सांस्कृतिक मंत्रालय
तमिळनाडू आणि काशी यांच्यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक संबंधांचा उत्सव साजरा करणारा काशी-तमिळ संगमम 3.0
देशात 'वंदे मातरम' राष्ट्रगानाची 150 वर्षे अभिमानाने होत आहेत साजरी
प्रजासत्ताक दिन संचलन 2025 मध्ये भारताचा समृद्ध आदिवासी आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालय करणार सादर
कलाग्राम : महाकुंभ 2025 चे सांस्कृतिक रत्न
देशामध्ये गौडीय मिशनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण
तमिळनाडूमध्ये कंब रामायण महोत्सवाच्या उद्घाटनाने कंब रामायण परंपरेचे झाले पुनरुज्जीवन
संस्कृती मंत्रालयाने मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने, भोपाळमध्ये लोकमता अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
संस्कृती मंत्रालयाच्यावतीने 25 जून, 2025 रोजी 'संविधान हत्या दिन’
मंत्रालयाने तमिळनाडूमध्ये चोल सम्राट राजेंद्र चोल (प्रथम) यांच्या जयंतीनिमित्त 'आदि तिरुवाथिराई' महोत्सवाचे आयोजन
देशातील मराठा साम्राज्यातील लष्करी स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये 44वी नोंद म्हणून समाविष्ट
तिरंग्याबरोबरच भावनिक नाते अधिक घट्ट करून 'हर घर तिरंगा 2025' उपक्रम
संस्कृती मंत्रालयाने देशाच्या हस्तलिखित वारशाचे जतन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठी समर्पित 'ज्ञान भारतम' या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाचा केला प्रारंभ
Posted On:
10 DEC 2025 2:21PM by PIB Mumbai
वाराणसी येथे 15 ते 24 फेब्रुवारी, 2025 या कालावधीमध्ये काशी- तमिळ संगमम 3.0 महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी तामिळनाडू आणि काशी यांच्यातील सांस्कृतिक आणि सभ्यता यांच्यामधील बंधाचा उत्सव साजरा करण्यात आला. 869 हून अधिक कलाकार आणि 190 स्थानिक लोककला आणि शास्त्रीय कलाकार समूहांनी सादरीकरण केले. यंदाच्या ‘केटीएस- 3.0’ ने सुमारे 2 लाख लोकांना आकर्षित केले. उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक आणि बौद्धिक संबंध दृढ करणे आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला प्रोत्साहन देण्याचे काम या संगममने केले.
संस्कृती मंत्रालयाने 7 नोव्हेंबर, 2025 रोजी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी ‘इनडोअर स्टेडियम’ मध्ये राष्ट्रगान "वंदे मातरम" च्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त स्मरणोत्सवाचा उद्घाटन समारंभ आयोजित केला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम 7 नोव्हेंबर, 2025 ते 7 नोव्हेंबर, 2026 असा संपूर्ण वर्षभर चालणाऱ आहे. या देशव्यापी स्मरणोत्सवाचा औपचारिक प्रारंभ यावेळी करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या या कालातीत रचनेला 150 वर्षे झाली आहेत, त्याचा हा उत्सव साजरा केला जात आहे. मंत्रालयाने https://vandemataram150.in/ हे एक समर्पित संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर 1. 60 कोटींहून अधिक भारतीयांनी आधीच 'वंदे मातरम'च्या सादरीकरणाची नोंद केली आहे.

संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रगानाच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित स्मरणोत्सवाच्या प्रसंगी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन राष्ट्रगीताच्या सादरीकरणात सहभागी झाले.
2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात संस्कृती मंत्रालयाने सादर केलेल्या 'जयति जय मम भारतम (जेजेएमबी)' या भव्य सांस्कृतिक सादरीकरणात देशाची समृद्ध आदिवासी आणि लोककला परंपरा आणि वारसा यांचे दर्शन घडवण्यात आले. 5,000 हून अधिक कलाकारांनी 50 हून अधिक विविध नृत्य प्रकार सादर केले, जे युवा शक्ती, कलात्मक वारसा आणि महिला सक्षमीकरणाचे प्रतीक होते. तसेच 'विकसित भारत', 'विरासत भी विकास भी', 'एक भारत श्रेष्ठ भारत' यांसारख्या संकल्पनांचा स्वीकार केला. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ ने 'सर्वात मोठे भारतीय लोकनृत्य' म्हणून मान्यता दिलेल्या या सादरीकरणात, रंगीबेरंगी पोशाख आणि सुसंगत नृत्यदिग्दर्शनाद्वारे भारतातील विविधतेतील एकता अधोरेखित करण्यात आली.

‘जयति जय मम भारतम्’, या शीर्षकाअंतर्गत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात संस्कृती मंत्रालयाने सादरीकरण केले. यामध्ये भारताचा समृद्ध आदिवासी आणि लोक वारसा दर्शवण्यात आला.
संस्कृती मंत्रालयाने प्रयागराज येथील महाकुंभ आयोजनामध्ये सेक्टर-7 मध्ये 10.24 एकर क्षेत्रामध्ये एका कलाग्रामची उभारणी केली. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी, 2025 पर्यंत भरलेल्या कुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी भाविक सहभागी झाले. केंद्रीय संस्कृती मंत्र्यांच्या हस्ते 12.01.2025 रोजी उद्घाटन झालेल्या या कलाग्राममध्ये, देशभरातील सुमारे 15,000 कलाकार आणि कारागिरांना 45 दिवसांपेक्षा जास्त काळ एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामध्ये देशातील नृत्य, संगीत, पाककृती, कला आणि हस्तकला इत्यादी विविध परंपरांचे प्रदर्शन केले. यामुळे अतिथींना या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची आणि त्यात सक्रिय सहभागी होण्याची एक अनोखी संधी तर मिळालीच, शिवाय महाकुंभाला भेट देणाऱ्या जनसमुदायाला सामुदायिक संबंध दृढ करण्याची आणि आर्थिक व शाश्वत विकासाला चालना देण्याची संधीही मिळाली. याव्यतिरिक्त, या कलाग्रामने आपल्या 'विविधतेतील एकते'चे सौंदर्य समोर आणून आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' भावना वृध्दिंगत केली. विविध समुदायांमध्ये सांस्कृतिक परंपरा आणि पद्धतींबद्दल कौतुक निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले.
महाकुंभ लोगोचे प्रोजेक्शन मॅपिंग, 2025 : महाकुंभाचा लोगो विविध केंद्रीय संरक्षित स्मारकांवर प्रक्षेपित करण्यात आला.
या कलाग्रामची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
• मुख्य प्रवेशद्वार: 635 फूट रुंद, 54 फूट उंच. या प्रवेशव्दारावर 12 ज्योतिर्लिंग आणि भगवान शिवाने हलाहल विष प्राशन केल्याची कथा दर्शवून कला आणि अध्यात्माचा संगम केला.
• अनुभूत मंडपम : 360 अंशांतील दृश्याचा अनुभव देणारी मांडणी केली असून, त्यामधून गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण दर्शवले आहे.
• अविरल शाश्वत कुंभ : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार (एनएआय ) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (आयजीएनसी) द्वारे डिजिटल प्रदर्शन.
• खाद्य पदार्थ विभाग : प्रयागराजच्या स्थानिक पदार्थांव्यतिरिक्त सर्व विभागीय सांस्कृतिक केंद्रांचे सात्विक पदार्थ अतिथींसाठी उपलब्ध ठेवण्यात आले.
• संस्कृती अंगण: सात विभागीय सांस्कृतिक केंद्रांच्या अंगणांमध्ये पारंपरिक भारतीय हस्तकला आणि हातमागाच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री.


संस्कृती मंत्रालयाने प्रयागराजमधील सेक्टर-7 मध्ये 10.24 एकर जागेत महाकुंभ कलाग्रामची स्थापना केली होती.
गौडिया मिशनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभाचा समारोप सोहळा 28 फेब्रुवारी, 2025 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ‘सायन्स सिटी’मध्ये आयोजित करण्यात आला होता. उपराष्ट्रपती या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात श्रील प्रभुपाद यांच्या जीवनाशी संबंधित वस्तू आणि कलाकृतींसह त्यांच्या जीवनावरील एक प्रदर्शन भरवण्यात आले होते.
आणखी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत, केंद्रीय संस्कृती मंत्र्यांच्या हस्ते 18 मार्च, 2025 रोजी तामिळनाडूमध्ये श्रीरंगम मंदिरात कंब रामायण महोत्सवाच्या उद्घाटनाने कंब रामायण परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यात आले. यानंतर 20 मंदिरांमध्ये कंब रामायणाचे सादरीकरण झाले. या उपक्रमाचा समारोप 6एप्रिल, 2025 रोजी रामनवमीच्या दिवशी कंबन मेडू येथे एका भव्य सोहळ्याने झाला. हा एक महिन्याचा महोत्सव आता दरवर्ष साजरा केला जाईल. त्याचा प्रारंभ मार्चमध्ये तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगम मंदिरात होईल आणि एप्रिलमध्ये कंबन मेडू येथे रामनवमीच्या उत्सवाने त्याची सांगता होईल.

तामिळनाडू येथील श्रीरंगम मंदिरात कंब रामायण महोत्सवाचा उद्घाटन सोहळा
31 मे, 2025 रोजी, संस्कृती मंत्रालयाने, मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने, भोपाळमधील जंबुरी मैदानावर एका भव्य कार्यक्रमात लोकमता अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी केली. या प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सक्षमीकरण महासंमेलनाला मार्गदर्शन केले आणि अहिल्याबाईंच्या चिरस्थायी वारशाला आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी त्यांच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल तिकीट आणि एक विशेष नाणे देखील प्रकाशित केले. या उत्सवाचा एक भाग म्हणून, पंतप्रधानांनी आदिवासी, लोक आणि पारंपरिक कलांमधील योगदानासाठी प्रतिष्ठित महिला कलाकार डॉ. जयमती कश्यप यांना देवी अहिल्याबाई पुरस्कार प्रदान केला. या भेटीदरम्यान, पंतप्रधानांनी संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन आणि कार्यावरील एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाला आकार देण्यात त्यांची भूमिका अधोरेखित करणारा एक लघुपट पाहिला.
संस्कृती मंत्रालयाने दिल्ली सरकारच्या सहकार्याने, 1975 मध्ये भारतात लागू केलेल्या आणीबाणीच्या 50 व्या वर्षानिमित्त 25 जून, 2025 रोजी नवी दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममध्ये 'संविधान हत्या दिवस' पाळला. हा दिवस लोकशाही मूल्ये आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वाचे स्मरण करून देणारा होता.

संस्कृती मंत्रालयाने दिल्ली सरकारच्या सहकार्याने, 25 जून, 2025 रोजी नवी दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममध्ये ‘संविधान हत्या दिवस’ पाळला.
मंत्रालयाने चोल सम्राट राजेंद्र चोल (प्रथम) जयंतीनिमित्त 23 ते 27 जुलै, 2025 या कालावधीत तामिळनाडूच्या गंगैकोंडा चोलपुरम येथे 'आदि तिरुवाथिराई' महोत्सवाचे आयोजन केले. या कार्यक्रमाद्वारे चोलांच्या सागरी मोहिमेच्या 1,000 वर्षांच्या वर्धापनदिनाचेही स्मरण करण्यात आले. भारतीय नौदल इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा महोत्सव तमिळ आध्यात्मिक परंपरा आणि शिव सिद्धांताच्या पैलूंमध्ये खोलवर रुजलेला आहे. या पाच दिवसांच्या महोत्सवाचे गंगैकोंडा चोलेश्वरम मंदिरात आयोजन करण्यात आले होते. हे मंदिर युनेस्को-मान्यताप्राप्त स्मारक आहे . या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकार आणि स्थानिक लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ एक स्मृती नाणे देखील जारी करण्यात आले. समारोपाच्या दिवशी पंतप्रधानांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 9 जुलै, 2025 रोजी नवी दिल्ली येथील सिरी फोर्ट सभागृहात एका उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला आदरांजली यावेळी वाहण्यात आली. जुलै 2025 ते जुलै 2027 पर्यंत असे दोन वर्षे चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्यात आले.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 9 जुलै, 2025 रोजी नवी दिल्ली येथील सिरी फोर्ट सभागृहात उद्घाटन समारंभ
वर्ष 1898 मध्ये उत्तर प्रदेशातील पिप्रहवा येथे भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचा काही भाग सापडला होता, त्याचा लिलावासाठी ठेवण्यात आला होता. मंत्रालयाने कणखर भूमिका घेवून, हा लिलाव थांबवण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली. या कायदेशीर आणि नैतिक दबावामुळे लिलाव थांबला आणि मंत्रालयाने या संधीचा फायदा घेत वाटाघाटी केल्या. हे अमूल्य अवशेष 127 वर्षांनंतर 30जुलै, 2025 रोजी भारतात परत आणण्यात आले. हाँगकाँगमध्ये त्यांचा लिलाव थांबवण्यासाठी केलेल्या समन्वित कायदेशीर आणि राजनैतिक प्रयत्नांनंतर, एका भारतीय औद्योगिक समूहाने खाजगीरित्या संपादन करून, हे अवशेष भारत सरकारकडे सुपूर्द केले. सोने, गार्नेट आणि क्रिस्टलच्या दागिन्यांचा समावेश असलेले अवशेष यशस्वीरित्या भारतात परत आणण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील पिप्रहवा येथे 1898 मध्ये सापडलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष संस्कृती मंत्रालयाने यशस्वीरित्या सुरक्षित केले आहेत.
युनेस्कोने जागतिक वारसा समितीच्या 47 व्या अधिवेशनात, भारताचे 2024-25 च्या आवृत्तीसाठीचे अधिकृत नामांकन, 'भारतातील मराठा स्वराज्याची लष्करी स्थाने', युनेस्कोच्या जागतिक वारसा सूचीत समाविष्ट करण्यासाठी घोषित केले. तज्ञ समिती ‘आयसीओएमओएस’ ने नकारात्मक अहवाल दिला होता. मात्र मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने प्रभावी हस्तक्षेप केला आणि सदस्य राष्ट्रांना भारताला पाठिंबा देण्यासाठी राजी केले. अशी मान्यता मिळवणारी ही भारताची 44 वी वास्तू ठरली आहे. सर्वाधिक युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या बाबतीत भारत आता जागतिक स्तरावर 6 व्या आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.



देशातील मराठा स्वराज्य लष्करी स्थळे’ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणार
भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट, 2025 रोजी “नया भारत” (नवीन भारत) या संकल्पनेसह साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील प्रगतीवर भर देण्यात आला आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांना आदरांजली वाहण्यात आली. या निमित्ताने देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान आयोजित करण्यात आले. संरक्षित स्मारकांवर खालील उपक्रमही राबवण्यात आले:
अ. पहिला टप्पा (2-८ ऑगस्ट, 2025): तिरंगा रांगोळी
ब. दुसरा टप्पा (9 - 12 ऑगस्ट, 2025): सेल्फी बूथची स्थापना, फलकांचे प्रदर्शन आणि तिरंगा यात्रा
क. तिसरा टप्पा (13 - 15 ऑगस्ट, 2025): तिरंगी रोषणाई आणि संरक्षित स्मारकांवर राष्ट्रध्वज लावणे
या वर्षी संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेले ‘हर घर तिरंगा’ अभियान वैशिष्ट्यपूर्ण होते. मंत्रालयाने स्वच्छताविषयक संयुक्त अभियानासाठी पेयजल आणि स्वच्छता विभागाबरोबर भागीदारी केली होती. या वर्षीच्या अभियानात खर्चात काटकसर करण्याचे उपायही योजण्यात आले, परिणामी खर्चात 15% घट झाली, तर व्याप्ती आणि सेल्फी अपलोड मागील वर्षीच्या अभियानापेक्षा 50% अधिक होते. संपूर्ण-शासकीय दृष्टिकोन स्वीकारून आणि राज्ये तसेच राज्य संस्थांना सहभागी करून घेऊन हे साध्य करता आले. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत, 12 ऑगस्ट, 2025 रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या प्रारंभाचे प्रतीक म्हणून ‘बाईक रॅली’ आयोजित करण्यात आली होती, या रॅलीमध्ये हजारो बाईकस्वारांनी भारतीय ध्वज प्रदर्शित केला. या रॅलीत केंद्रीय मंत्री, दिल्ली सरकारचे मंत्री आणि संसद सदस्यांचा सहभाग होता.

भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त, संस्कृती मंत्रालयाने देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान आयोजित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1 ऑक्टोबर, 2025 रोजी आपला 100 वा वर्धापनदिन साजरा केला. या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विशेष 100 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले् स्वतंत्र भारतात भारत मातेची प्रतिमा असलेले हे पहिले नाणे आहे. तसेच यावेळी शताब्दीनिमित्त एक टपाल तिकीटही जारी केले. या टपाल तिकिटावर संघाचे स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या 1963 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची छबी आहे.

पंतप्रधानांनी विशेष 100 रुपयांचे स्मारक नाणे आणि एक टपाल तिकीट जारी केले. संघ स्वयंसेवक सहभागी झालेल्या 1963 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनाचे या टपाल तिकिटावर छायाचित्र आहे.
संस्कृती मंत्रालयाने 'ज्ञान भारतम' या भारताच्या हस्तलिखित वारशाचे जतन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्याच्या एका महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाचा भाग म्हणून, याच्या शुभारंभाच्या निमित्ताने, "हस्तलिखित वारशाद्वारे भारताचा ज्ञान वारसा पुन्हा मिळवणे" या विषयावर पहिली 'ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद' नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये 11ते 13 सप्टेंबर, 2025 दरम्यान आयोजित केली. यामध्ये आठ विषयांवर मंथन झाले. परिषदेनिमित्त देशातील आणि परदेशातील 1,100 हून अधिक प्रतिनिधी सहभागी एकत्र आले होते. 12सप्टेंबर, 2025 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञान भारतम वेब पोर्टलचे औपचारिक उद्घाटन केले. भारताची ज्ञान परंपरा तीन स्तंभांवर आधारित आहे - जतन, नवोपक्रम आणि विविध गोष्टी जोडणे आणि स्वीकारणे - यावर जोर त्यांनी दिला. या परिषदेची सांगता 13 सप्टेंबर, 2025 ला झाली. परिषदेमध्ये विकसित भारत 2047 च्या भावनेने भारताच्या हस्तलिखित वारशाचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिकपणे ज्ञान भारतम वेब पोर्टलचे उद्घाटन केले आणि भारताची ज्ञान परंपरा तीन स्तंभांवर आधारित आहे - जतन, नवोपक्रम आणि जोडले जाणे आणि स्वीकारणे - यावर भर दिला.
संस्कृती मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम- ज्ञान भारतमने 25.10.2025 रोजी देशभरातील 17 प्रमुख संस्थांसोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. हा समारंभ नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (जयपूर हाऊस), नवी दिल्ली येथे पार पडला. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2025 दरम्यान सेवा पर्व 2025 यशस्वी साजरे करण्यात आले. या काळामध्ये सेवा, सर्जनशीलता आणि नागरिक सहभागाच्या एका मोठ्या चळवळीत रूपांतर झाले. या उत्सवाचा एक भाग म्हणून, मंत्रालयाने आपल्या नोडल संस्थांमार्फत, देशभरातील 75 निवडक ठिकाणी “विकसित भारताचे रंग, कलेच्या संगती” या संकल्पनेखाली एकदिवसीय कला कार्यशाळांचे आयोजन केले. प्रत्येक कार्यशाळेत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, व्यावसायिक कलाकार आणि पारंपरिक कारागीर एकत्र आले आणि त्यांनी “सेवा पर्व – विकसित भारताची संकल्पना” या विषयावर कलाकृती तयार केल्या. याव्यतिरिक्त, मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांनी प्रमुख वारसा स्थळांवर 'स्वच्छता ही सेवा' मोहिमा राबवल्या. या उपक्रमांनी सेवा आणि वारसा संवर्धनाला सांस्कृतिक अभिव्यक्तीशी जोडले, ज्यामुळे सर्जनशीलतेला नागरिक चेतनेशी जोडण्याच्या उद्दिष्टाला बळकटी मिळाली.

संस्कृती मंत्रालयाने आपल्या नोडल संस्थांमार्फत, सेवा पर्व 2025 निमित्त देशभरातील 75 ठिकाणी “विकसित भारताचे रंग, कलेच्या संगती” या संकल्पनेअंतर्गत एकदिवसीय कला कार्यशाळांचे आयोजन केले.
केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त (31 ऑक्टोबर, 2025 ) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका सादर केली. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे होते. या प्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते स्मारक नाणे आणि टपाल तिकीट देखील जारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे संगीत नाटक अकादमी आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, संस्कृती मंत्रालय यांच्याद्वारे तयार केलेली “लोह पुरुष नमस्तुभ्यम्” नावाची भव्य नृत्य रचना होती, ज्यामध्ये देशभरातील 800 हून अधिक कलाकारांनी भाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एक स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले.
संस्कृती मंत्रालयाने विशेष मोहीम 5.0 राबवली. या मोहिमेमध्ये ई-कच-याची विल्हेवाट लावण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आणि सार्वजनिक तक्रारी आणि पीजी-अपीलच्या विल्हेवाटीमध्ये 100% आणि खासदार संदर्भांमध्ये 74%, पंतप्रधान कार्यालय संदर्भांमध्ये 68%, राज्य सरकार संदर्भांमध्ये 64% यश मिळवले. 599 ठिकाणी स्वच्छता मोहिमेत 100% यश दिसून आले.


संस्कृती मंत्रालयाने ई-कच-याची विल्हेवाट लावण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून विशेष मोहीम 5.0 पूर्ण केली.
संस्कृती मंत्रालयाने 12 नोव्हेंबर, 2025 रोजी नवी दिल्ली, द्वारका येथील यशोभूमी येथे आयोजित आदिवासी व्यवसाय संमेलन 2025 च्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हे संमेलन भारताच्या आदिवासी समुदायांच्या कलात्मक उत्कृष्टता, साहित्यिक विविधता आणि सर्जनशील उद्योजकतेचा उत्सव साजरा करण्यासाठी एक चैतन्यमय व्यासपीठ ठरले, जे जनजातीय गौरव वर्षाच्या भावनेशी आणि विकसित भारत @2047 च्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत होते. आदिवासी व्यवहार मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि संस्कृती मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेने भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या 'जनजातीय गौरव वर्षा'दरम्यान एक महत्त्वपूर्ण क्षण अधोरेखित केला. या परिषदेतील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेली, “आदिवासी वारसा ते उद्योजकता: शाश्वत उद्योजकतेला प्रोत्साहन” या शीर्षकाअंतर्गत आयोजित परिसंवादात्मक चर्चा झाली.


संस्कृती मंत्रालयाने 12 नोव्हेंबर, 2025 रोजी नवी दिल्लीतील द्वारका भागातील यशोभूमी येथे आदिवासी व्यवसाय परिषद 2025 चे, यशस्वी आयोजन केले.
इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (आयएनटीएसीएच) 'प्रकल्प गज-लोक: आशियातील हत्तींची गृहस्थाने आणि त्यांचे सांस्कृतिक प्रतीक' या एका अग्रगण्य आंतरराष्ट्रीय उपक्रमाच्या शुभारंभाची अभिमानाने घोषणा केली. हा संस्कृती-निसर्ग संवर्धन कार्यक्रम आशियाई हत्तीशी संबंधित सखोल संबंधांचे दस्तऐवजीकरण आणि विश्लेषण करण्यासाठी समर्पित आहे. यामुळे संपूर्ण खंडात संस्कृती, इतिहास, पर्यावरणशास्त्र आणि हवामान लवचिकतेच्या परस्परसंबंधित कथांवर प्रकाश टाकतो. ‘प्रकल्प गज-लोक’ चा अधिकृत प्रारंभ 19 ते 25 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत एका सार्वजनिक प्रदर्शनाने झाला. तसेच यामध्ये 20 नोव्हेंबर, 2025 रोजी ‘आयएनटीएसीएच’ ची नवी दिल्ली येथे एका गोलमेज परिषद झाली. हे कार्यक्रम अमूर्त सांस्कृतिक वारसा (आससीएच) विभागाद्वारे आयोजित केले.

केंद्रीय संस्कृती मंत्र्यांनी 18.11.2025 रोजी ‘प्रकल्प मौसम’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. “हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी जाळ्यांच्या छेदमार्गावरील बेटे” या शीर्षकाची ही कार्यशाळा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) द्वारे हुमायून मकबऱा जागतिक वारसा स्थळ संग्रहालयात आयोजित केली. हा प्रकल्प वारसा अभ्यास, वैज्ञानिक संशोधन आणि सामुदायिक सहभागाचा एक अद्वितीय संगम दर्शवणारा आहे. सागरी वारसा जतन करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला हा प्रकल्प अधोरेखित करतो. मंत्र्यांनी सागरी-संबंधित सांस्कृतिक स्थानांचे दस्तऐवजीकरण आणि संरक्षण करण्यासाठी नवीन मार्ग सुरू करण्याच्या या उपक्रमाच्या ध्येयावर प्रकाश टाकला आणि याला एक गतिशील, सहयोगी चळवळ म्हणून सादर केले.

केंद्रीय संस्कृती मंत्र्यांनी 18.11.2025 रोजी ‘प्रकल्प मौसम’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केले.
बुद्ध धम्माची मातृभूमी आणि बौद्ध वारशाचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे अतुलनीय स्थान पुन्हा एकदा अधोरेखित करत, देशाने पुन्हा एकदा दक्षिणपूर्व आशिया आणि भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. - बिहारमधील बोधगया येथे 2 ते 13 डिसेंबर, 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण समारंभ, सोबतच जेठियन खो-यापासून राजगीरमधील पवित्र वेणुबनापर्यंत बुद्धांच्या पावलांचे अनुसरण करणारी स्मरणयात्रा. बोधगया येथील 12 दिवसांची आध्यात्मिक सभा—ज्ञानप्राप्तीचे पवित्र स्थान—आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी) द्वारे, सरकारच्या संस्कृती मंत्रालय आणि अमेरिकेच्या लाइट ऑफ बुद्ध धर्म फाउंडेशन इंटरनॅशनल यांच्या भागीदारीत आयोजित केली.
12 दिवसीय कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:
• पवित्र बोधिवृक्षाखाली पाली धर्मग्रंथांचे दैनिक पठण
• प्रख्यात धम्मगुरूंचे प्रवचन
• संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रे
• भारत आणि परदेशातील कलाकारांचा सहभाग असलेले कला दालन आणि सांस्कृतिक प्रदर्शन
• उद्घाटन समारंभाच्या दिवशी आयबीसी -प्रायोजित गटाद्वारे सांस्कृतिक सादरीकरण.

दक्षिणपूर्व आशिया आणि भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध कार्यक्रमासंबंधी पूर्व-कार्यक्रम पत्रकार परिषद नवी दिल्लीत आयोजित
‘अमूर्त सांस्कृतिक वारशा’ च्या संरक्षणासाठी आंतरसरकारी समितीचे विसावे सत्र 8 ते 13 डिसेंबर, 2025 दरम्यान नवी दिल्लीमध्ये पार पडले. या सत्राचे अध्यक्षस्थान युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधीने भूषवले.
***
NehaKulkarni/SuvarnaBedekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2210016)
अभ्यागत कक्ष : 30