माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसारण आणि मनोरंजन क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या WaveX ने एफआयटीटी -आयआयटी दिल्ली बरोबर केला सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
06 JAN 2026 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2026
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत स्टार्टअप एक्सलरेटर उपक्रम WaveX ने दिल्ली इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी दिल्ली) अखत्यारीतील नवोन्मेष आणि तंत्रज्ञान हस्तांतरण फाऊंडेशन (एफआयटीटी) बरोबर एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत या दोन्ही व्यवस्था माध्यम, मनोरंजन, प्रसारण आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेष, इन्क्युबेशन आणि उद्योजकतेला बळकटी देण्यासाठी एकत्र काम करणार आहेत.
नवी दिल्लीतल्या शास्त्री भवन इथे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत WaveX आणि एफआयटीटीच्या प्रतिनिधीमंडळांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या सहकार्यपूर्ण भागिदारी अंतर्गत, आयआयटी दिल्ली चे एफआयटीटी WaveX कार्यक्रमाच्या अंमलबजावणी आणि विस्तारासाठी मदत करणार आहे. हा एक राष्ट्रीय उपक्रम असून, त्याअंतर्गत देशभरात इन्क्युबेशन केंद्रांची स्थापना करणे, आणि त्याला बळकटी देत नवोन्मेष तसेच उद्योजकतेला चालना देणे हे उद्दिष्ट या कराराअंतर्गत समोर ठेवले गेले आहे. तर एफआयटीटी इन्क्युबेशन केंद्रांची उभारणी करण्याकरता धोरणात्मक आणि कार्यान्वयनात्मक मार्गदर्शन, इतर भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि नवोन्मेष केंद्रांसोबतच्या संपर्कांचा विस्तार, तंत्रज्ञानविषयक कौशल्य, संशोधन सुविधा, मार्गदर्शन, बौद्धिक संपदा सहकार्य उपलब्ध करून देणे आणि स्टार्टअप्स तसेच इन्क्युबेशन व्यवस्थापकांसाठी क्षमता बांधणी उपक्रमांचे आयोजन, अशा प्रकारचे सहकार्य पुरवणार आहे.

या उपक्रमाला आर्थिक सहाय्य, धोरणात्मक मार्गदर्शन आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याची जबाबदारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गतच्या WaveX या व्यवस्थेद्वारा पार पाडली जाणार आहे. या सहकार्यपूर्ण भागिदारीच्या माध्यमातून माध्यम आणि मनोरंजन तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यासाठी सज्ज असलेली एक परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट WaveX ने समोर ठेवले आहे. याअंतर्गत स्टार्टअप्ससाठी निधी पुरवठा, मार्गदर्शन, पायाभूत सुविधा, उद्योगांसबोतची भागीदारी आणि गुंतवणूकदारांसह जागतिक बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासारखे सहकार्य पुरवले जाणार आहे.
करारावर स्वाक्षरीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला संजय जाजू यांनी संबोधित केले. WaveX हा माध्यम आणि मनोरंजन तंत्रज्ञानातील नवोन्मेषासाठीची राष्ट्रीय स्तरावरील मोठा कारक घटक असल्याचे ते म्हणाले. माध्यम उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानविषयक आमूलाग्र बदल घडवून आणणारे स्टार्टअप्स, तसेच विद्यमान तंत्रज्ञानाच्या आधारे नवे अनुप्रयोग विकसित करणाऱ्या संशोधकांना WaveX मुळे गती मिळेल असे ते म्हणाले. या व्यापक परिसंस्थेला चालना देणे आणि माध्यम तसेच मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी जागतिक दर्जाच्या इन्क्युबेशन सुविधा उभारणे हे WaveX चे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
आयआयटी दिल्लीच्या एफआयटीटी चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निखिल अग्रवाल यांनी एफआयटीटी च्या वतीने स्वाक्षरी केली. त्यांनीही यावेळी आपले विचार मांडले. WaveX सोबतची ही भागीदारी उदयोन्मुख आणि सर्जनशील तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञानाधारित उद्योजकतेला सक्षम करण्याच्या एफआयटीटीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे असे ते म्हणाले. धोरणात्मक पाठबळ, शैक्षणिक उत्कृष्टता आणि उद्योग क्षेत्राचा सहभागाच्या एकात्मिकरणातून, माध्यम, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा मिलाफ साधत काम करणाऱ्या स्टार्टअप्सना पाठबळ देणारे, राष्ट्रीय स्तरावरील एक मजबूत इन्क्युबेशन व्यासपीठ तयार करायचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या भागीदारीमुळे WaveX च्या आराखड्यांतर्गत स्टार्टअप परिसंस्थेचा विकास तसेच तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणाला गती देण्याकरता, दिल्ली इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या शैक्षणिक, संशोधन आणि नवोन्मेष विषयक क्षमतेचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. यामुळे भारतातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रविषयक नवोन्मेषी परिसंस्था अधिक मजबूत होणार आहे.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211929)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam