पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी


आसामने विकासाची नवी गती पकडली आहे: पंतप्रधान

शेतकऱ्यांचे हित हे आपल्या सरकारच्या सर्व प्रयत्नांच्या केंद्रस्थानी  : पंतप्रधान

कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मिशन यांसारखे उपक्रम सुरू केले  आहेत : पंतप्रधान

सबका साथ, सबका विकास या संकल्पांनी प्रेरित आमच्या प्रयत्नांनी गरिबांच्या जीवनमानात परिवर्तन  घडवून आणले  : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 21 DEC 2025 2:57PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. ही भूमी चाओलंग सुखाफा आणि महावीर लाचित बोरफुकन यांसारख्या महान वीरांची भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले.  भीमबर देउरी, शहीद कुशल कुंवर, मोरान राजा बौदोसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंग आणि पराक्रमी सती साधनी यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या शौर्य आणि बलिदानाच्या महान भूमीला, उजनी आसामच्या पवित्र मातीला आपण नमन करत असल्याची भावना पंतप्रधानांनी  व्यक्त केली.

आज या सभेच्या निमित्ताने समोर मोठ्या संख्येने जमलेले लोक आपला स्नेह व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले. या सभेसाठी जमलेल्या विशेषतः माता आणि भगिनींच्या उपस्थितीची दखलपूर्ण नोंदही त्यांनी घेतली, या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद अद्भूत आहेत असे ते म्हणाले. अनेक भगिनी आसामच्या चहाच्या मळ्यांचा सुगंध घेऊन आल्या आहेत, हा सुगंध आसामसोबतच्या आपल्या नात्यात एक आगळीवेगळी भावना निर्माण करतो, असे पंतप्रधान म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले तसेच त्यांचा स्नेह आणि प्रेमाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.

आजचा दिवस आसाम आणि संपूर्ण ईशान्य भारतासाठी ऐतिहासिक आहे, आज नामरूप आणि दिब्रुगडचे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले स्वप्न आज पूर्ण झाले असून, या प्रदेशात औद्योगिक प्रगतीचे एक नवीन युग सुरू झाले असे ते म्हणाले. सभेआधी काही वेळापूर्वीच आपण अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन, तसेच दिब्रुगडला येण्यापूर्वी गुवाहाटी विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. आसामने आता विकासाची नवा गती पकडली आहे, असे सर्वजण म्हणू लागले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आज आपण जे पाहतोय ती केवळ सुरुवात आहे, आणि आसामला अजून खूप पुढे न्यायचे आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. अहोम साम्राज्याच्या काळातील आसामच्या क्षमतेचे आणि भूमिकेचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. विकसित भारतातही आसाम तितकीच सामर्थ्यशाली भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन उद्योगांची सुरुवात, आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी, सेमीकंडक्टर उत्पादन, कृषी क्षेत्रातील नवीन संधी, चहाचे मळे आणि तिथल्या कामगारांची प्रगती तसेच पर्यटनातील वाढत्या क्षमतेबद्दल ते बोलले . आज आसाम प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असल्याचे ते म्हणाले.आधुनिक खत प्रकल्पासाठी त्यांनी उपस्थितांसह आसामच्या जनतेल्या शुभेच्छा दिल्या, तसेच गुवाहाटी विमानतळाच्या नवीन टर्मिनलसाठी जनतेचे अभिनंदनही केले. केंद्र आणि राज्यातील आपल्या सरकारांच्या नेतृत्वात, उद्योग आणि दळवणीय जोडणीचा घडून येत असलेला मिलाफ, आसामची स्वप्ने पूर्ण करत आहे, युवा वर्गाला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करत आहे, असे त्यांनी नमूद केले.

विकसित भारताच्या उभारणीत देशातील शेतकरी आणि अन्नदात्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्यक्रमावर ठेऊनच सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले, याच दृष्टीकोनातून शेतकरी स्नेही योजनांची व्याप्ती सर्वांसाठी वाढवली जात आहे असेही त्यांनी नमूद केले.  कृषी कल्याण विषयक उपक्रमांसोबतच शेतकऱ्यांना खतांचा निरंतर पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे, आणि येत्या काळात असा पुरवठा होत राहील याची हमीच या नवीन युरिया प्रकल्पामुळे मिळाली आहे असे ते म्हणाले. या खत प्रकल्पासाठी सुमारे 11,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, या प्रकल्पाअंतर्गत दरवर्षी 12 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त खताचे उत्पादन घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  स्थानिक पातळीवर जलगतीने उत्पादन झाल्याने पुरवठाही तितक्याच जलद गतीने होईल, परिणामी व्यावसायिक वाहतुकीपोटी होणाऱ्या खर्चात घट होईल असे ते म्हणाले.

नामरूप युनिटमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या हजारो नव्या संधी निर्माण होतील, असे अधोरेखित करत मोदी म्हणाले की, हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर अनेकांना स्थानिक पातळीवर कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील. तसेच दुरुस्ती, पुरवठा आणि इतर संबंधित कामांमुळेही युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

मोदी यांनी प्रश्न उपस्थित केला की, अशा प्रकारचे शेतकरी कल्याणकारी उपक्रम त्यांचे  सरकार सत्तेत आल्यानंतरच का होत आहेत. त्यांनी नमूद केले की, नामरूप हे दीर्घकाळ खत उत्पादनाचे केंद्र होते आणि एके काळी  येथे तयार होणाऱ्या खतामुळे संपूर्ण ईशान्य भारतातील शेतकऱ्यांच्या शेतांना बळ मिळत होते व त्यांच्या पिकांना आधार मिळत होता. देशातील अनेक भागांत खत टंचाई असतानाही नामरूप शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण होता, याचे त्यांनी स्मरण करून दिले .  मात्र जुन्या प्रकल्पांचे तंत्रज्ञान कालबाह्य झाले आणि पूर्वीच्या सरकारांनी याकडे दुर्लक्ष केले, असे त्यांनी सांगितले. परिणामी नामरूप प्रकल्पातील अनेक युनिट्स  बंद पडली , ईशान्य भारतातील शेतकरी अडचणीत सापडले, त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आणि शेतीतील समस्या वाढल्या. केंद्र आणि राज्यातील सध्याची सरकारे पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेल्या समस्या सोडवत आहेत, असा ठाम दावा पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधानांनी सांगितले की, आसामप्रमाणेच इतर अनेक राज्यांतील खत कारखानेही बंद पडले होते. त्या काळातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली होती याची त्यांनी आठवण करून दिली .  जेव्हा युरियासाठी लांबच लांब रांगा लागायच्या, दुकानांवर पोलीस तैनात करावे लागत आणि शेतकऱ्यांवर लाठीचार्जही होत असे. विरोधकांनी परिस्थिती आणखी बिघडवली, तर सध्याचे सरकार ती सुधारत आहे, असे त्यांनी सांगितले. मागील सत्ताधारी काळात खत कारखाने बंद होत होते, तर सध्याच्या सरकारने गोरखपूर, सिंद्री, बरौनी आणि रामगुंडम येथे नवीन प्रकल्प सुरू केले आहेत, असे त्यांनी नमूद केले. या क्षेत्रात खासगी क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रयत्नांमुळे भारत युरियाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधानांनी सांगितले की, 2014 मध्ये देशात केवळ 225 लाख मेट्रिक टन युरियाचे उत्पादन होत होते, तर आज ते जवळपास 306 लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे. भारताला दरवर्षी सुमारे 380 लाख मेट्रिक टन युरियाची गरज असून ही तूट भरून काढण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या हितांबाबत अत्यंत संवेदनशील असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. परदेशातून महागड्या दराने आयात केलेला युरियाचाही  शेतकऱ्यांवर भार पडू दिला जात नाही, कारण त्याचा खर्च सरकार अनुदानाच्या माध्यमातून उचलते, असे त्यांनी नमुद केले. भारतीय शेतकऱ्यांना युरियाची एक गोणी केवळ ₹300 मध्ये मिळते, तर त्याच गोणीसाठी सरकारला इतर देशांना जवळपास ₹3,000 द्यावे लागतात, असे त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित रक्कम सरकार भरते, जेणेकरून शेतकरी बांधव-भगिनींवर आर्थिक भार पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मातीचे संरक्षण करण्यासाठी युरिया आणि इतर खतांचा योग्य वापर करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आज बीजापासून बाजारापर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतीसाठी लागणारा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याने त्यांना कर्जासाठी भटकावे लागत नाही, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत जवळपास ₹4 लाख कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. याच वर्षी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ₹35,000 कोटींच्या दोन योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पीएम धन-धान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये  आत्मनिर्भरता अभियानामुळे शेतीला आणखी चालना मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

शेतकऱ्यांची प्रत्येक गरज लक्षात घेऊन सरकार काम करत आहे यावर भर देत, मोदी म्हणाले की प्रतिकूल हवामानामुळे जेव्हा पिकांचे नुकसान होते, तेव्हा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेद्वारे मदत केली जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी खरेदी व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शेतकरी सक्षम असेल तेव्हाच राष्ट्र प्रगती करते असा सरकारचा ठाम विश्वास असल्याचे सांगून, त्या दिशेने सर्वतोपरी  प्रयत्न केले जात असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

केंद्रामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर, पशुपालक शेतकरी, मत्स्यपालकांनाही किसान क्रेडिट कार्ड सुविधेच्या लाभाखाली आणले गेले आणि त्यांना याचा मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना या वर्षी 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत मिळाली असल्यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर, जैव-खतांवरील जीएसटी घटल्यामुळेही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू करून, त्यांचे केंद्र सरकार नैसर्गिक शेतीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. या अभियानाशी लाखो शेतकरी जोडले गेल्याचेही त्यांनी सांगितले. अलीकडील काळात, देशात 10,000 शेतकरी उत्पादक संस्थांची (एफपीओ) स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ईशान्येकडील राज्यांकडे विशेष लक्ष केंद्रित करत सरकारने पाम तेलाशी निगडीत अभियान सुरू केले आहे, ज्यामुळे खाद्यतेलाच्या क्षेत्रात  भारत केवळ आत्मनिर्भर होणार  नाही तर या राज्यांतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी देखील होईल.

या प्रदेशात चहाच्या मळ्यातील कामगारांची संख्या मोठी असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी, त्यांच्या सरकारने आसाममधील साडेसात लाख चहा कामगारांना जन धन खाती उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे या कामगारांना थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा फायदा मिळत आहे. चहाच्या मळ्यांच्या परिसरात शाळा, रस्ते, वीज, पाणी आणि रुग्णालय यांसारख्या सुविधा विस्तारत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

सबका साथ, सबका विकास या मंत्राचे पालन करत सरकार पुढे जात आहे आणि त्यामुळे गरिबांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडून आल्याचे अधोरेखित करताना, या प्रयत्नांमुळेच गेल्या 11 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडून, देशामध्ये एक नवा मध्यमवर्ग उदयास आला आहे. गेल्या काही वर्षांत गरीब कुटुंबांच्या राहाणीमानात सातत्याने सुधारणा होत असल्यामुळे हे शक्य झाल्याचे ते पुढे म्हणाले.

अलीकडे आलेल्या आकडेवारीवरून भारतामध्ये बदल होत असल्याचे दिसून येत असल्याचं पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. पूर्वी गावातल्या सर्वांत गरीब दहा कुटुंबापैकी एका कुटुंबाकडे दुचाकी असे, तर आता गावांमधील निम्म्या कुटुंबांकडे दुचाकी अथवा चार चाकी आहे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मोबाइल फोन जवळपास प्रत्येक घरापर्यंत पोहोचले आहेत आणि एकेकाळी चैनीची गोष्ट मानली जाणारी फ्रीज सारखी वस्तू आता सामान्य झाली असून, गावांतल्या स्वयंपाकघरात त्यांना स्थान मिळालं आहे. स्मार्टफोन्सचा प्रसार होऊनही, खेडोपाडी टीव्ही घेण्याचा कल वाढतो आहे. हे बदल आपोआप झालेले नाहीत, तर देशातील गरीब लोक सक्षम होत असल्यामुळे  आणि दुर्गम भागात राहाणाऱ्या लोकांनाही विकासाचा फायदा मिळत असल्याने हे बदल घडून येत आहेत यावर मोदी यांनी भर दिला.

