56 व्या इफ्फीमध्ये वेव्हज फिल्म बाजार 2025 चा उत्साहात समारोप
वेव्हज फिल्म बाजारच्या यापुढील 20 व्या आवृत्तीचे अधिक भव्य आयोजन करण्याची संयुक्त सचिव (चित्रपट) डॉ. अजय नागभूषण यांची ग्वाही
एनएफडीसी स्वतंत्र विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध: व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2025
गोव्यामध्ये सुरू असलेल्या 56 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये वेव्हज फिल्म बाजार 2025 चा एका दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. सळसळत्या उत्साहाचा संचार असलेल्या वातावरणात विचारांची देवाणघेवाण, जागतिक सहकार्य आणि लक्षवेधी चित्रपट प्रदर्शनामुळे या पाच दिवसांच्या कार्यक्रमाने एक वेगळा ठसा उमटवला. या कलात्मक अभिरुचीचे चोखंदळ मूल्यमापन करणाऱ्या या बाजारपेठेत जगभरातील नामांकित चित्रपट निर्माते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, वित्त पुरवठादार आणि उदयोन्मुख प्रतिभा यांची एकाच व्यासपीठावर मांदियाळी जमल्यामुळे सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचा उत्सव पाहायला मिळाला.

या समारंभाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. अजय नागभूषण एम. एन. आणि डॉ. के. के. निराला, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, वेव्स फिल्म बाजारचे सल्लागार जेरोम पैलार्ड, इफ्फीचे महोत्सव संचालक शेखर कपूर, प्रख्यात चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी आणि श्रीराम राघवन तसेच आंतरराष्ट्रीय अभिनेत्री रेचल ग्रिफिथ्स यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
चित्रपट क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली म्हणून एक मिनिट मौन पाळून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. नागभूषण यांनी वेव्हज फिल्म बाजारच्या 20 व्या आवृत्तीचे अधिक मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याचे आश्वासन दिले. मगदूम यांनी यापूर्वी निवडलेल्या प्रकल्पांना मिळालेल्या यशावर भर दिला आणि स्वतंत्र प्रतिभेची जोपासना करण्यासाठी एनएफडीसीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
या महोत्सवातील महत्त्वाच्या घडामोडींचे दर्शन घडवणारा एक विशेष समारोपाचा व्हिडिओ प्रदर्शित करून या समारंभातला उत्साह आणि सन्मानाला साजेशा वातावरणाची निर्मिती करण्यात आली.

प्रमुख पुरस्कारांची ठळक वैशिष्ट्ये :
वेव्हज फिल्म बाजारने को-प्रॉडक्शन मार्केट, वर्क-इन-प्रोग्रेस लॅब, स्क्रिप्ट लॅब आणि नवीन एआय-चालित विभागांमधील उत्कृष्ट प्रकल्पांना सन्मानित केले.
- काकथेट( इडियट)- प्रथम सहनिर्मिती अनुदान ($10,000)
- उल्टा(मॅडम) – द्वितीय सहनिर्मिती अनुदान ($5,000)
- सिंहस्थ कुंभ– विशेष माहितीपट अनुदान ($5,000)
- द मॅनेजर, अझी, उस्ताद बंटू - रेड सी फंड पुरस्कार
- नजमा का तडका - प्लॅटून वन स्क्रिप्ट डेव्हलपमेंट ग्रँट
- टीचर्स पेट, व्हाईट गाय - कास्टिंग कंपनी पुरस्कार
- 7 टू 7 - यूसीसीएन सिटी ऑफ फिल्म बेस्ट प्रोजेक्ट पुरस्कार
निर्मिती-पश्चात यश
पोस्ट-प्रॉडक्शनमधील यश खोरिया, अझी, द इंक स्टेनड हँड अँड द मिसिंग थंब, बॉर्न यस्टरडे, आक्काट्टी आणि खामोश नजर आते हैं यांसारख्या विजेत्या प्रकल्पांना नुबे स्टुडिओज, प्रसाद कॉर्पोरेशन, मूव्हीबफ आणि इतरांकडून मोठे सहकार्य मिळाले.
प्रिमियर गॅप फंडिंग आणि वितरण
- एकोज ऑफ द हर्ड - मॅचबॉक्स गॅप पुरस्कार
- सोल व्हिस्पर्स - M5 ग्लोबल फिल्म फंड
- रचिंगम - रिबॉर्न इंडिया नाट्य वितरण पुरस्का
एआय चित्रपट महोत्सव आणि सिनेमाएआय हॅकेथॉनः पहिल्यांदाच आयोजित जागतिक उपक्रम:
एलटीआयमाइंडट्री च्या पाठबळाने आयोजित केलेल्या या वर्षीच्या एआय शोकेसमध्ये 18 पेक्षा जास्त देशातून प्रवेशिका आल्या. चित्रपट निर्मितीमधील अत्याधुनिक नवोन्मेषाचा बहुमान करण्यात आला.
- कायरा- सर्वोत्तम एआय ऍनिमेशन
- द सिनेमा दॅट नेव्ह वॉज- सर्वाधिक नवोन्मेषी एआय चित्रपट
- नागोरी- सर्वोत्तम एआय लघुपट
विशेष उल्लेख: द लास्ट बॅकअप फायनल पार्ट, मिरॅकल ऑन द कछुआ बीच
सिनेमएआय हॅकथॉनने जलद-गती सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले, ज्यामध्ये ध्वनी, दृश्ये, कथाकथन, नवोन्मेष आणि सर्वोत्कृष्ट एआय चित्रपट ( द रेड क्रेयॉन) यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
उदयोन्मुख प्रतिभेवर प्रकाशझोत
स्टुडंट प्रोड्युसरच्या कार्यशाळेत काशवीय ओम्कार, अनिकेत जोशी, राधिका किनारे, रिया वर्गीस आणि साक्षी मिश्रा यांसारख्या उत्कृष्ट युवा निर्मात्यांचा गौरव करण्यात आला, ज्यांनी भारतीय सिनेमाच्या आश्वासक भविष्याचे दर्शन घडवले.
वेव्हज् फिल्म बाजारच्या प्रमुख विनिता मिश्रा यांच्या आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली, त्यानंतर संपूर्ण टीम मंचावर उपस्थित झाली. अविश्वसनीय सहभाग, सशक्त भागीदारी आणि दूरदर्शी कथाकथनासह आणि 2026 मध्ये आणखी मोठी, अधिक भव्य आवृत्ती घेऊन येण्याच्या हमीने वेव्हज् फिल्म बाजार 2025 चा समारोप एका उच्च स्तरावर झाला आहे.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Post Link: https://x.com/PIB_Panaji/status/1991438887512850647?s=20
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/शैलेश पाटील/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2194083
| Visitor Counter:
3