पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय अंध महिला टी-20 विश्वचषक विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद


आव्हानांवर मात करून, आत्मविश्वासाने आपल्या क्रीडा प्रतिभेचे प्रदर्शन करणाऱ्या आणि राष्ट्राचा अभिमान असलेल्या या खेळाडूंची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

कठोर परिश्रमांमुळे क्रीडाक्षेत्राव्यतिरीक्त जीवनात इतर क्षेत्रातही यश मिळते : पंतप्रधान

सांघिक यशामुळे सर्वांनाच प्रेरणा मिळते, भारतातील तरुणांची ताकद आणि परिश्रम अधोरेखित होतात: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 28 NOV 2025 1:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 नोव्हेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील 7, लोक कल्याण मार्ग येथे भारतीय अंध महिला टी-20 विश्वचषक विजेत्यांशी संवाद साधला. मोदींनी खेळाडूंशी अतिशय जिव्हाळ्याने बातचीत केली.  त्यांच्या दृढनिश्चयाचे कौतुक  केले;  आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करत त्यांचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. कठोर परिश्रमाने पुढे जाणारे लोक केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर जीवनातील इतर क्षेत्रातही कधीच अपयशी ठरत नाहीत, यावर त्यांनी भर दिला. खेळाडूंनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे त्यांनी नमूद केले.ही 

संघभावना; एकता आणि राष्ट्रीय अभिमानाची मूल्ये प्रतिबिंबित करते, असे निरीक्षण ‘वंदे मातरम’च्या दीडशे वर्षांपासून असलेल्या  महत्त्वावर प्रकाश टाकत  मोदी यांनी नोंदवले. त्यांनी भक्तीगीते गाणाऱ्या समुहातील एका गायिकेच्या संगीत प्रतिभेचे कौतुक करत  तिचे काशीशी असलेले नाते आणि पंतप्रधानांचे त्यांचे स्वतःचे काशीशी असलेले नाते  अधोरेखित केले.

ज्याप्रमाणे राजकारणात व्यक्ती; आमदार किंवा खासदार, मंत्री, अशा वेगवेगळ्या भूमिका निभावतात, त्याचप्रमाणे खेळाडू देखील अष्टपैलू भूमिका बजावत असतात, असे भाष्य पंतप्रधानांनी संघाच्या बहुविध  प्रतिभेची तुलना राजकारणाशी करत, खेळीमेळीने चाललेल्या या संवादात केले.

यावेळी खेळाडूंनी सामाजिक पूर्वग्रह आणि कौटुंबिक अडचणींसह आव्हानांवर मात करण्याचे वैयक्तिक अनुभव सांगितले. एका खेळाडूने, तिच्या दिवंगत वडिलांचे ती यशस्वी झालेली पाहण्याच्या स्वप्नाचे स्मरण केले आणि पंतप्रधानांना भेटल्याने ते स्वप्न पूर्ण झाले आहे,अशी मनिषा व्यक्त केली.

खेळाडूंचे हे यश केवळ दिव्यांगांसाठीच नाही तर भारतातील सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधानांनी  नमूद केले. त्यांच्या कामगिरीतून भारतातील तरुणांची ताकद आणि चिकाटी यांचे दर्शन होते, यावर पंतप्रधानांनी  भर दिला. एक देश आपल्या मुलांसह अशा धैर्याने आणि दृढनिश्चयाने पुढे जात आहे याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला शुभेच्छा देऊन या सुसंवादाचा समारोप केला, जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यात आणि  समर्पित  भावनेने  इतरांना प्रेरित करण्याच्या खेळाडूंच्या भूमिकेची त्यांनी खूप कौतुक केले.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2195769) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Kannada , Malayalam