पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 11 जानेवारी रोजी राजकोटला भेट देणार


पंतप्रधान कच्छ आणि सौराष्ट्र विभागासाठी व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन करतील

व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेमुळे पश्चिम गुजरातमध्ये गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल

या परिषदेत सिरॅमिक्स, अभियांत्रिकी, बंदरे आणि लॉजिस्टिक्स, हरित ऊर्जा, पर्यटन यासह इतर प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल

व्हायब्रंट गुजरातच्या यशस्वी मॉडेलची व्याप्ती आणि प्रभाव आणखी वाढवण्यासाठी संपूर्ण गुजरातमध्ये चार व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदा आयोजित केल्या जात आहेत

या प्रादेशिक परिषदांचा उद्देश प्रदेश-विशिष्ट औद्योगिक विकासाला चालना देणे, विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करणे आणि जागतिक सहभाग वाढवणे हा आहे

प्रविष्टि तिथि: 09 JAN 2026 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026

पंतप्रधान 11 जानेवारी 2026 रोजी राजकोटला भेट देतील आणि कच्छ व सौराष्ट्र प्रदेशासाठी आयोजित व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत सहभागी होतील. दुपारी सुमारे 1:30 वाजता ते परिषदेतील व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी सुमारे 2 वाजता पंतप्रधान राजकोट येथील मारवाडी विद्यापीठात कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशासाठीच्या व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 14 ग्रीनफिल्ड स्मार्ट गुजरात औद्योगिक विकास महामंडळ लिमिटेड (जीआयडीसी) वसाहतींच्या विकासाची घोषणा करतील आणि राजकोट येथील जीआयडीसीच्या वैद्यकीय उपकरण पार्कचे उद्घाटन करतील.

व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषद 11-12 जानेवारी 2026 दरम्यान  आयोजित केली जात आहे, ज्यात कच्छ आणि सौराष्ट्र विभागातील 12 जिल्ह्यांचा समावेश असेल. केवळ या प्रदेशांसाठी समर्पित असलेल्या या परिषदेचा उद्देश पश्चिम गुजरातमधील गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला नवी गती देणे हा आहे. परिषदेच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सिरॅमिक्स, अभियांत्रिकी, बंदरे आणि लॉजिस्टिक्स, मत्स्यव्यवसाय, पेट्रोकेमिकल्स, कृषी आणि अन्न प्रक्रिया, खनिजे, हरित ऊर्जा परिसंस्था, कौशल्य विकास, स्टार्टअप्स, एमएसएमई, पर्यटन आणि संस्कृती यांचा समावेश आहे. जपान, दक्षिण कोरिया, रवांडा आणि युक्रेन हे या परिषदेसाठी भागीदार देश असतील.

व्हायब्रंट गुजरातच्या यशस्वी मॉडेलची पोहोच आणि प्रभाव आणखी वाढवण्यासाठी, राज्यभरात चार व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदा आयोजित करण्यात आल्या. उत्तर गुजरात साठी पहिली प्रादेशिक परिषद 9-10 ऑक्टोबर 2025 रोजी मेहसाणा येथे झाली. आता कच्छ आणि सौराष्ट्र या प्रदेशांसाठी परिषद आयोजित करण्यात आली आहे. दक्षिण गुजरात (9-10 एप्रिल 2026) आणि मध्य गुजरात (10-11 जून 2026) या क्षेत्रांसाठी अनुक्रमे सुरत आणि वडोदरा येथे प्रादेशिक परिषदा आयोजित केल्या जातील.

पंतप्रधान मोदी यांच्या 'विकसित भारत @2047’ या दृष्टिकोनाला अनुसरून, आणि व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे यश आणि अनुभव, यावर आधारित, असलेल्या या प्रादेशिक परिषदांचे उद्दिष्ट, प्रदेश-विशिष्ट औद्योगिक विकासाला चालना देणे, विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करणे आणि जागतिक सहभाग वाढवणे, हे आहे. व्हायब्रंट गुजरात व्यासपीठाची पोहोच प्रादेशिक पातळीपर्यन्त नेणारा, हा उपक्रम पंतप्रधानांचा विकेंद्रित विकास, व्यवसाय सुलभता, नवोन्मेष-आधारित विकास आणि शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर असलेला भर दर्शवतो.

प्रादेशिक परिषदा केवळ प्रादेशिक कामगिरी प्रदर्शित करण्याचे आणि नवीन उपक्रमांची घोषणा करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून काम करणार नाहीत, तर प्रादेशिक अर्थव्यवस्थांना सक्षम करून, नवोन्मेशाला प्रोत्साहन देऊन आणि राज्याच्या प्रत्येक भागात धोरणात्मक गुंतवणुकीला चालना देऊन, गुजरातच्या विकासगाथेमध्ये भर घालणारे साधन म्हणून देखील महत्वाच्या ठरतील. जानेवारी 2027 मध्ये होणाऱ्या पुढील व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेत प्रादेशिक परिषदांमधील कामगिरी प्रदर्शित केली जाईल.


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2212850) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam