राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ’प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2025 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात, शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, तसेच विज्ञान- तंत्रज्ञान या क्षेत्रांत अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना "प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’’ प्रदान केले.
या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, पुरस्कार विजेत्या मुलांनी त्यांच्या कुटुंबाचा, समाजाचा आणि संपूर्ण देशाचा गौरव वृध्दिंगत केला आहे. या पुरस्कारांमुळे देशभरातील सर्व मुलांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.या पुरस्कारांमुळे देशातील सर्व मुलांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, सुमारे 320 वर्षांपूर्वी, शीख धर्माचे दहावे गुरू आणि सर्व भारतीयांना पूजनीय असलेले गुरू गोविंद सिंग जी आणि त्यांच्या चार पुत्रांनी सत्य आणि न्यायाच्या समर्थनार्थ लढताना सर्वोच्च बलिदान दिले. त्या म्हणाल्या की, दोन सर्वात लहान साहिबजादांच्या शौर्याचा सन्मान आणि आदर भारतामध्ये आणि परदेशातही केला जातो. सत्य आणि न्यायासाठी अभिमानाने आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या त्या महान बालवीरांचे त्यांनी आदराने स्मरण केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, ज्यावेळी देशातील मुलांमध्ये देशभक्तीची भावना असते आणि त्यांच्या समोर उच्च- परिपूर्ण आदर्श असतात, त्यावेळी तो देश महान ठरतो. मुलांनी शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये आपली अपवादात्मक, कौतुकास्पद प्रतिभा दाखवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, की, सात वर्षांच्या वाका लक्ष्मी प्रज्ञिकासारख्या प्रतिभावान मुलांमुळेच भारताला जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक शक्ती मानले जाते. अजय राज आणि मोहम्मद सिदान पी, यांनी आपल्या शौर्य आणि बुद्धिमत्तेने इतरांचे प्राण वाचवले, ही सर्व मुले कौतुकास पात्र आहेत. नऊ वर्षांची मुलगी व्योमा प्रिया आणि अकरा वर्षांचा शूर मुलगा कमलेश कुमार यांनी मोठेच धैर्य दाखवले, इतरांचे प्राण वाचवताना त्यांनी आपले प्राण गमावले. दहा वर्षांच्या श्रवण सिंगने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान युद्धाशी संबंधित धोके असूनही, आपल्या घराजवळील सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना नियमितपणे पाणी, दूध आणि लस्सी पोहोचवली. तर, दिव्यांग मुलगी शिवानी होसूरू उप्पारा हिने आर्थिक आणि शारीरिक मर्यादांवर मात करून क्रीडा क्षेत्रात विलक्षण यश मिळवले आहे. वैभव सूर्यवंशीने क्रिकेटच्या अत्यंत स्पर्धात्मक आणि प्रतिभावान जगात आपले नाव कमावले आहे आणि अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. अशी शूर आणि प्रतिभावान मुले यापुढेही चांगली कामे करत राहतील आणि भारताचे भविष्य उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208884)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam