पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी केले अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाला संबोधित


आज संपूर्ण देश आणि संपूर्ण जग प्रभू श्री रामाच्या भावनेने भरलेले आहे: पंतप्रधान

हा धर्म ध्वज केवळ एक झेंडा नाही, तर तो भारतीय सभ्यतेच्या पुनरुत्थानाचा ध्वज आहे: पंतप्रधान

अयोध्या ही अशी भूमी आहे जिथे आदर्शांचे रुपांतर आचरणात होते: पंतप्रधान

राम मंदिराचे हे दिव्य आवार भारताच्या सामूहिक शक्तीचे चेतनेचे ठिकाणही बनत आहे: पंतप्रधान

आमचे राम भेदांमधून नाही, तर भावनांमधून लोकांना जोडतात: पंतप्रधान

आपण एक सचेतन समाज आहोत आणि येणारी दशके आणि शतके लक्षात घेऊन दूरदृष्टीने काम केले पाहिजे: पंतप्रधान

राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे शिस्त आणि राम म्हणजे जीवनातील सर्वोच्च चारित्र्य: पंतप्रधान

राम केवळ एक व्यक्ती नाही, तर राम एक मूल्य, एक शिस्त आणि एक दिशा आहेत: पंतप्रधान

जर भारताला 2047 सालापर्यंत विकसित करायचे असेल आणि समाजाचे सक्षमीकरण करायचे असेल, तर आपण आपल्या आतमध्ये असलेले 'राम' जागृत केले पाहिजेत: पंतप्रधान

राष्ट्राने पुढे जाण्यासाठी, त्याने आपल्या वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे: पंतप्रधान

येत्या दहा वर्षांत, भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करणे हे आपले ध्येय असले पाहिजे: पंतप्रधान

भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाही आपल्या डीएनए मध्ये आहेः पंतप्रधान

विकसित भारताच्या दिशेने असलेला प्रवास गतिमान करण्यासाठी, आपल्याला एका रथाची आवश्यकता आहे, ज्याची चाके शौर्य आणि संयम आहेत, ज्याचा ध्वज सत्य आणि उत्कृष्ट आचरण आहे, ज्याचे घोडे सामर्थ्य, विवेक, संयम आणि परोपकार आहेत आणि ज्याचे लगाम क्षमा, करुणा आणि समता आहेत: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 25 NOV 2025 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025

देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भूमीत एका संस्मरणीय घटनेची नोंद करत, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील पवित्र श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवला. ध्वजारोहण उत्सव मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि सांस्कृतिक उत्सव तसेच राष्ट्रीय एकतेच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे प्रतीक आहे. 

या प्रसंगी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज अयोध्या नगरी भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या आणखी एका शिखराचा अनुभव घेत आहे. “आज संपूर्ण भारत आणि संपूर्ण जग प्रभू श्री रामाच्या भावनेने भरलेले आहे,” असे मोदी यांनी नमूद केले, आणि प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात एक अद्वितीय समाधान, अमर्याद कृतज्ञता आणि प्रचंड अलौकिक आनंद भरलेला असल्याचे अधोरेखित केले. शतकानुशतके कायम राहिलेल्या जखमा आता बऱ्या होत आहेत, शतकानुशतकांचा वेदनादायक काळ संपत आहे आणि शतकांचे संकल्प आज पूर्ण होत आहेत, यावर त्यांनी भर दिला. ही एका यज्ञाची सांगता आहे, ज्याचा अग्नी 500 वर्षे प्रज्वलित राहिला, एक असा यज्ञ जो श्रद्धेमध्ये कधीही डगमगला नाही आणि  एका क्षणाकरिताही विश्वास ढळला झाला नाही, अशी घोषणा त्यांनी केली. आज प्रभू श्री रामाच्या गाभाऱ्याची अनंत ऊर्जा आणि श्री राम परिवाराचे दिव्य वैभव या धर्म ध्वजाच्या रूपात सर्वात दिव्य आणि भव्य मंदिरात स्थापित झाले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

“हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही;  तर भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे”, असे स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला की, त्याचा भगवा रंग, त्यावर कोरलेले सूर्यवंशाचे वैभव, चित्रीत केलेले पवित्र ओम आणि कोरलेले कोविदार म्हणजेच कांचन  वृक्षाची आकृती, या सर्व गोष्‍टी   रामराज्याच्या महानतेचे प्रतीक आहेत. पंतप्रधान मोदी ध्‍वजाविषयी पुढे म्हणाले,हा ध्वज संकल्प आहे, हा ध्वज यश आहे, हा ध्वज संघर्षातून निर्मितीची गाथा आहे, हा ध्वज शतकानुशतके पुढे नेलेल्या स्वप्नांचे मूर्त स्वरूप आहे आणि हा ध्वज संतांच्या तपश्चर्येचा आणि समाजाच्या सहभागाविषयीची  अर्थपूर्ण पराकाष्ठा आहे.

येणारी शतकानुशतके आणि सहस्रकापर्यंत, हा धर्मध्वज भगवान रामांच्या आदर्शांचा आणि तत्त्वांचा उद्घोष करेल, असे घोषित करून पंतप्रधान  मोदी यांनी यावर भर दिला की, हा विजय केवळ सत्याचा आहे, असत्याचा नाही. त्यांनी अधोरेखित केले की,सत्य स्वतः ब्रह्माचे रूप आहे आणि सत्यातच धर्म स्थापित आहे. हा धर्मध्वजाच्या प्रेरणेने जे बोलले जाते ते पूर्ण केले पाहिजे, अशा संकल्पाला प्रोत्साहन मिळेल. ते पुढे म्हणाले की,जगात कर्म आणि कर्तव्याला प्राधान्य असले पाहिजे असा संदेश या धर्मध्‍वजामधून मिळत आहे. या धर्मध्‍वजाकडे कोणत्याही प्रकारचा   भेदभाव नाही  आणि दुःखापासून मुक्तता आहे त्याचबरोबर समाजात शांती आणि आनंदाचा भाव फुलला आहे. त्यांनी भर दिला की, या  धर्मध्वजाबरोबर एक संकल्प करायचा आहे, त्यानुसार  आपल्याला असा समाज निर्माण करण्याचा आहे की, जिथे गरिबी नाही आणि कोणीही दुःखी किंवा असहाय्य नाही.

आपल्या धर्मग्रंथांची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र  मोदी म्हणाले की,  जे लोक कोणत्याही कारणास्तव मंदिरात येऊ शकत नाहीत परंतु त्याच्या ध्वजापुढे नतमस्तक होतात त्यांनाही समान पुण्य प्राप्त होते. हा धर्मध्वज मंदिराच्या उद्देशाचे प्रतीक आहे आणि दूरवरून तो भगवान श्री रामांच्या आज्ञा आणि प्रेरणा मानवतेला युगानुयुगे घेऊन जात असताना राम लल्लाच्या जन्मस्थानाचे दर्शन देईल. या अविस्मरणीय आणि अद्वितीय प्रसंगी त्यांनी जगभरातील कोट्यवधी रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्व भक्तांना नमन केले आणि राम मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या प्रत्येक दात्याचे आभार मानले. त्यांनी मंदिराच्या बांधकामाशी संबंधित प्रत्येक कामगार, प्रत्येक कारागीर, प्रत्येक योजनाकार आणि प्रत्येक वास्तुविशारदाला वंदन केले.

"अयोध्या ही अशी भूमी आहे जिथे आदर्श हे  आचरणामध्‍ये  रूपांतरित होतात", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. श्री रामांनी आपल्या जीवनाचा प्रवास जिथून सुरू केला ते हे शहर आहे. अयोध्येने जगाला दाखवून दिले की,  समाजाच्या ताकदीद्वारे आणि त्याच्या मूल्यांद्वारे एक व्यक्ती पुरुषोत्तम कशी बनते. त्यांनी आठवण करून हदिली की जेव्हा श्री राम अयोध्या सोडून वनवासासाठी गेले त्यावेळी  ते युवराज राम होते, परंतु ज्यावेळी  ते परतले तेव्हा ते 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून परतले. श्री रामांच्या मर्यादा पुरुषोत्तम बनण्यात महर्षी वसिष्ठांचे ज्ञान, महर्षी विश्वामित्रांची दीक्षा, महर्षी अगस्त्य यांचे मार्गदर्शन, निषादराजांची मैत्री,माता  शबरीचा स्नेह आणि भक्त हनुमानाची भक्ती या सर्वांनी महत्त्वपूर्ण  भूमिका बजावली.

विकसित भारताच्या उभारणीसाठी समाजाची सामूहिक शक्ती आवश्यक आहे, यावर भर देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला की, राम मंदिराचे भव्य- दिव्य प्रांगण- परिसर हे  भारताच्या सामूहिक शक्तीचे चेतनास्थळ बनत आहे. त्यांनी अधोरेखित केले की,येथे सात मंदिरे बांधली गेली आहेत, ज्यात आदिवासी समुदायाचे प्रेम आणि  त्याच्या आदरातिथ्य परंपरांचे प्रतीक असलेल्या माता शबरीच्या मंदिराचाही समावेश आहे.

पंतप्रधानांनी निषादराज मंदिराचाही उल्लेख केला, जे साधनांची नव्हे तर उद्देशाची आणि त्याच्या भावनेची पूजा करणाऱ्या मैत्रीचे साक्षीदार आहे. इथे  एकाच  ठिकाणी माता अहिल्या , महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य आणि संत तुलसीदास आहेत जे  राम लल्ला यांच्यासोबत भक्तांना दर्शन देतात असे त्यांनी नमूद केले. त्यांनी जटायू जी आणि खारीच्या पुतळ्यांचा देखील उल्लेख केला, जे महान संकल्प साध्य करण्यासाठी अगदी छोट्यातील छोट्या  प्रयत्नांचेही महत्त्व दर्शवतात. त्यांनी प्रत्येक नागरिकाला आवाहन केले की जेव्हा कधी  ते राम मंदिराला भेट देतील तेव्हा त्यांनी या सात मंदिरांनाही भेट द्यावी . त्यांनी अधोरेखित केले की ही मंदिरे आपली श्रद्धा बळकट करण्यासोबतच मैत्री, कर्तव्य आणि सामाजिक सौहार्दाच्या मूल्ये  देखील सक्षम बनवतात .

"आपले प्रभू श्रीराम मतभेदातून नव्हे तर भावनांद्वारे जोडले जातात ", असे सांगत  मोदींनी श्रीरामांसाठी वंशापेक्षा व्यक्तीची भक्ती महत्त्वाची आहे, वंशापेक्षा मूल्ये प्रिय आहेत आणि  केवळ ताकदीपेक्षा सहकार्य श्रेष्ठ आहे यावर भर दिला. ते म्हणाले की आज आपणही त्याच भावनेने पुढे जात आहोत. गेल्या 11 वर्षांमध्ये महिला, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, वंचित, शेतकरी, कामगार आणि तरुण - समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे यावर त्यांनी भर दिला. जेव्हा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वर्ग आणि देशातील प्रत्येक प्रदेश सक्षम होईल, तेव्हा प्रत्येकाचे प्रयत्न संकल्प पूर्ण करण्यात योगदान देतील  आणि या सामूहिक प्रयत्नांद्वारेच  2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी  होईल.

रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक प्रसंगाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी राष्ट्राचा संकल्प भगवान रामांशी जोडण्याबद्दल म्हटले होते आणि पुढील  हजार वर्षांसाठी भारताचा पाया भक्कम  केला पाहिजे याची आठवण करून दिली होती. जे फक्त वर्तमानाचा विचार करतात ते भविष्यातील पिढ्यांवर अन्याय करतात यावर त्यांनी भर दिला आणि आपण केवळ आजचाच नाही तर भावी पिढ्यांचाही विचार केला पाहिजे, कारण हे राष्ट्र आपल्या आधीपासून अस्तित्वात होते आणि आपल्या नंतरही राहील. एक चैतन्यशील समाज म्हणून आपण येणाऱ्या दशके आणि शतके यांचा विचार करून दूरदृष्टीने काम केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला आणि यासाठी आपण भगवान रामांकडून शिकले पाहिजे - त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेतले पाहिजे, त्यांचे आचरण आत्मसात केले पाहिजे आणि लक्षात ठेवले पाहिजे की राम आदर्श, शिस्त आणि जीवनाचे सर्वोच्च चरित्र यांचे प्रतीक आहेत . राम म्हणजे सत्य आणि शौर्याचा संगम, धर्माच्या मार्गावर चालण्याचे मूर्त स्वरूप, लोकांच्या आनंदाला सर्वांपेक्षा वरचे स्थान देणारे ,  संयम आणि क्षमा यांचा महासागर, ज्ञान आणि बुद्धीचे शिखर, सौम्यतेतील दृढता, कृतज्ञतेचे सर्वोच्च उदाहरण, उदात्त संगतीची निवड करणारा, महान शक्तीतील नम्रता, सत्याचा अढळ संकल्प आणि दक्ष , शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मन होय. रामाचे हे गुण आपल्याला एक मजबूत, दूरदर्शी आणि चिरंतन  भारत निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतील असे ते म्हणाले.

"राम ही केवळ एक व्यक्ती नाही तर एक मूल्य, एक शिस्त आणि एक दिशा आहे", असे प्रतिपादन मोदी यांनी केले. जर  2047 पर्यंत भारताला विकसित बनवायचे असेल आणि समाजाला सक्षम बनवायचे असेल, तर आपल्या प्रत्येकाच्या आतील  राम जागृत झाला पाहिजे, आपल्या स्वतःच्या हृदयात पवित्र झाला पाहिजे. असा संकल्प करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही यावर त्यांनी भर दिला. 25 नोव्हेंबर हा दिवस आपल्या वारशात अभिमानाचा आणखी एक असाधारण क्षण घेऊन आला आहे, ज्याचे प्रतीक धर्मध्वजावर कोरलेले कोविदार वृक्ष आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी स्पष्ट केले की कोविदार वृक्ष आपल्याला आठवण करून देतो की जेव्हा आपण स्वतःला आपल्या मुळांपासून तोडतो  तेव्हा आपले वैभव इतिहासाच्या पानांमध्ये गाडले जाते.

भरत आपल्या सैन्यासह चित्रकूटला पोहोचतो आणि लक्ष्मण दुरूनच अयोध्येचे सैन्य ओळखतो, त्या प्रसंगाची आठवण  पंतप्रधानांनी करून दिली. वाल्मिकी ऋषींनी केलेल्या वर्णनाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला,  लक्ष्मणाने रामाला सांगितले की एका मोठ्या वृक्षासारखा दिसणारा तेजस्वी, उंच ध्वज अयोध्येचा आहे, ज्यावर रक्तकांचनाचे   शुभ चिन्ह आहे. पंतप्रधानांनी  यावर भर दिला की आज, रक्तकांचन  पुन्हा एकदा राम मंदिराच्या प्रांगणात प्रतिष्ठापित होत असून हे  केवळ एका वृक्षाचे पुनरागमन नाही तर ते स्मृतीचे पुनरागमन, अस्मितेचे पुनर्जागरण  आणि अभिमानास्पद संस्कृतीचा उद्घोष आहे. रक्तकांचन आपल्याला आठवण करून देते की जेव्हा आपण आपली ओळख विसरतो तेव्हा आपण स्वत्व गमावतो, परंतु जेव्हा ओळख पुन्हा प्राप्त होते  तेव्हा राष्ट्राचा आत्मविश्वास देखील परत येतो.  देशाला पुढे जाण्यासाठी, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

