इफ्फीमध्ये प्रख्यात सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली आणि स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकिट प्रकाशित करण्यात आले
के. वैकुंठ हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या कॅमेऱ्याने क्लासिकल हिंदी चित्रपटाच्या दृश्य भाषेला आकार दिला: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री गोवा
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) ने आज गोव्याचे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ यांची जन्मशताब्दी साजरी केली आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक टपाल तिकिट जारी करून भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या असाधारण योगदानाचा गौरव केला.
फिल्म्स डिव्हिजन साठी प्रसिद्ध कलाकृतींसह अनेक ऐतिहासिक चित्रपट आणि माहितीपटांमधील उत्कृष्ट छायांकनासाठी ओळखले जाणारे वैकुंठ हे भारतातील सर्वोत्तम दृश्य कथाकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात ज्यांचा वारसा चित्रपट निर्मात्यांच्या अनेक पिढयांना प्रेरणा देत आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार दीपक नारायण, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात, महाराष्ट्र आणि गोवा चे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह आणि के. वैकुंठ यांचे पुत्र अमित कुंकोलीयेंकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या टपाल तिकिटाचे औपचारिक प्रकाशन केले.
उपस्थितांना संबोधित करताना डॉ. सावंत यांनी छायाचित्रण कलेप्रति वैकुंठ यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाची प्रशंसा केली आणि त्यांचे वर्णन "ज्यांच्या कॅमेऱ्याने क्लासिकल हिंदी चित्रपटाच्या दृश्य भाषेला आकार दिला " अशा शब्दांत केले.
त्यांनी अधोरेखित केले की वैकुंठ गोव्यातील मडगावच्या गल्लीबोळातून बाहेर पडून भारतातील सर्वात आदरणीय सिनेमॅटोग्राफरपैकी एक बनले, त्यांनी गुलजार आणि रमेश सिप्पी यांच्यासारख्या दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत एकत्र काम केले आणि सीता और गीता आणि आंधी सारख्या प्रतिष्ठित चित्रपटांमध्ये योगदान दिले.

वैकुंठ हे केवळ छायाचित्रकार नव्हते. ते भावना, वातावरण आणि दृश्याचे सर्जक होते, असे डॉ. सावंत यांनी सांगितले, त्यांची अनोखी शैली भव्य सिनेमा दृश्यांपेक्षा मानवी भावना अत्यंत सुंदर प्रकारे टिपत असे . भारतीय चित्रपटसृष्टीतील काही अविस्मरणीय दृश्यरचना घडवूनही ते आयुष्यभर अत्यंत नम्र आणि प्रसिद्धीपासून दूर राहिले, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांचा वारसा जगभरातील चित्रपट प्रेमींना प्रेरणा देत आहे, असे सावंत म्हणाले.
माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात म्हणाले की, भारताचे विख्यात छायाचित्रकार आणि भूमिपुत्र असलेल्या के. वैकुंठ यांना सन्मानित करणे, ही माझ्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे. स्मारक टपाल तिकीट हे केवळ एक टपाल तिकीट नसून, ते जीवन आणि कार्यगौरवाची कथा संपूर्ण देशातील घराघरांत आणि संस्थांमध्ये पोहोचवणारे एक प्रकारचे स्मरणचिन्ह असते. या प्रकाशनाने वैकुंठ यांचे अविस्मरणीय योगदान राष्ट्राच्या दृश्य-अभिलेखांत चिरंतन कोरले गेले आहे, असे त्यांनी सांगितले.

उपस्थितांचे स्वागत करताना महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य टपालअधिक्षक अमिताभ सिंह म्हणाले की, हे स्मरणार्थ टपाल तिकीट हे फक्त एक टपालचिन्ह नसून, देशाच्या इतिहासाचा व संस्कृतीचा वारसा जनतेपर्यंत पोहोचवणारे एक सन्मानचिन्ह आहे. या तिकीटाच्या माध्यमातून के. वैकुंठ यांचे जीवन व योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

समारोप प्रसंगी वैकुंठ यांचा 17 मिनिटांचा इंग्रजी माहितीपट “गोवा मार्चेस ऑन" हा दाखवण्यात आला. या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्या कलात्मक दृष्टीची, तांत्रिक कौशल्याची आणि गोव्यावरील त्यांच्या गाढ प्रेमाची छटा अनुभवता आली.
For more information, Click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2195646
| Visitor Counter:
8