केंद्रात आणि राज्यात असलेली त्यांची सरकारे, गरीब, आदिवासी, तरुण आणि महिलांसाठी तसेच  गेल्या अनेक दशकांपासून आसाम आणि ईशान्येकडील राज्यात सुरू असलेला हिंसाचार संपवण्यासाठी काम करत आहेत, असे सांगून मोदींनी, सरकारने नेहमीच आसामची ओळख  आणि संस्कृतीला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे आणि प्रत्येक व्यासपीठावर आसामच्या अभिमानाची प्रतीके व्यासपीठांवरून ठळकपणे मांडली असल्याचे अधोरेखित केले. म्हणूनच महावीर लचित बोरफुकान यांचा 125 फुटी पुतळा सरकारने अभिमानाने साकारला, भुपेन हजारिका यांची जन्मशताब्दी साजरी केली आणि आसामची कला, हस्तकला  आणि गमोसा यांना जागतिक प्रतिष्ठाही मिळवून दिली.

काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम व्लादिमीर पुतिन दिल्ली दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांना अभिमानाने आसामचा काळा चहा भेट म्हणून देण्यात आल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की आसामच्या प्रतिष्ठेत भर घालणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला प्राधान्य दिले जाते. अशा प्रकारची कामे केली की विरोधक सर्वाधिक अस्वस्थ होतात असे त्यांनी नमूद केले. भारतरत्न भूपेन हजारिका यांना भारतरत्न देण्यात आले , तेव्हा विरोधकांनी उघडपणे त्याला विरोध केला होता, आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मोदी गायक आणि कलाकारांना भारतरत्न देत आहेतअशी टीका केली होती, याची त्यांनी आठवण करून दिली. तसेच, आसाममध्ये सेमीकंडक्टर  युनिट उभारले गेले तेव्हाही विरोधकांनी त्याला विरोध केल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी स्मरण करून दिले की अनेक दशकांपर्यंत विरोधी सरकारांनी चहामळ्यातील कामगार बांधव-भगिनींना जमीन हक्क नाकारले होते, त्याउलट  त्यांच्या सरकारने त्यांना जमीन हक्क दिले आणि सन्मानजनक जीवन बहाल केले. विरोधक अजूनही राष्ट्रविरोधी विचारसरणीला प्रोत्साहन देत असून, मतपेढी मजबूत करण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना आसामच्या जंगलांमध्ये आणि जमिनींवर वसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की विरोधकांना आसाम येथील जनता किंवा त्यांची ओळख यांची कोणतीही काळजी नाही; त्यांना फक्त सत्ता आणि सरकारचीच चिंता आहे. विरोधक बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना प्राधान्य देतात, त्यांना वसवतात आणि त्यांचे संरक्षण करतात, असे त्यांनी म्हटले. त्यामुळेच विरोधक मतदार यादी शुद्धीकरणाला विरोध करतात, हेही त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की आसामला विरोधकांच्या तुष्टीकरणाच्या आणि मतपेढीच्या राजकारणाच्या विषापासून वाचवणे गरजेचे आहे. आसामची ओळख आणि सन्मान जपण्यासाठी त्यांचा पक्ष ढालीसारखा उभा आहे, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.

विकसित भारत घडवताना पूर्व भारत आणि ईशान्य भारताची भूमिका सातत्याने वाढत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. पूर्व भारत देशाच्या विकासाचे  इंजिन बनेल, हे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. नव्या नामरूप युनिटचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की येथे तयार होणारे खत केवळ आसामच्या शेतांपुरते मर्यादित न राहता बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचणार आहे. देशाच्या खत गरजांमध्ये ईशान्य भारताचे हे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी शेवटी नमूद केले की नामरूपसारखे प्रकल्प दर्शवतात की येणाऱ्या काळात ईशान्य भारत आत्मनिर्भर भारताचे प्रमुख  केंद्र म्हणून उदयाला येईल आणि खऱ्या अर्थाने अष्टलक्ष्मी ठरेल. नव्या खत प्रकल्पासाठी त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी आसाममधील दिब्रुगढ जिल्ह्यात नामरूप येथे ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या विद्यमान परिसरात नव्या ब्राउनफिल्ड अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन केले. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला पुढे नेत, सुमारे 10,600 कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प आसाम आणि शेजारील राज्यांच्या खत संबंधी गरजा पूर्ण करणार आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल. हा प्रकल्प औद्योगिक पुनरुज्जीवन आणि शेतकरी कल्याणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे.

***

सुषमा काणे/तुषार पवार/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी साने/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207202) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam