iffi banner

अनस्क्रिप्टेड ब्रिलियंस: विधू विनोद चोप्रा यांनी बुद्धिमत्ता, ज्ञान आणि सिनेमॅटिक अनुभव संपन्नतेने इफ्फीला टाकले उजळून


प्रेक्षक हास्य आणि टाळ्यांमध्ये रमतात जेव्हा किस्से मुक्तपणे रंगतात

कामना चंद्रा आपला प्रवास कथन करत असताना एक जिवंत वारसा येतो प्रकाशझोतात

#IFFIWood, 22 नोव्‍हेंबर 2025

 

इफ्फीमध्ये "अनस्क्रिप्टेड - द आर्ट अँड इमोशन ऑफ फिल्ममेकिंग" या शीर्षकाच्या संभाषण सत्राने आज कला अकादमीला चित्रपटाच्या सेटमध्ये रूपांतरित केले. विख्यात चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी मंचावर येऊन प्रशंसित पटकथा लेखक अभिजात जोशी यांच्याशी मनमोकळा संवाद साधताना एक अविस्मरणीय संवादोत्सव साजरा झाला. या संभाषणाने प्रेक्षकांना अशा पकडीत ठेवले जी सहसा शुक्रवारी ब्लॉकबस्टरसाठी राखीव असते.

या सत्राची सुरुवात डॉ. अजय नागभूषण एमएन, सहसचिव (चित्रपट) यांनी चोप्रा आणि जोशी यांचा सन्मान करून केली. त्यानंतर प्रसिद्ध चित्रपट निर्माते रवी कोट्टारक्करा यांच्या हस्ते दोघांनाही शाल पांघरण्यात आली. डॉ. अजय यांनी आशा व्यक्त केली की चोप्रा आपल्या नेहमीच्या प्रामाणिकपणाने तरुण चित्रपट निर्मात्यांना मार्गदर्शन करत राहतील. रवी यांनी चोप्रा यांच्या 'परिंदा' चित्रपटाचे कौतुक करून भारतीय चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा रंगवणारा 'गेम-चेंजिंग चित्रपट' असे म्हटले.

स्वतःपासून निर्मिती करणारा चित्रपट निर्माता

संभाषणाची सुरुवात करताना अभिजात जोशी यांनी विधू विनोद चोप्रा यांना भेटलेल्या पहिल्या दिवसाची आठवण करून दिली, तो नोव्हेंबरचा दिवस त्यांना अजूनही स्पष्टपणे आठवतो, तो क्षण ज्याने अखेर 'लगे रहो मुन्ना भाई' आणि '3 इडियट्स' सारख्या चित्रपटांना आकार दिला. त्यानंतर त्यांनी चोप्रा यांना विचारले की त्यांची शैली 'परिंदा' पासून '12वी फेल' पर्यंत विकसित झाली आहे का? चोप्रा यांचे उत्तर अतिशय रांगडे आणि तितकेच सच्चे होते.

"प्रत्येक चित्रपट त्या वेळी मी कोण आहे हे प्रतिबिंबित करतो," ते म्हणाले. "'परिंदा' बनवताना मला राग आला होता. चित्रपटात तुम्हाला ती हिंसा दिसते. आज मी शांत आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की '12वी फेल' हा चित्रपट त्यांच्या आजूबाजूला भ्रष्टाचार पाहून आला. "चला, प्रामाणिकपणे बदल घडवून आणूया हे सांगण्याचा तो माझा मार्ग होता. जर मी नोकरशाहीचा 1 टक्का भागही बदलू शकलो असलो तरी ते पुरेसे आहे." त्यांनी '1942: अ लव्ह स्टोरी' हा चित्रपट त्याच्या नव्याने पुनर्संचयित केलेल्या 8K आवृत्ती पाहिल्यावर आपण कसे भावनिक झालो होतो , याचेही वर्णन केले. ते म्हणाले की मी आज तो बनवू शकत नाही कारण आता मी तोच माणूस उरलेलो नाही.

ठाम भूमिकांचे चित्रपटविश्व

जोशी यांनी सांगितले की चोप्रांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वतःच्या ठाम भूमिकेबद्दलचा त्यांचा अढळ विश्वास.  त्यांना कधीही चित्रपटाच्या व्यावसायिक यशापेक्षा त्याच्या कलात्मक यशाचे  महत्त्व जास्त वाटते, असे सांगत त्यांनी  चर्चा ‘परिंदा’ आणि ‘ टवेल्थ फेल’च्या सर्जनशील प्रक्रियेवर वळवली.

चोप्रांची तयारी, दृष्टी आणि दृश्यात्मक सत्याच्या शोधाविषयी अतिशय उत्कटतेने बोलताना, ‘1942: अ लव्ह स्टोरी’मधील एका प्रसिद्ध दृश्याचा विशेष उल्लेख केला आणि त्या गाण्याची ओळ त्या ठिकाणी मनापासून गुणगुणली, ज्यावर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पर्वतरांगेवरून खऱ्या पक्ष्यांच्या थव्यांनी उडत जायला हवे, त्यांनी आग्रह कसा धरला आणि ते साध्य करण्यासाठी युनिटने त्या भागात ब्रेडचे तुकडे कसे फेकले, याची त्यांनी तपशीलवार माहिती सांगितली.  ते दृश्य काल 8 के मध्ये पाहताना त्यांना आनंददायक अनुभूती मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सभागृह भरून टाकणाऱ्या खुमासदार आठवणी

यानंतर रंगमंच हास्याने आणि मनाला भिडणाऱ्या आठवणींनी भरून गेला. चोप्रांनी ‘खामोश’ लिहिताना एका लहानशा  खोलीच्या घरात राहण्याचा काळ सांगितला, जिथे ते छतावर उभे राहून संवाद गुणगुणायचे आणि “कट, कट!” असे ओरडायचे, ज्यामुळे शेजारी घाबरून जायचे. जोशी हसत म्हणाले, “चित्रपटाची कल्पना सुचली की विधू लहान मुलासारखे उत्साहित होतात. प्रेक्षकांना विशेष आवडलेला प्रसंग म्हणजे अभिनेते जॅकी श्रॉफ यांची गंमतीशीर चूक.   रिहर्सल दरम्यान ते चुकून चुकीच्या घरात गेले, झोपेत असलेल्या एका महिलेला उठवले आणि तिला फुले देऊन टाकली. नंतर त्या महिलेने सगळ्यांना सांगितले की, तिला स्वप्नात जॅकी श्रॉफ भेटायला आला होता, असे म्हणत चोप्रा जोरात हसले.

ते संगीत, तो नाद, ती जादू  

बर्मन यांचा काळ संपल्याचा दावा केला जात होता तरीही  '1942 : अ लव्ह स्टोरी' बद्दल बोलताना, चोप्रा यांनी आर.डी. बर्मन यांच्यासोबत काम करण्याचा त्यांचा दृढ निश्चय कथन केला.

जेव्हा बर्मन यांनी सुरुवातीचे गाणे सादर केले तेव्हा चोप्रा यांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. "मी ते वाईट असल्याचे सांगितले. मला एस.डी. बर्मनचा आत्मा हवा होता." काही आठवड्यांनंतर, "कुछ ना कहो" आले. चोप्रा यांनी स्टेजवर हे गाणे गायले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. "मी तो एक शब्द बोललो म्हणून हे गाणे अस्तित्वात आहे," ते  विनोदाने म्हणाले.

चोप्रा यांनी त्यांच्या प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार कथेचीही आठवण सांगितली. ते म्हणाले  की त्यांना पुरस्कारासोबत 4,000 रुपये रोख मिळण्याची अपेक्षा होती, परंतु त्यांना आठ वर्षांचा पोस्टल बाँड मिळाला. लालकृष्ण अडवाणी यांच्याशी झालेल्या त्यांच्या वादाचा किस्सा  विनोदी पद्धतीने सादर केल्यावर सभागृह स्तब्ध झाले. त्यानंतर त्यांनी अडवाणींनी  पाठिंबा दिल्याचे नमूद केले. त्यांच्यामुळे ऑस्करमध्ये उपस्थित राहण्यास मदत झाली असे ते म्हणाले.  

क्लासिक्सच्या मागील लोकांचा सहभाग

एका हृदयस्पर्शी क्षणी, ‘1942 : अ लव्ह स्टोरी’ च्या 92  वर्षीय लेखिका आणि चोप्रा यांच्या सासू कामना चंद्रा, निर्माते योगेश ईश्वर संवादात सामील झाले . कामना यांनी प्रत्येक संवादावर काम करताना केलेल्या कष्टाबद्दल आणि  पुन्हा नव्याने ती आवृत्ती पाहताना त्यांना वाटलेल्या भावनेबद्दल सांगितले. “मला असे वाटले की मी आयुष्यात काहीतरी केले आहे,” असे त्या म्हणाल्या.

योगेश यांनी इटलीमधील 8के रिस्टोरेशनच्या प्रवासाची सविस्तर माहिती दिली. चित्रपटाच्या फ्रेमची प्रत्येक फ्रेमनुसार संपादन केले आणि जश्यास तसा आवाज पुन्हा तयार केला. चोप्रा म्हणाले की, पुनर्संचयित आवृत्ती "मी ज्याची कल्पना केली होती तशीच दिसते."

सत्राचा शेवट उत्साही प्रश्नोत्तरांनी झाला, परंतु खरी जादू आधीच उलगडली होती  हे स्पष्ट होते. प्रेक्षकांनी दशकांच्या चित्रपटांच्या प्रवासाचा अनुभव घेतला, चित्रपट निर्मितीतील आनंद आणि चकित करणाऱ्या बाबी अनुभवल्या आणि विधू आणि अभिजात यांच्यातील सर्जनशील भागीदारीचे साक्षीदार बनले, ज्यांनी  भारतातील काही सर्वात लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली.

 

इफ्फीविषयी

वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच  कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.

For more information, click on:

IFFI Website: https://www.iffigoa.org/

PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/

PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F

X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/राज दळेकर/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे | IFFI 56


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2025, #AnythingForFilms and #FilmsKeLiyeKuchBhi. Tag us @pib_goa on Instagram, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Release ID: 2192906   |   Visitor Counter: 8