पंतप्रधान कार्यालय
इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
प्रविष्टि तिथि:
17 DEC 2025 3:08PM by PIB Mumbai
इथिओपियाचे पंतप्रधान महोदय,
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे माननीय अध्यक्ष,
माननीय सदस्यगण,
आणि इथिओपियातील माझ्या प्रिय भगिनींनो आणि बांधवांनो,
आज आपल्या समोर उभे राहण्याचा मला मोठा सन्मान आणि विशेषाधिकार लाभला आहे. सिंहांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथिओपियात येणे हे अत्यंत आनंददायी आहे. मला येथे अगदी घरी असल्यासारखे वाटते कारण, भारतातील माझे गृह राज्य गुजरात हेही सिंहांचे निवासस्थान आहे.
प्राचीन शहाणपण आणि आधुनिक आकांक्षा असलेल्या राष्ट्राच्या हृदयात असलेल्या या लोकशाहीच्या मंदिरात येण्याचा मला सन्मान वाटतो. आपल्या संसदेला, आपल्या जनतेला आणि आपल्या लोकशाही प्रवासाला मी मनापासून आदर अर्पण करतो. भारतातील 1.4 अब्ज लोकांच्या वतीने मी आपल्याला मैत्री, सद्भावना आणि बंधुत्वाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे.
मी मैत्री, सद्भावना आणि बंधुत्वाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे.
तेना इस्तील्लीन
सलाम
माननीय सदस्यगण,
या भव्य इमारतीत आपले कायदे घडवले जातात. येथे जनतेची इच्छा ही राज्याची इच्छा बनते, आणि जेव्हा राज्याची इच्छा ही जनतेच्या इच्छेशी सुसंगत असते, तेव्हा प्रगतीचे चक्र आशा आणि उद्देशाने पुढे सरकते.
आपल्या माध्यमातून मी शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांशी, नव्या कल्पना उभारणाऱ्या उद्योजकांशी, समुदाय आणि संस्था नेतृत्व करणाऱ्या अभिमानी महिलांशी, तसेच भवितव्य घडवणाऱ्या इथिओपियातील तरुणांशीही संवाद साधत आहे. हा मोठा सन्मान दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
काल माझे प्रिय मित्र पंतप्रधान डॉ. अबी अहमद यांच्या हस्ते मला ‘ग्रँड ऑनर, निशान ऑफ इथिओपिया’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मी अत्यंत नम्रतेने, हात जोडून, भारतातील जनतेच्या वतीने स्वीकारतो.
आम सग्नालो
माननीय सदस्यगण,
इथिओपिया ही मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. येथे पर्वतरांगांमध्ये, दऱ्यांमध्ये आणि इथिओपियन जनतेच्या हृदयात इतिहास जिवंत आहे. आज इथिओपिया अभिमानाने उभा आहे, कारण त्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत. इथिओपियात उभे राहणे म्हणजे भूतकाळाचा सन्मान करणाऱ्या, वर्तमानकाळात उद्देशपूर्ण असलेल्या आणि भविष्याचे खुले मनाने स्वागत करणाऱ्या भूमीवर उभे राहणे होय.
जुने आणि नवे यांचे हे मिश्रण… प्राचीन शहाणपण आणि आधुनिक महत्त्वाकांक्षा यांच्यातील हा समतोल… हाच इथिओपियाचा खरा बळ आहे.
मेडेमर, म्हणजेच समन्वयाची ही भावना भारतासाठीही अत्यंत परिचित आहे. लालिबेलाच्या एकसंध खडकात कोरलेल्या चर्चप्रमाणेच, भारतातील तामिळनाडूतील प्राचीन शैलमंदिरेही दगडात कोरलेल्या प्रार्थनाच आहेत. आम्हीही एक प्राचीन संस्कृती आहोत, जी आत्मविश्वासाने भविष्याकडे वाटचाल करत आहे.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या आवाहनासह, सर्वांच्या विकासासाठी, सर्वांच्या विश्वासासह आणि प्रयत्नांद्वारे एकत्र वाटचाल करण्याचा आमचा संकल्प आहे. मातृभूमीविषयीच्या आमच्या भावना या आपल्या सामायिक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहेत.
भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् आणि इथिओपियाचे राष्ट्रगीत, दोन्हीही आपल्या भूमीला माता म्हणून संबोधतात. ती आपल्याला वारसा, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य यांचा अभिमान बाळगण्याची आणि मातृभूमीचे संरक्षण करण्याची प्रेरणा देतात.
माननीय सदस्यगण,
विज्ञानाने मानवजातीचे काही अत्यंत प्राचीन पाऊलखुणा इथिओपियात शोधल्या आहेत. जेव्हा जग लुसी किंवा दिन्किनेश यांचा उल्लेख करते, तेव्हा ते केवळ एका जीवाश्माबद्दल बोलत नसते. ते एका आरंभाबद्दल बोलत असते. असा आरंभ, जो आडिस अबाबा किंवा अयोध्या येथे राहणाऱ्या आपणा सर्वांचा आहे.
भारतामध्ये आम्ही वसुधैव कुटुंबकम् असे म्हणतो, म्हणजे संपूर्ण जग एक कुटुंब आहे. हे आपल्याला आठवण करून देते की राजकारणाच्या पलीकडे, सीमांच्या पलीकडे आणि भिन्नतेच्या पलीकडे आपला उगम समान आहे. आणि जर आपली सुरुवात सामायिक असेल, तर आपले भविष्यही सामायिक असले पाहिजे.
माननीय सदस्यगण,
भारत आणि इथिओपिया या दोन्ही देशांमध्ये हवामानातच नव्हे तर भावनांमध्येही ऊब आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी विशाल जलमार्गांवरून संपर्क प्रस्थापित केला. हिंद महासागर ओलांडून व्यापारी मसाले, कापूस, कॉफी आणि सोने घेऊन प्रवास करत होते. परंतु त्यांनी केवळ वस्तूंचीच देवाणघेवाण केली नाही. त्यांनी कल्पना, कथा आणि जीवनपद्धतींचीही देवाणघेवाण केली. अदूलिस आणि धोलावेरा यांसारखी बंदरे केवळ व्यापारकेंद्रे नव्हती, तर ती संस्कृतींमधील पूल होती.
आधुनिक काळात आपल्या संबंधांनी नवे पर्व सुरू केले. 1941 मध्ये इथिओपियाच्या मुक्तीसाठी भारतीय सैनिकांनी इथिओपियन बांधवांसोबत लढा दिला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लवकरच आपले औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
परंतु दूतावास स्थापन होण्याआधीच आपल्या जनतेने एकत्रितपणे नवा अध्याय लिहायला सुरुवात केली होती. हजारो भारतीय शिक्षक इथिओपियात आले. त्यांनी आडिस अबाबा, दिरे दावा, बाहिर दार ते मेकेले येथे मुलांना शिक्षण दिले. ते इथिओपियाच्या शाळांमध्ये पोहोचले आणि इथिओपियन जनतेच्या हृदयात स्थान मिळवले. आजही अनेक इथिओपियन पालक ज्यांनी त्यांच्या मुलांचे भविष्य घडवले त्या भारतीय शिक्षकांविषयी बोलतात प्रेमाने.
ज्याप्रमाणे भारतीय शिक्षक येथे आले, त्याचप्रमाणे इथिओपियन विद्यार्थीदेखील ज्ञान आणि मैत्रीच्या शोधात भारतात गेले. ते तिथे विद्यार्थी म्हणून गेले आणि आधुनिक इथिओपियाचे निर्माते बनून मायदेशी परतले. मला सांगण्यात आले आहे की, त्यांच्यापैकी काही जण सध्या या संसदेत उपस्थित आहेत! ज्यामध्ये माननीय सभापती तागेसे चाफो यांचाही समावेश आहे.
त्यांनी आमच्या दोन्ही देशांतील लोकांमधील परस्परसंबंध दृढ करण्यात विशेष भूमिका बजावली आहे. कारण त्यांनी भारतीय लोकांना इथिओपियन खाद्यसंस्कृतीची ओळख करून दिली. भारतात आम्ही नाचणी आणि बाजरी यांसारखे 'श्री अन्न' धान्याचे पदार्थ खाण्याला पसंती देतो. त्यामुळे इथिओपियन 'टेफ'ची चव आम्हाला खूपच ओळखीची आणि सुखद वाटते. आणि, आम्हाला 'भारतीय थाळी' खायला आवडत असल्याने, इथिओपियन 'बेया-नैतू'देखील आम्हाला अगदी जवळचे वाटते.
माननीय सदस्यगण,
आज भारतीय कंपन्या इथिओपियामधील सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांनी वस्त्रोद्योग, उत्पादन, कृषी, आरोग्य आणि अशा विविध क्षेत्रांत पाच अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. तसेच, त्यांनी पंचाहत्तर हजारपेक्षा जास्त स्थानिक रोजगार निर्माण केले आहेत.
पण, आपल्या भागीदारीत अजूनही खूप मोठी क्षमता आहे, यावर आपले सर्वांचे एकमत होईल याची मला खात्री आहे. म्हणूनच, पंतप्रधान डॉ. अबी अहमद आणि मी काल एक मोठे पाऊल उचलले आहे. आम्ही आमचे द्विपक्षीय संबंध 'धोरणात्मक भागीदारी'च्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे तंत्रज्ञान, नवोन्मेष, खाणकाम, शाश्वत विकास आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांतील सहकार्याद्वारे आपल्या अर्थव्यवस्थांमधील अपार क्षमतेचा विकास होईल. तसेच, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा आणि क्षमता बांधणी यांमधील सहकार्यातून आपल्या दोन्ही देशांतील जनतेचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, आम्ही व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य, तसेच संरक्षण आणि सुरक्षासंबंधित विषयांवरील सहकार्यात देखील अधिक वाढ करू.
माननीय सदस्यगण,
विकसनशील देश म्हणून, आपल्याकडे एकमेकांकडून शिकण्यासारखे आणि एकमेकांना देण्यासारखे खूप काही आहे. कृषी क्षेत्र आपल्या दोन्ही राष्ट्रांचा कणा आहे. ते आपल्या जनतेचे पोट भरते. ते आपल्या शेतकऱ्यांना आधार देते. तसेच, ते परंपरेला नाविन्याशी जोडते. आपण दर्जेदार बियाणे, सिंचन व्यवस्था आणि मृदा-आरोग्य तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एकत्रितपणे काम करू शकतो.
हवामान बदल पाऊस आणि पीक चक्रावर परिणाम करत आहे, त्यामुळेच आपण हवामान-अनुकूल शेतीमधील ज्ञानाची परस्परांसोबत देवाणघेवाण करू शकतो. दुग्धव्यवसायापासून ते शेतीचे यांत्रिकीकरण, आणि बाजरी संशोधनापासून ते अन्नप्रक्रिया उद्योगापर्यंत, आपण एकत्रितपणे आपल्या शेतकऱ्यांना समृद्ध करण्यास मदत करू शकतो.
माननीय सदस्यगण,
भारतात आम्ही एक मजबूत 'डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारली आहे. यामुळे सेवा कशा पुरवल्या जातात आणि लोक त्या सेवांचा लाभ कसा घेतात, यामध्ये क्रांतिकारक बदल झाला आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिक पेमेंटसाठी, ओळखीच्या पुराव्यासाठी आणि सरकारी सेवांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. जगातील निम्म्याहून अधिक 'रिअल-टाइम' डिजिटल व्यवहार आता भारतात होतात.
कोणतीही गळती किंवा भ्रष्टाचार न होता, 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याचे कल्याणकारी लाभ थेट कोट्यवधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहोचले आहेत. दरवर्षी तीन वेळा, सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना एका बटणाच्या क्लिकवर आर्थिक मदत मिळते.
तुम्ही जेव्हा तुमचे 'डिजिटल इथिओपिया 2025' धोरण राबवत आहात, तेव्हा आम्ही आमचे कौशल्य आणि अनुभव इथिओपियासोबत सामायिक करण्यास तयार आहोत. तुमच्या परराष्ट्र मंत्रालयासाठी 'डेटा सेंटर' विकसित करण्यासाठी तुम्ही भारताची विश्वासू भागीदार म्हणून निवड केली, हा आमचा बहुमान आहे.
माननीय सदस्यगण,
भारत हा 'जगाचे औषधालय' म्हणून ओळखला जातो. कोविड महामारीच्या काळात संपूर्ण जग चिंतेत होते. तो अतिशय कठीण कालखंड होता. मर्यादित संसाधने असूनही, इतरांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व करणे हे आम्ही मानवतेप्रती आमचे पवित्र कर्तव्य मानले.
भारताने 150 हून अधिक देशांना औषधे आणि लसी पाठवल्या. इथिओपियाला 40 लाखाहून अधिक लसींच्या मात्रा पुरवणे ही भारतासाठी विशेष अभिमानाची बाब होती. इथिओपियाचे सुपुत्र आणि भारतात 'तुलसी भाई' म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर टेडरोस यांच्या नेतृत्वाखालील डब्लू.एच.ओ.च्या सहकार्याने हे कार्य करणे हे आमचे भाग्य होते.
औषधनिर्मितीपासून ते रुग्णालयांपर्यंत आणि पारंपरिक औषधांपासून ते टेलीमेडिसिनपर्यंत आपल्या आरोग्य सहकार्यात वाढ असल्याचा मला आनंद आहे. रुग्णालयांमध्ये नवीन उपकरणे पुरवण्यापासून ते आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या क्षमता बांधणीपर्यंत - आम्ही आमचे आरोग्य सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
माननीय सदस्यगण,
इथिओपिया हे आफ्रिकेमध्ये अतिशय मोक्याच्या स्थानावर वसलेले आहे. भारत हिंदी महासागराच्या केंद्रस्थानी आहे. प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये आपण नैसर्गिक भागीदार आहोत.
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या संरक्षण सहकार्य करारामुळे आपल्या परस्पर सुरक्षेची वचनबद्धता अधिक दृढ झाली आहे. हा करार प्रामुख्याने लष्करी सहकार्यावर लक्ष केंद्रित करतो. यामध्ये सायबर सुरक्षा, संरक्षण उद्योग, संयुक्त संशोधन आणि क्षमता बांधणी यांमधील सहकार्याचा समावेश आहे.
एप्रिलमध्ये पहेलगाम येथे भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इथिओपियाने जो पाठिंबा आणि एकजूट दर्शवली, त्याबद्दल मी या निमित्ताने आभार मानतो. तसेच, आमच्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाचे मनापासून स्वागत केल्याबद्दल आणि 'दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता' या भूमिकेचा पुनरुच्चार केल्याबद्दल मी आपले आभार मानतो
माननीय सदस्यगण,
उत्साहाचा संचार असलेल्या आणि वैविध्यपूर्ण लोकशाही देश म्हणून आपल्याला दोन्ही देशांना हे माहित आहे की, लोकशाही ही एक जीवनशैली आहे आणि तो एक प्रवास आहे. ती कधी चर्चेने, कधी मतभेदाने आकाराला येते, परंतु ती नेहमी कायद्याचे राज्य आणि लोकांच्या इच्छेवरील विश्वासावर टिकून असते.
आपल्या दोन्ही देशांच्या संविधानांमध्येही हीच भावना प्रतिबिंबित होते. भारताच्या संविधानाची सुरुवात "आम्ही, भारताचे लोक" या शब्दांनी होते. इथिओपियाच्या संविधानाची सुरुवात "आम्ही, इथिओपियाची राष्ट्रे, राष्ट्रीयता आणि लोक" या शब्दांनी होते. दोन्हींचा संदेश एकच आहे: आपले भविष्य आपल्या हातात आहे.
आज सकाळी, मला आदवा विजय स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्याचा सन्मान मिळाला. हे स्मारक या गोष्टीची एक चिरंतन आठवण करून देते की, इथिओपियाच्या विजयाने संपूर्ण वसाहतवादाखाली असलेल्या संपूर्ण जगाला सन्मान आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी कशी प्रेरणा दिली. संघर्ष आणि अनिश्चिततेच्या या काळात, ही स्मारक ग्लोबल साउथमधील लोक स्वतःसाठी उभे राहू शकतात, याचीही जाणीव करून देतात.
माननीय सदस्यगण,
महात्मा गांधींनी आपल्याला विश्वस्तपणाची संकल्पना दिली. या सुंदर वसुंधरेचे आणि त्यावर उपलब्ध संसाधनांचे आपण मालक नाही. त्याऐवजी, आपण केवळ विश्वस्त आहोत, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि ती आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवली पाहिजे. भारताच्या "एक पेड के मॉं के नाम " या उपक्रमाला मार्गदर्शन करणारी विश्वस्तपणाची भावना इथिओपियाच्या ‘ग्रीन लेगसी इनिशिएटिव्ह’मध्येही प्रतिबिंबित होते.
आपले दोन्ही देश धरतीमातेची काळजी घेण्यावर विश्वास ठेवतात, आणि सोबतच निसर्गाला परत देण्यावर विश्वास ठेवतात. चला, आपण एकत्र मिळून नवीकरणीय ऊर्जा आणि हरित रोजगारावर काम करूया. चला, आपण आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधा आणि जैव-इंधनावर काम करूया. चला, आपण हवामान न्यायासाठी एक बुलंद आवाज उठवूया. 2027 मध्ये COP-32 मध्ये ग्लोबल साउथचा एक प्रभावी आवाज देण्यासाठी इथिओपियाच्या प्रयत्नांना पाठिंबा देताना भारताला आनंदच होईल.
माननीय सदस्यगण,
मला सांगण्यात आले आहे की, इथिओपियामध्ये एक म्हण आहे, "जेव्हा कोळ्याची जाळी एकत्र येतात, तेव्हा ती सिंहालाही बांधू शकतात." भारतातही आमचा विश्वास आहे की, मन जुळले तर पर्वतही वाट देतात.
खरोखरच, एकता हीच शक्ती आहे आणि सहकार्य हीच ताकद आहे. आज, ग्लोबल साउथचे देश म्हणून, प्राचीन संस्कृती म्हणून, मित्र म्हणून, भारत आणि इथिओपिया खाद्याला खांदा लावून उभे आहेत. आपण एकाच कुटुंबाचे सदस्य म्हणून एकत्र उभे आहोत. आणि आम्ही अशा जगासाठी काम करतो जे अधिक न्याय्य, अधिक समान आणि अधिक शांततापूर्ण असेल.
येथेच, आदिस अबाबामध्ये, आफ्रिकन एकतेच्या स्वप्नांना घर मिळाले. मला सांगण्यात आले आहे की, या अद्भुत शहराच्या अनेक रस्त्यांना आफ्रिकन देशांची नावे देण्यात आली आहेत! हिंदी महासागराच्या पलीकडे, नवी दिल्लीत, भारताला जी-20 मध्ये आफ्रिकन युनियनचे स्थायी सदस्य म्हणून स्वागत करण्याचा सन्मान मिळाला. गेल्या वर्षी, ब्रिक्समध्ये इथिओपियाचा पूर्ण सदस्य म्हणून समावेश करून आम्ही आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकले.
खरे तर, माझ्या सरकारच्या गेल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात भारत आणि आफ्रिका यांच्यातील संबंध अनेक पटींनी दृढ झाले आहेत. या काळात, आम्ही राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुखांच्या स्तरावर 100 हून अधिक भेटीगाठी केल्या आहेत.
माननीय सदस्यगण,
ग्लोबल साऊथ आपले भविष्य स्वतः घडवत आहे. भारत आणि इथिओपिया या दोघांचीही त्यासाठीची समान दृष्टी आहे. आमची दृष्टी अशा जगाची आहे, जिथे ग्लोबल साऊथ कोणाच्याही विरोधात नव्हे, तर सर्वांसाठी उभा राहावा.
असे जग जिथे विकास न्याय्य असेल, जिथे तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध असेल आणि जिथे सार्वभौमत्वाचा आदर केला जाईल. असे जग जिथे समृद्धी वाटून घेतली जाईल आणि शांततेचे रक्षण केले जाईल. आणि, असे जग जिथे निर्णयप्रक्रियेत आजच्या वास्तवाचे प्रतिबिंब दिसेल, 1945 च्या जगाचे नव्हे. कारण, जर जगाची व्यवस्था भूतकाळातच अडकून राहिली, तर जग पुढे जाऊ शकत नाही.
म्हणूनच, भारताने 'ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्ट'वर भर दिला आहे. या करारात शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञान आदान प्रदान, परवडणारे वित्तपुरवठा, क्षमता विकास आणि व्यापाराला प्राधान्य दिले जाईल. म्हणूनच, नोव्हेंबरमध्ये झालेल्या जी-20 शिखर परिषदेत, मी दहा लाख प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी 'आफ्रिका स्किल्स मल्टिप्लायर इनिशिएटिव्ह'ची घोषणा केली. यामुळे उपक्रमामुळे स्थानिक क्षमतांचा विकास होईल तसेच सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने तुमच्या प्रयत्नांना बळ मिळेल.
माननीय सदस्यगण,
माझा चहाबरोबर असलेला वैयक्तिक संबंध सर्वश्रुत आहे. पण, इथिओपियामध्ये येऊन कॉफीचा उल्लेख न करणे अशक्य आहे! ती जगाला दिलेल्या तुमच्या सर्वात महान देण्यांपैकी एक आहे!
इथिओपियन कॉफी समारंभात लोक एकत्र बसतात, वेळ जणू मंदावतो आणि मैत्री अधिक घट्ट होते. भारतातही, चहाचा एक कप म्हणजे बोलण्याचे, अनुभवांचे आदान प्रदान करण्याचे, नाते जोडण्याचे आमंत्रण असते. आणि, इथिओपियन कॉफी आणि भारतीय चहाप्रमाणेच, आपली मैत्री अधिक घट्ट होत आहे!
आज मी तुमच्यासमोर, माझ्या बहिणी आणि भावांमध्ये, कृतज्ञतेच्या गहिऱ्या भावनेने आणि भविष्याबद्दल उज्ज्वल आशा घेऊन उभा आहे. भविष्य साद घालत आहे. त्याला प्रतिसाद देण्यासाठी भारत आणि इथिओपिया सज्ज आहेत.
माननीय सदस्यगण,
समारोप करताना, मी तुम्हाला वचन देतो की, आपण समानतेच्या आधारावर एकत्र चालणार आहोत. आपण भागीदार म्हणून एकत्र उभारणी करणार आहोत. आणि, आपण मित्र म्हणून एकत्र यशस्वी होणार आहोत.
या संसदेला संबोधित करण्याचा सन्मान दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मैत्रीबद्दल धन्यवाद. तुमच्या विश्वासाबद्दल धन्यवाद.
तब्बारकु
देना हुन्नु
आम सगनालो
धन्यवाद.
***
JaydeviPujariSwami/NitinGaikwad/ShaileshPatil/ShraddhaMukhedekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2205813)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam