पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला संबोधित केले
श्री गुरु तेग बहादूर जी यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे इतिहासात दुर्मीळ आहेत; गुरु साहेबांचे जीवन, बलिदान आणि चरित्र्य हा प्रेरणाचा एक गहन स्रोत आहे; मुघल आक्रमणांच्या काळात गुरु साहेबांनी शौर्य आणि पराक्रमाचा आदर्श प्रस्थापित केला: पंतप्रधान
आपल्या गुरूंची परंपरा आपल्या राष्ट्राचे चरित्र्य, आपली संस्कृती आणि आपल्या मूलभूत आत्म्याचा आधारस्तंभ आहे: पंतप्रधान
काही काळापूर्वी, जेव्हा गुरु ग्रंथ साहिबच्या तीन मूळ प्रती अफगाणिस्तानातून भारतात आल्या, तेव्हा तो प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण ठरला होता: पंतप्रधान
कर्तारपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण करणे असो, हेमकुंड साहिब येथे रोपवे प्रकल्पाचे बांधकाम असो, किंवा आनंदपूर साहिब येथील विरासत-ए-खालसा संग्रहालयाचा विस्तार असो आमच्या सरकारने गुरूंच्या प्रत्येक पवित्र स्थळाला आधुनिक भारताच्या दृष्टिकोनाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि गुरूंच्या गौरवशाली परंपरेतून प्रेरणा घेऊन संपूर्ण श्रद्धेने या सर्व उपक्रमांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे: पंतप्रधान
शूर साहिबजाद्यांशीही मुघलांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा कशा ओलांडल्या, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. साहिबजाद्यांनी जिवंत भिंतीत गाडले जाणे स्वीकारले, तरीही त्यांनी आपले कर्तव्य किंवा श्रद्धेचा मार्ग कधीही सोडला नाही. या आदर्शांच्या सन्मानार्थ, आम्ही आता दरवर्षी 26 डिसेंबर रोजी 'वीर बाल दिवस' साजरा करतो: पंतप्रधान
मागील महिन्यात, एका पवित्र यात्रेचा भाग म्हणून, गुरु महाराजांचे आदरणीय 'जोडा साहिब' दिल्लीहून पटना साहिबपर्यंत नेण्यात आले. तिथे मलाही या पवित्र अवशेषांपुढे नतमस्तक होण्याची संधी मिळाली. ही सेवा करण्याची, स्वतःला समर्पित करण्याची आणि या पवित्र वारशाशी जोडले जाण्याची संधी गुरूंच्या विशेष कृपेमुळे मिळाली,असे मी मानतो: पंतप्रधान
अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे आपल्या अनेक तरुणांची स्वप्ने मोठ्या संकटात सापडली आहेत. हे संकट मुळापासून नष्ट करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; ही समाज आणि कुटुंबांचीही लढाई आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा' निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, आजचा दिवस भारताच्या वारशाचा एक उल्लेखनीय संगम आहे. सकाळी ते रामायणाची नगरी असलेल्या अयोध्येत होते आणि आता ते गीतेची नगरी असलेल्या कुरुक्षेत्रात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त सर्वजण त्यांना आदरांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात संत आणि आदरणीय समुदायाच्या उपस्थितीची दखल घेतली आणि सर्वांना आदराने वंदन केले.
5–6 वर्षांपूर्वी आणखी एक उल्लेखनीय योगायोग घडला होता, याची आठवण करून देत मोदींनी यावर प्रकाश टाकला की, 9 नोव्हेंबर 2019 रोजी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निकाल दिला, तेव्हा ते कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी डेरा बाबा नानक येथे उपस्थित होते. त्या दिवशी राम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा व्हावा आणि कोट्यवधी रामभक्तांची आकांक्षा पूर्ण व्हावी, यासाठी मी प्रार्थना करत होतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्याच दिवशी राम मंदिराच्या बाजूने निकाल आल्याने सर्वांच्या प्रार्थनेला फळ मिळाले, असे त्यांनी सांगितले. आता जेव्हा अयोध्येत धर्म ध्वज स्थापित झाला आहे, तेव्हा त्यांना पुन्हा एकदा शीख संगतकडून आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
मोदी यांनी नमूद केले की, काही वेळापूर्वी कुरुक्षेत्रच्या भूमीवर 'पंचजन्य स्मारक'चे उद्घाटन करण्यात आले . त्यांनी अधोरेखित केले की याच भूमीवर भगवान श्रीकृष्णाने सत्य आणि न्यायाचे रक्षण हे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे घोषित केले होते. कृष्णाचे शब्द उद्धृत करत मोदी म्हणाले की, सत्याच्या मार्गासाठी आणि कर्तव्यासाठी आपले जीवन देणे हे सर्वोच्च आहे. ते म्हणाले की, श्री गुरु तेग बहादूर जी यांनीही सत्य, न्याय आणि श्रद्धेचे रक्षण करणे हा आपला धर्म मानला आणि त्यांनी आपल्या जीवनाचे बलिदान देऊन या धर्माचे पालन केले. या ऐतिहासिक प्रसंगी, केंद्र सरकारला श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या चरणी एक स्मारक टपाल तिकिट आणि एक विशेष नाणे समर्पित करण्याचे भाग्य लाभले आहे. पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली की सरकार अशाच प्रकारे गुरु परंपरेची सेवा पुढेही सुरू ठेवेल.
पंतप्रधान म्हणाले की कुरुक्षेत्रची पवित्र भूमी ही शीख परंपरेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्यांनी अधोरेखित केले की शीख परंपरेतील बहुतांश सर्व गुरूंनी त्यांच्या पवित्र यात्रेदरम्यान या भूमीला भेट दिली होती. त्यांनी आठवण करून दिली की जेव्हा नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर जी या पवित्र भूमीवर आले तेव्हा त्यांनी दृढ तपश्चर्या आणि निर्भय साहसाची गहिरी छाप सोडली.
"श्री गुरु तेग बहादूर जी यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे इतिहासात दुर्मिळ आहेत आणि त्यांचे जीवन, त्याग आणि चारित्र्य कायमच प्रेरणेचा मोठा स्रोत राहिले आहे", असे मोदी म्हणाले. मुघल आक्रमणांच्या काळात गुरु साहिबांनी शौर्याचा आदर्श समोर ठेवला यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या हौतात्म्यापूर्वी, मुघल आक्रमकांकडून काश्मिरी हिंदूंना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात होते. या संकटात, अत्याचार झालेल्यांच्या एका गटाने गुरु साहिबांकडे पाठिंबा मागितला. पंतप्रधानांनी आठवण सांगितली की गुरु साहिबांनी त्यांना औरंगजेबाला स्पष्टपणे कळवण्यास सांगितले होते की जर श्री गुरु तेग बहादूर यांनी स्वतः इस्लाम धर्म स्वीकारला तर ते देखील धर्म स्वीकारतील.
मोदी म्हणाले की हे शब्द श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या निर्भयतेचा परमोच्च बिंदू प्रतिबिंबित करतात. ते म्हणाले की ज्याची भीती होती तेच शेवटी घडले, कारण क्रूर औरंगजेबाने गुरु साहिबांना कैद करण्याचा आदेश दिला, परंतु गुरु साहिबांनी स्वतः दिल्लीला जाण्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की मुघल शासकांनी त्यांना प्रलोभनांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, तरीही श्री गुरु तेग बहादूर दृढ राहिले आणि आपल्या विचारांशी आणि तत्त्वांशी तडजोड करण्यास नकार दिला. त्यांचा संकल्प मोडण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या मार्गापासून अन्यत्र वळवण्यासाठी, मुघलांनी त्यांच्या तीन साथीदारांना - भाई दयाला जी, भाई सती दास जी आणि भाई मती दास जी - यांना त्यांच्या डोळ्यांसमोर क्रूरपणे फाशी दिली. पंतप्रधानांनी नमूद केले की तरीही गुरु साहिब डगमगले नाहीत , त्यांचा दृढनिश्चय अढळ राहिला. त्यांनी अधोरेखित केले की गुरु साहिबांनी धर्माचा मार्ग सोडला नाही आणि खोल ध्यानाच्या स्थितीत श्रद्धेच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले.
पंतप्रधान म्हणाले की, मुघल एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी गुरु महाराजांच्या पवित्र मस्तकाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अधोरेखित केले की भाई जैताजींनी शौर्य दाखवत गुरुंचे शीर आनंदपूर साहिबला नेले. पंतप्रधानांनी श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या शब्दांचे स्मरण केले , त्याचा अर्थ होता श्रद्धेचा पवित्र तिलक जपला गेला, लोकांच्या श्रद्धा अत्याचारापासून संरक्षित झाल्या आणि त्यासाठी गुरु साहिबांनी सर्वस्व अर्पण केले.
आज, गुरु साहिबांच्या बलिदानाची ही भूमी दिल्लीचे शीशगंज गुरुद्वारा म्हणून उभी आहे, हे प्रेरणास्थान आहे,असे सांगत मोदींनी भर दिला की आनंदपूर साहिबची तीर्थयात्रा ही आपल्या राष्ट्रीय चेतनेचे शक्ती केंद्र आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की आज जो भारत समोर आहे ते गुरु साहिबसारख्या युगपुरुषांच्या त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. त्यांनी अधोरेखित केले की या सर्वोच्च बलिदानामुळेच श्री गुरु तेग बहादूर साहिब यांना 'हिंद दी चादर' म्हणून पूजनीय मानले जाते.
"आपल्या गुरुंची परंपरा देशाच्या चारित्र्याचा, संस्कृतीचा आणि मूळ चैतन्याचा पाया रचणारी आहे", असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले. गेल्या 11 वर्षात सरकारने या पवित्र परंपरा आणि प्रत्येक शीख उत्सवाला राष्ट्रीय सण म्हणून स्थापित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, त्यांच्या सरकारला श्री गुरु नानक देव जी यांचे 550 वे प्रकाश पर्व, श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे 400 वे प्रकाश पर्व आणि श्री गुरु गोविंद सिंह जी यांचे 350 वे प्रकाश पर्व हे भारताच्या एकता आणि अखंडतेचे सण म्हणून साजरे करण्याचे सद्भाग्य मिळाले आहे. त्यांनी नमूद केले की, देशभरातील लोक त्यांच्या श्रद्धा, परंपरा आणि श्रद्धेच्या पलीकडे जाऊन या उत्सवांमध्ये सहभागी झाले आहेत.
गुरुंशी संबंधित पवित्र स्थळांना सर्वात भव्य आणि दिव्य स्वरूप देण्याचा सद्भाग्य त्यांच्या सरकारला मिळाला आहे , असे अधोरेखित करून, पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दशकात असे अनेक प्रसंग आले आहेत, ज्यावेळी ते स्वतः गुरू परंपरेशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. काही काळापूर्वी ज्यावेळी गुरू ग्रंथ साहिबचे तीन मूळ रूप अफगाणिस्तानातून भारतात आले, ही घटना प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण बनली, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.
सरकारने गुरुंच्या प्रत्येक तीर्थस्थळाला आधुनिक भारताच्या दृष्टिकोनाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे, यावर भर देवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, कर्तारपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण करणे असो, हेमकुंड साहिब येथे रोपवे प्रकल्प बांधणे असो किंवा आनंदपूर साहिब येथील विरासत-ए-खालसा संग्रहालयाचा विस्तार असो, ही सर्व कामे गुरूंच्या गौरवशाली परंपरेला मार्गदर्शक आदर्श म्हणून ठेवून पूर्ण भक्तीने हाती घेण्यात आली आहेत.
शूर साहिबजादांसोबतही मुघलांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा कशा ओलांडल्या, हे सर्वांना माहिती असल्याचे सांगून, साहिबजादांनी जिवंत चिरडले जाणे स्वीकारले परंतु त्यांनी त्यांचे कर्तव्य किंवा श्रद्धेचा मार्ग सोडला नाही, ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधानांनी सांगितले की, या आदर्शांच्या सन्मानार्थ, दरवर्षी 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जातो. सेवा, धैर्य आणि सत्याचे आदर्श नवीन पिढीच्या विचारसरणीचा पाया बनले पाहिजेत, यासाठी सरकारने शीख परंपरेचा इतिहास आणि गुरूंच्या शिकवणींचा राष्ट्रीय अभ्यासक्रमात समावेश केला आहे यावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी असा विश्वास व्यक्त केला की,प्रत्येकाने 'जोडा साहिब'चे पवित्र दर्शन घेतले असेल. आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी त्यांच्याशी पहिल्यांदाच या महत्त्वाच्या अवशेषांबद्दल चर्चा केली, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या कुटुंबाने गुरु गोविंद सिंग जी आणि माता साहिब कौर जी यांचे पवित्र 'जोडा साहिब' जवळजवळ तीनशे वर्षांपासून जतन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की,आता हा पवित्र वारसा देशभरातील आणि जगभरातील शीख समुदायाला समर्पित केला जात आहे. त्यानंतर, पवित्र 'जोडा साहिब'ची पूर्ण आदर आणि सन्मानाने वैज्ञानिक तपासणी करण्यात आली जेणेकरून ते भविष्यातील पिढ्यांसाठी जतन करता येईल. सर्व तथ्ये लक्षात घेऊन, पवित्र 'जोडा साहिब' तख्त श्री पटना साहिबला समर्पित करण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आला. कारण तिथेच गुरु महाराजांनी त्यांच्या बालपणाचा एक महत्त्वाचा कालखंड व्यतीत केला होता. पंतप्रधानांनी असे नमूद केले की, गेल्या महिन्यात एका पवित्र प्रवासाचा भाग म्हणून, आदरणीय 'जोडा साहिब' दिल्लीहून पटना साहिबला नेण्यात आले आणि तेथे त्यांनाही त्यांच्यासमोर माथा टेकवण्याची संधी मिळाली. सेवा, समर्पण आणि या पवित्र वारशाशी जोडण्याची ही संधी आपल्याला मिळाली ही गोष्ट म्हणजे त्या गुरुंची विशेष कृपा आपण मानतो.
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांची स्मृती आपल्याला भारताची संस्कृती किती विशाल, उदार आणि मानवता-केंद्रित आहे , हे शिकवते हे लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु साहेबांनी त्यांच्या आयुष्यात ‘सरबत दा भला’ चा मंत्र प्रमाणित केला, यावर प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी सांगितले की, आजचा कार्यक्रम केवळ या आठवणी आणि मिळालेल्या शिकवणीचा सन्मान करण्याचा क्षण नाही तर,आपल्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठीही एक महत्त्वाची प्रेरणा आहे. त्यांनी गुरु साहेबांच्या शिकवणीचे स्मरण करताना सांगितले की, जो प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर राहतो, तोच खरा ज्ञानी आणि खरा साधक असतो.
या प्रेरणेतून आपण प्रत्येक आव्हानावर मात केली पाहिजे आणि आपल्या राष्ट्राला पुढे नेत भारताला विकसित राष्ट्र बनवले पाहिजे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
गुरुसाहेबांनी आपल्याला हे देखील शिकवले की आपण कोणालाही घाबरवू नये किंवा आपणही कोणाच्या भीतीत जगू नये, असे पंतप्रधान म्हणाले. ही निर्भयता समाज आणि राष्ट्राला अधिक बळकट करते आणि आजचा भारतही याच तत्त्वावर चालतो, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की भारत जगाला बंधुत्वाचा संदेश देतो आणि त्याचबरोबर आपल्या सीमांचे रक्षणही करतो. भारत शांतता इच्छित असला तरी तो कधीही आपल्या सुरक्षेशी तडजोड करत नाही, ऑपरेशन सिंदूर हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. संपूर्ण जगाने पाहिले आहे की नवीन भारत घाबरत नाही, थांबत नाही किंवा दहशतवादापुढे झुकत नाही, हे त्यांनी अधोरेखित केले. आजचा भारत पूर्ण ताकदीने, धैर्याने आणि स्पष्टतेने पुढे जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी नमूद केले की या महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला समाज आणि तरुणांशी संबंधित विषयावर बोलायचे आहे, जो गुरुसाहेबांसाठी देखील चिंतेचा विषय होता - तो म्हणजे व्यसन आणि अंमली पदार्थांचा मुद्दा.व्यसनाने अनेक तरुणांच्या स्वप्नांना मातीमोल केले आहे, असे ते म्हणाले. सरकार या समस्येला मुळापासून नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु ही समाज आणि कुटुंबांची देखील लढाई आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. अशा वेळी, श्री गुरु तेग बहादूर साहिब यांची शिकवण प्रेरणा आणि उपाय दोन्ही म्हणून काम करते असे त्यांनी नमूद केले. जेव्हा गुरु साहेबांनी आनंदपूर साहिब येथून आपला प्रवास सुरू केला तेव्हा त्यांनी अनेक गावे संगतशी जोडली, ज्यामुळे भक्ती आणि श्रद्धेचा विस्तार झाला तसेच समाजाचे आचरणात सकारात्मक बदल घडले, याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. या गावातील लोकांनी सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांच्या लागवडीचा त्याग केला आणि आपले भविष्य गुरु साहेबांच्या चरणी समर्पित केले, अशी माहिती त्यांनी दिली. गुरु महाराजांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करून, जर समाज, कुटुंबे आणि तरुणांनी एकत्रित येऊन व्यसनांविरुद्ध निर्णायक लढा दिला तर ही समस्या मुळापासून नष्ट होऊ शकते, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
श्री गुरु तेग बहादूर साहिब यांची शिकवण आपल्या वर्तनातील शांतता, आपल्या धोरणांमधील संतुलनाचा आणि आपल्या समाजातील विश्वासाचा पाया बनली पाहिजे आणि हेच या प्रसंगाचे सार आहे, असेही त्यांनी सांगितले. देशभरात श्री गुरु तेग बहादूर यांचा शहीद दिन ज्या पद्धतीने साजरा केला जात आहे त्यावरून गुरुंची शिकवण आजही समाजाच्या मनात किती जिवंत आहे हे दिसून येते यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की, या भावनेने, हे उत्सव तरुणांना भारताला पुढे नेण्यासाठी अर्थपूर्ण प्रेरणा देतील. शेवटी पंतप्रधानांनी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या.
हरियाणाचे राज्यपाल आशिम कुमार घोष, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, राव इंद्रजीत सिंह, कृष्ण पाल यांच्यासह इतर मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी भगवान कृष्णांच्या पवित्र शंखाच्या सन्मानार्थ उभारलेल्या 'पंचजन्य' या नव्याने बांधलेल्या संरचनेचे उद्घाटन केले. त्यानंतर,महाभारत अनुभव केंद्राला त्यांनी भेट दिली. जिथे महाभारतातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे चित्रण केले आहे, ज्यातून त्यांचे शाश्वत सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित होते.
पंतप्रधानांनी नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीद दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी आदरणीय गुरुंच्या 350 व्या शहीद दिनानिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीद दिनानिमित्त भारत सरकार वर्षभर स्मरणोत्सव साजरा करत आहे.
निलीमा चितळे/आशिष सांगळे/शैलेश पाटील/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2194403)
आगंतुक पटल : 5