जेवॉन किम यांनी केलेल्या वंदे मातरमच्या भावपूर्ण सादरीकरणाला गोव्याने दिली दाद
भारत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना ही मनमोहक प्रस्तुती सादर झाली
#IFFIWood, 20 नोव्हेंबर 2025
गोव्यात वेव्हज फिल्म बाजारच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात उपस्थित प्रेक्षकांना एका अनपेक्षित आणि अंतःकरणाला भिडणाऱ्या क्षणाचा अनुभव घेता आला, ज्यावेळी कोरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय सभेच्या सदस्य जेवॉन किम यांनी वंदे मातरमचे भावपूर्ण सादरीकरण केल्यानंतर सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

भारत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना जेवॉन किम यांनी मनापासून सादर केलेल्या या सादरीकरणाने या महोत्सवाला एक विशेष अर्थ मिळाला. भारताच्या सांस्कृतिक वारशाला समर्पित सौंदर्यपूर्ण आणि अतिशय मनःपूर्वक सादरीकरणानंतर सभागृहातील प्रेक्षकांनी त्यांना उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली
या कार्यक्रमादरम्यान माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी जेवॉन किम यांच्या या भावपूर्ण सादरीकरणाची प्रशंसा केली. त्यांनी केवळ सादरीकरणच नव्हे, तर वंदे मातरम गीताची संपूर्ण आवृत्ती सादर केल्याबद्दल मुरुगन यांनी त्यांचे कौतुक केले. किम यांचे सादरीकरण मैत्रीची भावना आणि सांस्कृतिक सौहार्दाच्या भावनेचे प्रतीक होते जे वेव्हज फिल्म बाजार सारख्या कार्यक्रमांनी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. किम यांनी कोरियन गाणे देखील सादर केले आणि दोन संस्कृतींमधील देवाणघेवाण करुन कार्यक्रमाला एका अनोख्या उंचीवर नेले.

जगभरातील चित्रपट निर्माते, क्रिएटर्स, प्रतिनिधी आणि कथाकारांचा समावेश असलेल्या या मेळाव्यात, यांची हृदयस्पर्शी प्रस्तुती ठळकपणे उठून दिसली तसेच एखादी कलाकृती आणि भावना सीमा ओलांडून किती सहजपणे प्रवाहित होतात याची ती एक सुरेल आठवण ठरली.”
वेव्हज फिल्म बाजार विषयी
पूर्वी फिल्म बाजार म्हणून ओळखला जाणारा हा उपक्रम राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) 2007 मध्ये सुरू केला होता आणि आता ही दक्षिण आशियातील सर्वात प्रभावशाली चित्रपट बाजारपेठ म्हणून नावारूपाला आली आहे.
आज उदघाटन झालेल्या वेव्हज फिल्म बाजारच्या निमित्ताने पटकथाकार लॅब, मार्केट स्क्रीनिंग्स, व्ह्यूइंग रूम लायब्ररी आणि सह निर्मिती मार्केट यांसह निवडक विभागांमध्ये 300 हून अधिक चित्रपट प्रकल्पांचा विस्तृत संग्रह एकत्र आला आहे. सह निर्मिती मार्केटमध्ये 22 फीचर फिल्म्स आणि 5 माहितीपटांचा समावेश आहे, तर वेव्हज फिल्म बाजार रेकमेंड्स विभागात विविध स्वरूपातील 22 उल्लेखनीय चित्रपट सादर केले आहेत. सातहून अधिक देशांच्या प्रतिनिधी मंडळांबरोबरच भारतातील दहा पेक्षा जास्त राज्यांचे फिल्म प्रोत्साहन सादरीकरणही या व्यासपीठाला अधिक समृद्ध करतात.
इफ्फीविषयी थोडक्यात माहिती
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा(ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2192226
| Visitor Counter:
34