माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते भारत सरकारच्या 2026 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिनदर्शिकेची संकल्पना आहे – “भारत@2026: सेवा, सुशासन आणि समृद्धी”
भारत@2026 दिनदर्शिका भारताचे परिवर्तन दर्शविते - माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2025 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2025
केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज भारत सरकारची 2026 ची दिनदर्शिका प्रकाशित केली. मंत्री म्हणाले, ही दिनदर्शिका केवळ तारखा आणि महिन्यांचे वार्षिक प्रकाशन नसून, भारताच्या परिवर्तनशील प्रवास, प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांचे दर्शन घडविणारे माध्यम आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी सामूहिक संकल्पाला नवा उत्साह प्रदान करणारे साधन आहे.
दिनदर्शिकेची “भारत@2026: सेवा, सुशासन आणि समृद्धी” ही संकल्पना स्वतःच्या ओळखीबाबत आत्मविश्वास असलेला, संस्थात्मकदृष्ट्या मजबूत आणि दीर्घकालीन दृष्टी स्पष्ट असलेला भारत अशी देशाची प्रतिमा सादर करते. ही दिनदर्शिका लोककेंद्रित प्रशासन, सशक्त सेवा वितरण आणि प्रक्रिया सुलभ करून नागरिक व राज्य यांच्यातील विश्वास वृद्धिंगत करणाऱ्या सुधारणांवर आधारित राष्ट्रीय आत्मविश्वासाचे दर्शन घडविते, असे असे मंत्र्यांनी अधोरेखित केले.
2025 मध्ये राबविण्यात आलेल्या प्रमुख सुधारणांचा उल्लेख करताना डॉ. मुरुगन यांनी सांगितले की संरचनात्मक उपाययोजनांमुळे भारताची आर्थिक लवचिकता वाढली असून विकासाचे लाभ समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचत आहेत. नव्या करप्रणालीतील करसवलत, तर्कसंगत जीएसटी 2.0, चार श्रमसंहितांची अंमलबजावणी आणि लक्ष्यकेंद्रीत रोजगारनिर्मिती उपक्रमांमुळे उत्पादकता, जीवनसुलभता आणि सर्वसमावेशक समृद्धीला चालना मिळाली आहे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी बोलताना माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितले की भारत सरकारची दिनदर्शिका ही सरकारच्या प्राधान्यक्रम आणि मूल्यांचे स्पष्ट दर्शन घडविते, राष्ट्राची मूल्ये व उद्दिष्टे प्रतिबिंबित करणारे प्रभावी संवाद माध्यम म्हणून तिची निर्मिती झाली आहे. “भारत@2026: सेवा, सुशासन आणिसमृद्धी” या संकल्पनेवर आधारित 2026 ची दिनदर्शिका सुधारणा, समावेशकता आणि आकांक्षा यांच्या माध्यमातून भारताच्या आत्मविश्वासपूर्ण दृढतेचे दर्शन घडविते असे त्यांनी नमूद केले.

2026 ची दिनदर्शिका 12 संकल्पनात्मक मासिक पानांद्वारे राष्ट्रीय प्रगतीच्या प्रमुख स्तंभांचे दर्शन घडविते आणि बदलत्या भारताची प्रतिमा मांडते. यामध्ये आत्मनिर्भरतेकडून आत्मविश्वासाकडे (जानेवारी) ही विविध क्षेत्रांतील स्वावलंबनाचे दर्शन; समृद्ध शेतकरी, समृद्ध भारत (फेब्रुवारी) – शेतकऱ्यांची मध्यवर्ती भूमिका;नव्या भारतासाठी नारी शक्ती (मार्च) – आधुनिक भारताच्या रचनाकार म्हणून महिलांचा गौरव; सुलभीकरणातून सशक्तीकरण (एप्रिल) – प्रशासनातील सुधारणा व प्रक्रिया सुलभतायावर केंद्रित ; वीरतेपासून विजयापर्यंत - ऑपरेशन सिंदूर (मे) – सशस्त्र दलांचे धैर्य व बलिदानाचा सन्मान; स्वस्थ भारत, समृद्ध भारत (जून) आणि वंचितांचा सन्मान (जुलै) – आरोग्य, कल्याण आणि दुर्बल घटकांचा सन्मान; युवा शक्ती, राष्ट्र शक्ती (ऑगस्ट) आणि गती, शक्ती, प्रगती (सप्टेंबर) – युवकांची ऊर्जा तसेच भौतिक व डिजिटल पायाभूत सुविधांचा विस्तार; परंपरेपासून प्रगतीकडे (ऑक्टोबर) आणि सब का साथ, सब का सन्मान (नोव्हेंबर) – भारताच्या सांस्कृतिक मूल्यांची आणि समावेशक प्रगतीची पुनःपुष्टी आणि विश्वबंधू भारत (डिसेंबर) – जबाबदार व विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून भारताची भूमिका या संकल्पनांचे दर्शन घडविले आहे.
ही दिनदर्शिका 13 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आली असून, तिची समावेशकता प्रत्येक भाषिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या नागरिकांशी जोडण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे, असे सीबीसीच्या महासंचालक कांचन प्रसाद यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात, पीआयबीच्या महासंचालक अनुपमा भटनागर यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मान्यवरांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि 2026 हे वर्ष संपन्न, समावेशक आणि आत्मविश्वासपूर्ण भारताकडे आणखी एक निर्णायक पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. भारत सरकारची 2026 ची दिनदर्शिका डाउनलोड करण्यासाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करा.

* * *
निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210276)
आगंतुक पटल : 8