आपल्या वारशाच्या अभिमान बाळगण्याबरोबरच गुलामगिरीच्या मानसिकतेपासून संपूर्ण  मुक्तीदेखील तितकीच महत्त्वाची आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. 190 वर्षांपूर्वी 1835 मध्ये मॅकॉले नावाच्या एका ब्रिटिश संसद सदस्याने भारताला मुळापासून उपटून टाकण्याचे बीज पेरले होते आणि मानसिक गुलामगिरीचा पाया रचला होता याची आठवण त्यांनी करून दिली. सन 2035 मध्ये, त्या घटनेला दोनशे वर्षे उलटून जातील असे त्यांनी नमूद केले आणि पुढील दहा वर्षे भारताला या मानसिकतेपासून मुक्त करण्यासाठी समर्पित करावीत असे आवाहन केले. त्यांनी दुःख व्यक्त केले की सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे मॅकॉलेच्या विचारांचा खूप मोठा परिणाम झाला - भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु न्यूनगंडातून मुक्तता मिळाली नाही.  जे जे परदेशी ते सर्वकाही श्रेष्ठ मानण्याची  तर आपल्या स्वतःच्या परंपरा आणि व्यवस्थेत केवळ दोष पाहण्याची विकृती निर्माण झाली, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की,गुलामगिरीच्या मानसिकतेने सतत या समजाला बळकटी दिली की भारताने लोकशाहीची संकल्पना परदेशातून घेतली आहे आणि संविधानदेखील परदेशापासून प्रेरित आहे. मात्र सत्य हे आहे की भारत लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाही आपल्या डीएनएमध्ये आहे. त्यांनी उत्तर तामिळनाडूमधील उत्तिरमेरूर या गावातील एक हजार वर्ष जुन्या शिलालेखाकडे लक्ष वेधले.  त्या काळातही लोकशाही पद्धतीने शासन कसे चालवले जात होते आणि लोकांनी त्यांचे शासक कसे निवडले, याचा उल्लेख शिलालेखात आहे.  त्यांनी नमूद केले की मॅग्ना कार्टाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली गेली, मात्र भगवान बसवण्णांच्या अनुभव मंटपाविषयीचे  ज्ञान मर्यादित ठेवण्यात आले. अनुभव मंटप हा एक असा मंच होता जिथे सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सार्वजनिकरित्या चर्चा केली जात होती आणि सामूहिक सहमतीने निर्णय घेतले जात होते. गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे, भारतातील पिढ्या त्यांच्या स्वतःच्या लोकशाही परंपरांबद्दलच्या ज्ञानापासून वंचित राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले.

गुलामगिरीची मानसिकता आपल्या व्यवस्थेत ठायीठायी वसली गेली, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले.शतकानुशतके भारतीय नौदलाच्या ध्वजावर अशी चिन्हे होती ज्यांचा भारताच्या संस्कृतीशी, सामर्थ्याशी किंवा वारशाशी काहीही संबंध नव्हता. आता नौदलाच्या ध्वजावरून  गुलामगिरीचे प्रत्येक प्रतीक काढून टाकण्यात आले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा स्थापित झाला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.हा केवळ प्रतिमेतील बदल नव्हता  तर मानसिकतेतील परिवर्तनाचा क्षण होता, भारत यापुढे इतरांच्या वारशातून नव्हे तर स्वतःच्या प्रतीकांद्वारे आपली शक्ती परिभाषित करेल, ही घोषणा होती, असे पंतप्रधान म्हणाले. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की हेच परिवर्तन आज अयोध्येत दिसून येत आहे. याच गुलामगिरीच्या मानसिकतेने गेली अनेक वर्षे रामत्वाच्या या भावनेला नाकारले यावर त्यांनी अधिक भर दिला. भगवान राम हे स्वतःच एक संपूर्ण मूल्य प्रणाली आहेत – ओरछा मधील राजा रामापासून रामेश्वरमच्या भक्त रामापर्यंत, शबरीच्या प्रभू रामांपासून मिथिलेच्या पाहुणा रामजी यांच्यापर्यंत सर्वस्वरूपांमध्ये राम आहे हे मोदी यांनी अधोरेखित केले. देशातील प्रत्येक घरात, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि भारताच्या प्रत्येक कणाकणात राम वसलेला आहे, तरीही गुलामीची मानसिकता इतकी वरचढ झाली की भगवान रामाला देखील कल्पनेतील व्यक्तिरेखा म्हणून जाहीर करण्यात आले.

जर आपण येत्या 10 वर्षांत गुलामीच्या मानसिकतेमधून स्वतःला संपूर्णपणे मुक्त करण्याचा निर्धार केला तर अशा आत्मविश्वासाच्या ज्वाला प्रज्वलित होतील  ज्यांतून कुठलीही शक्ती 2047 पर्यंत विकसित भारत उभारण्याचे स्वप्न साकारण्यापासून रोखू शकणार नाही हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आगामी दशकात मेकॉलेचा मानसिक गुलामगिरीचा प्रकल्प संपूर्णपणे उध्वस्त झाला तरच येती हजारो वर्षे भारताचा पाया मजबूत राहील यावर त्यांनी अधिक भर दिला. अयोध्येतील राम लल्ला मंदीर संकुल दिवसेंदिवस अधिकाधिक भव्य होत जात आहे आणि अयोध्येच्या सौंदर्यीकरणाचे कार्य वेगाने सुरु आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. अयोध्या ही पुन्हा एकदा अशी नगरी म्हणून आकाराला येत आहे जी जगासाठी एक उदाहरण म्हणून काम करेल. त्रेतायुगात अयोध्येने मानवतेला एक आदर्श आचारसंहिता दिली आणि आता 21 व्या शतकात अयोध्या मानवतेला विकासाचे एक नवे मॉडेल देऊ करत आहे. ते पुढे म्हणाले की एकेकाळी अयोध्या ही मर्यादा  केंद्र होती आणि आता अयोध्या हे विकसित भारताचा कणा म्हणून उदयाला येत आहे.

जेथे शरयू नदीचा प्रवाह आणि विकासाचा ओघ एकत्रितपणे वाहतील अशा परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफाचे मूर्त रूप म्हणून पंतप्रधानांनी अयोध्येची परिकल्पना मांडली. अयोध्या शहर अध्यात्मिकता आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या दरम्यान सुसंवादाचे दर्शन घडवेल यावर त्यांनी अधिक भर दिला. राम पथ, भक्ती पथ आणि जन्मभूमी पथ हे एकत्र येऊन नव्या अयोध्येचे चित्र सादर करतात असे त्यांनी नमूद केले. येथील भव्य विमानतळ आणि आकर्षक रेल्वे स्थानक तसेच वंदे भारत आणि अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या या सर्व सुविधा अयोध्येला देशाशी जोडत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. अयोध्येतील जनतेला सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात समृद्धता आणण्यासाठी सातत्याने काम सुरु आहे हे सांगण्यावर त्यांनी भर दिला. प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून तबल 45 कोटी भाविकांनी या मंदिराला भेट दिली आहे आणि त्यामुळे अयोध्या आणि परिसरातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. एकेकाळी अयोध्या हे शहर विकासविषयक निकषांच्या बाबतीत मागे पाडले होते मात्र आज हे शहर उत्तर प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर म्हणून उदयाला येत आहे असे ते म्हणाले.

21 व्या शतकाचे आगामी युग अत्यंत महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारताच्या  स्वातंत्र्यप्राप्तीला 70 वर्षे झाल्यानंतर भारत हा जगातील 11 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला, तर  केवळ  गेल्या 11 वर्षांत भारत पाचव्या क्रमांकाची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे हे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला असेल. आगामी काळ हा नव्या संधी आणि नव्या शक्यतांचा आहे आणि या महत्त्वाच्या कालावधीत भगवान रामाचे विचार देशाला प्रेरित करत राहतील.

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की जेव्हा भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवण्याच्या मोठ्या आव्हानाचा सामना केला तेव्हा त्यांच्या रथाला शौर्य आणि संयम ही चाके होती, त्याचा ध्वज सत्य आणि सदाचार होता, त्याचे घोडे शक्ती, ज्ञान, संयम आणि परोपकार होते आणि त्याचा लगाम क्षमा, करुणा आणि समता या मुल्यांची होती, ज्यामुळे रथ योग्य दिशेने धावत होता.

विकसित भारताच्या प्रवासाला गती देण्यासाठी, अशाच रथाची आवश्यकता आहे ज्याची चाके शौर्य आणि संयमाची आहेत, म्हणजेच आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य आणि परिणाम दिसून येईपर्यंत स्थिर राहण्याची चिकाटी त्याच्या ठायी असेल, असे पंतप्रधान म्हणाले. या रथाचा ध्वज सत्य आणि सदाचरणाचा असावा, जेणेकरून धोरण, हेतू आणि नैतिकतेशी कधीही तडजोड केली जाणार नाही, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या रथाचे घोडे शक्ती, ज्ञान, शिस्त आणि परोपकार रुपी असले पाहिजेत, ज्यामुळे शक्ती, बुद्धी, संयम आणि इतरांची सेवा करण्याची भावना जागृत राहील, असे ते म्हणाले. या रथाचे लगाम क्षमा, करुणा आणि समानतारुपी असले पाहिजेत, म्हणजेच अपयशातही यशात अहंकार असणार नाही आणि अपयशात इतरांचा अनादर केला जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. हा क्षण खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा, वाढत्या गतीचा आणि रामराज्याने प्रेरित भारताच्या उभारणीचा आहे, असे पंतप्रधानांनी आदरपूर्वक सांगितले. जेव्हा राष्ट्रीय हित स्वहितापेक्षा श्रेष्ठ मानले जाईल तेव्हाच हे शक्य होईलअसे सगुण त्यांनी समारोप केला.त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी

हा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी या शुभदिनी होत आहे, जो श्रीराम आणि सीतेच्या विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्ताशी जुळतो, जो दैवी मिलनाचे प्रतीक आहे. हाच दिवस शिखांचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर जी यांचा शहीद दिवस देखील आहे, ज्यांनी 17 व्या शतकात अयोध्येत 48 तास अखंड ध्यान केले होते, ज्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढते.

दहा फूट उंची आणि वीस फूट लांबीच्या या त्रिकोणी ध्वजावर भगवान श्रीरामांच्या तेजाचे आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्याची प्रतिमा आहे, ज्यावर ‘ॐ’ आणि रक्तकांचन  वृक्षाची प्रतिमा कोरलेली आहे. हा पवित्र भगवा ध्वज रामराज्याच्या आदर्शांना मूर्त रूप देणारा असून, सन्मान, एकता आणि सांस्कृतिक सातत्य यांचा संदेश देणारा आहे.

हा ध्वज पारंपरिक उत्तर भारतीय नागर स्थापत्य शैलीत बांधलेल्या शिखरावर हा ध्वज विराजमान आहे, तर त्याच्याभोवती दक्षिण भारतीय स्थापत्य परंपरेनुसार डिझाइन केलेले 800 मीटरचा परकोटा उभारण्यात आला आहे, जे मंदिराच्या स्थापत्य विविधतेचे प्रदर्शन घडवते. 

मंदिर संकुलात मुख्य मंदिराच्या बाहेरील भिंतींवर वाल्मिकी रामायणावर आधारित भगवान श्रीरामांच्या जीवनातील 87 प्रसंग दगडावर कोरण्यात आले असून  परिसरातील   भिंतीवर भारतीय संस्कृतीतील 79 प्रसंग दाखवले आहेत. हे सर्व घटक एकत्रितपणे सर्व पर्यटकांना एक अर्थपूर्ण आणि शैक्षणिक अनुभव प्रदान करतात, ज्यातून भगवान श्रीरामांच्या जीवनाची आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाची सखोल माहिती मिळते.

 

 

गोपाळ चिपलकट्टी/निलीमा चितळे/शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/सोनाली काकडे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2194135) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam