतेचे संरक्षण सुनिश्चित करत प्रादेशिक दळणवळण संपर्कजाळे सुधारणे असे आहे.
नागाव, कार्बी आंगलॉंग आणि गोलाघाट जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार असून अप्पर आसाम विशेषतः दिब्रुगढ आणि तिनसुकिया येथील संपर्क जाळ्यामध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. उन्नत वन्यजीव मार्गिकेमुळे प्राण्यांची सातत्यपूर्ण हालचाल सुनिश्चित होणार असून वन्यजीव-मानव संघर्ष कमी होणार आहे. त्याचबरोबर सुधारित रस्ते सुरक्षा, प्रवास वेळ आणि अपघात दरामध्ये घट तसेच वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीला हातभार लागणार आहे. प्रकल्पाचा एक भाग म्हणून, जाखलाबंधा आणि बोकाखटमधील बाह्यवळण मार्ग विकसित केले जातील, जेणेकरून शहरी वाहतूक आणि स्थानिकांच्या जीवनमानाची गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास मदत मिळणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी गुवाहाटी (कामाख्या)-रोहतक अमृत भारत एक्सप्रेस आणि दिब्रुगड-लखनौ (गोमती नगर) अमृत भारत एक्सप्रेस या 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या नव्या रेल्वे सेवांमुळे ईशान्य आणि उत्तर भारत यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी बळकट होईल, ज्यामुळे लोकांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सोय उपलब्ध होईल.
***
शैलेश पाटील/उमा रायकर/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2215857)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam